म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव वास्तव आणि आडनाव श्रीवास्तव असेल तर ती व्यक्ती स्वत:चं नाव कसं लिहील? श्री. वास्तव श्रीवास्तव. असंच काहीसं गंमतीशीर वाटतंय ना या पोस्टचं शीर्षक? पण काय करणार परिस्थितीच तशी आहे. म्हणजे त्याचं असं आहे पाहा, समजा एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडणे अशक्य असेल तर आपण काय म्हणतो? अवास्तव. त्याचप्रमाणे आपल्या स्वप्नांना आपण काय म्हणतो? अवास्तव. आणि आता जर का एखादी गोष्ट स्वप्नात देखील अशक्य असेल तर तिला काय म्हणणार? अवास्तव अवास्तव असंच ना?
आता तुम्ही म्हणणार स्वप्नात देखील अशक्य असं काय असू शकतं? तुमच्याकरिता नसेल कदाचित पण निदान माझ्याकरिता तर हे स्वप्नातदेखील अशक्यच आहे.
मी आहे जरा जुन्या काळात रमणारा माणूस. (जरा अशाकरिता म्हंटलं की फार जुन्या राजे महाराजांच्या काळात नाही. अगदीच गेला बाजार स्वातंत्र्यपूर्व काळात देखील नाही. तर सत्तर, एंशी व नव्वदच्या दशकाचा पूर्वार्ध या काळात रमणारा). तर या काळातल्या लोकप्रिय जिंगल्सचा खजिना उपलब्ध करून देणारं एक संकेतस्थळ अस्मादिकांच्या पाहण्यात आलं (फक्त स्थळंच पाहण्याच्या लायकीची असतात असं नव्हे तर संकेतस्थळं देखील तशी असतात. असो.). तर त्या संकेतस्थळावरून मनसोक्त जुन्या दूरदर्शनवरील जाहिराती उतरवून घेतल्या आणि मग त्या एक एक करून निवांत ऐकत बसलो.
- हमारा कल हमारा आज ... हमारा बजाज
- ओल्ड स्पाईस
- कुछ खास है हम सभी में ... कॅडबरी
- जब घर की रौनक बढानी हो .... नॅरोलॅक
अचानक काहीतरी चूकल्या चूकल्यासारखे वाटले. पुन्हा ऐकले
जब घर की रौनक बढानी हो, दिवारोंको जब सजाना हो नेरोलॅक, नेरोलॅक
रंगोंकी दुनियामें आओ, रंगीन सपने सजाओ नेरोलॅक, नेरोलॅक.
यात काही तरी खटकल्यासारखे वाटले, पण नेमके काय ते ध्यानात येईना. बराच वेळ विचार करून अजूनच अस्वस्थ झालो. शेवटी एक एक शब्द कागदावर उतरवून घेतला आणि नेमका कुठे आपल्याला त्रास होतोय याचा शोध घेतला आणि लक्षात आले आपण अडखळतोय ते रंगीन सपनें या शब्दांवरच.
हो. कारण आजतागायत मला इतकी स्वप्ने पडलीयत (रोज रात्री किमान एक तरी आणि कधी कधी चार किंवा पाच सुद्धा) पण एकाही स्वप्नात मला कुठलीच गोष्ट रंगीत दिसली नाहीय. वास्तवात आपण जे काही पाहतो ते आपल्या बाह्य डोळ्यांनी (Physical Eyes), याउलट कल्पनेत किंवा स्वप्नात आपण जे काही पाहतो ते आपल्या अंत:चक्षूंनी (Logical Eyes). त्यामुळे कल्पनेत देखील जेव्हा आपण एखादी गोष्ट समोर आणायचा प्रयत्न करतो तेव्हा तिचे रंग आपल्यासमोर सहज येत नाही. रंगांची कल्पना करण्याकरिता तसा मुद्दाम प्रयत्न करावा लागतो. स्वप्नांवर तर आपलं काहीच नियंत्रण नसतं त्यामुळे तिथे आपल्याला सार्या गोष्टी बिनरंगाच्याच (Grayscale) दिसतात.
त्यामूळे रंगीन सपने सजाओ ही बाब माझ्यासाठी स्वप्नात सुद्धा अशक्य म्हणजेच अवास्तव अवास्तव आहे.