Sunday 30 March 2014

कानामागून आली


१५ एप्रिल २०१३.  सायंकाळी सातची वेळ.  मी आणि पत्नी, तिचा आवडता अभिनेता - राजीव खंडेलवालचा "साऊंडट्रॅक" चित्रपट पाहत होतो.  या चित्रपटात नायकाचा एक कान पूर्ण बधीर होतो आणि दुसर्‍या कानाला जेमतेम ३० टक्के श्रवणशक्ती राहते असा एक प्रसंग आहे.  पुढे तर नायक पूर्णच बहिरा होतो.  अर्थात त्याच्या या कमतरतेवर मात करूनही तो उत्तम संगीतकार म्हणून स्वत:ला सिद्ध करतो असे काहीसे चित्रपटाचे कथासूत्र आहे.  तर आम्ही हा चित्रपट व्यवस्थित Enjoy केला.  चित्रपट पाहतच रात्रीचे भोजनही उरकले आणि अचानक रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने तक्रार केली की तिला एका कानाने अजिबात ऐकू येत नाहीये.  चित्रपट फारच परिणामकारक होता वाटतं असा शेरा मारून मी तिची तक्रार थट्टेवारी नेली आणि तिला झोपी जाण्यास सांगितले.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावरही पुन्हा तिची तीच तक्रार.  मग मी तिचा कान विजेरीच्या प्रकाशात नीट पाहिला, पण कानात मळ, घाण असे काहीही नव्हते.  कान खोलपर्यंत अगदी स्वच्छ दिसत होता.  तिला कान दुखतोय का? हे देखील विचारले परंतु तिचा कान दुखतच नव्हता तर फक्त ऐकायला येत नाही इतकीच तक्रार होती.   ठीक आहे पण दुसर्‍या कानाने तर ऐकता येत आहे ना? मग पाहू नंतर असे म्हणून मी माझ्या कामात गढून गेलो.  डॉक्टरांकडे जाणे टाळलेच.  खरे तर माझाही नाईलाज होता.  मी मूळचा पुण्याचा.  इथे व्यवसायानिमित्त धुळ्यात तात्पुरता निवास तोही शहरापासून १० किमी दूर औद्योगिक वसाहतीत.  सल्लागार म्हणून एका आस्थापनेशी संबंध येतो.  त्या माझ्या ग्राहक आस्थापनेनेच त्यांच्या कारखान्याच्या आवारात निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे.  सलग तीन साडेतीन महिने साप्ताहिक सूटी देखील न घेता त्यांना सेवा द्यायची आणि त्यानंतर आठ दहा दिवस त्यांच्या सोयीने सवड काढून पुण्याच्या घरी जाऊन यायचे असा माझा शिरस्ता.  एप्रिल २०१३ मध्येही माझी आठवडाभर पुण्याला जाण्याची वेळ आली होती.  पण रोज काहीना काही काम निघत होते आणि माझे पुण्याला जाणे लांबणीवर पडत होते.  आताही मला एक दोन दिवसांत पुण्यास जायला मिळेल अशी आशा वाटत होती आणि त्यामुळेच मी धुळे शहरातील डॉक्टरांकडे जायचे टाळत होतो.  कारण एक तर शहर माझ्या निवासापासून लांब, त्यात मला इथल्या डॉक्टरांची काहीच माहिती नाही.  शिवाय इथे आम्ही दोघेच.  पुण्याला गेल्यावर माझ्या घरचे इतर लोकही सोबतीला असणार होते त्यामुळे माझ्या पत्नीला मी एक दोन दिवस धीर धरण्यास सांगितले.  तिलाही कान दुखत नसल्यामूळे अगदीच तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली नाही.  पुढच्या काही दिवसांत तिला श्रवण दोषासोबतच कानामागे काहीतरी सळसळ जाणवू लागली होती.  म्हणजे नेमके काय होतेय हे मला कळले नाही - "कुछ sensation हो रहा है।" असे तिचे शब्द होते.  

इथे आज उद्या करता करता मला थेट २३ एप्रिल रोजी पुण्यास जायची परवानगी मिळाली.    नेहमीप्रमाणेच सकाळी माझ्या वाहनाने पुण्यास निघालो.  वाटेत औरंगाबाद, अहमदनगर इथे थांबे घेत आमच्या तिथे राहणार्‍या नातेवाईकांनाही भेटून घेतले आणि रात्री उशिरा निगडी, पुणे येथील माझ्या घरी पोचलो.  श्री. कुलकर्णी नावाचे माझ्या माहितीतले एक नाक-कान-घसा तज्ज्ञ आहेत त्यांना भेटायचे ठरले.  दुसरा दिवस २४ एप्रिल २०१३ - बुधवार.  बुधवारी डॉक्टर तळेगावात असतात असे कळले.  त्यामुळे तो दिवसही गेला.  पुढचा दिवस -  गुरुवार २५ एप्रिल रोजी पत्नीला घेऊन डॉ. कुलकर्णी यांच्या दवाखान्यात गेलो.  त्यांनी कानाची तपासणी केली पण काहीच आढळले नाही.  मग त्यांनी मला सांगितले की - Audio Test करावी लागेल त्याचे शुल्क रु.७००/- (अक्षरी रुपये सातशे फक्त) होईल, करावी का?  करा मी एटीएम मधून तितकी रक्कम घेऊन येतो असे सांगितले.

त्याप्रमाणे  Audio Test झाली.  त्यानंतर डॉक्टरांनी मला शांतपणे वस्तुस्थिती विशद केली.  त्यांच्या निदानाप्रमाणे कानात दोष नसून कानापासून मेंदूला जाणार्‍या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाली आहे.  तिच्यामुळे सर्व समस्या निर्माण झाली आहे.  त्या गुठळीला विरघळवावे लागेल.  त्याकरिता तीन इंजेक्शने द्यावी लागतील.  ही इंजेक्षने नेहमीप्रमाणे सिरींजने द्यावयाची नसून सलाईनच्या बाटलीतून हळूहळू शिरेवाटे द्यावी लागतील एक इंजेक्शन चार ते सहा तासात द्यावे लागेल.  तसेच हे इंजेक्षन दिल्यावर शरीराला सूज येणे किंवा इतरही काही दुष्परिणाम दिसू शकतील.  असे काही घडलेच तर लागलीच सलाइन शिरेतून सोडण्याचा वेग कमी करावा लागेल अथवा काही काळ थांबवावे देखील लागेल.  एका दिवसात केवळ एकच इंजेक्शन देता येईल.  तीन इंजेक्षन्स करिता तीन दिवस लागतील.   एकूणातच हे उपचार अतिशय संवेदनशील असल्यामूळे मोठ्या रुग्णालयात दाखल होऊनच करावे लागतील.  आता रुग्णाला चिंचवडच्या निरामय रुग्णालयात तातडीने दाखल व्हावे लागेल.  तसेच या उपचारांकरिता रुग्णाने लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायचा असतो तरच सकारात्मक निकालांची तीस टक्के शक्यता असते.  इथे आम्ही आधीच दहा दिवस उशिर केला होता त्यामुळे ही शक्यता अतिशय धूसर होती.

डॉक्टरांचे बोलणे संपल्यावर मी त्यांना एक दिवसाची मुदत मागितली आणि आम्ही दोघे घरी परतलो.  माझ्या कपाटातली जुनी कागदपत्रे चाळू लागलो.  सल्लागाराचा व्यवसाय करण्याच्या निमित्ताने माझा विविध  क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळींशी संपर्क येत असतो.  यात अनेक वैद्यकीय व्यावसायिकांचा देखील समावेश आहे.  बरीच कागदपत्रे तपासल्यावर मला चार नाक-कान-घसा तज्ज्ञांचे संपर्क क्रमांक मिळाले.  एकामागोमाग एक  सर्वांशी संपर्क साधला.  माझ्या पत्नीची समस्या आणि कराव्या लागणार्‍या उपचारांविषयी थोडक्यात माहिती देऊन त्यांचा सल्ला मागितला.  सर्वांनीच डॉ. कुलकर्णींनी सूचविलेल्या उपायांसोबत सहमती दर्शविली आणि विनाविलंब उपचारांस सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या.  सर्वात शेवटी मी एका महिला तज्ज्ञाशी संपर्क साधला होता.  त्यांनी मला विचारले की मी नेमका सेकंड ओपिनियनच्या भानगडीत वेळ का वाया घालवतोय?  माझे उत्तर होते की, उपचारांचीच अतिशय भीती वाटते आहे.  शिवाय ऐवीतेवी उपचार यशस्वी होण्याची शक्यता अगदीच कमी आहे तर मग उपचार घेऊन दुष्परिणाम भोगण्याची जोखीम तरी का पत्करावी?  नाही ऐकू आले एका कानाने तर काय अडले?  कान दुखत तर नाहीये.  त्यावर त्यांनी मला सांगितले की कानापासून मेंदुपर्यंत श्रवणसंदेश पोचविणार्‍या नलिकेतली ही गुठळी हळूहळू रुग्णाच्या मेंदूपर्यंत पोचेल आणि मेंदुच्या कोणत्याही भागाला कितीही प्रमाणात हानी पोचवू शकेल.  आता रुग्णाला फक्त  एका कानाने ऐकायला येत नसले तरी नंतर कदाचित रुग्णाची दृष्टी, स्पर्शज्ञान, स्मृती किंवा इतर कोणत्याही कार्यावर विपरीत परिणाम होईल आणि तो कायमस्वरूपी असेल.  तसेच मृत्यूसुद्धा ओढवू शकतो.

हे ऐकल्यावर मी तातडीने पत्नीला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.  त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी अर्थात शुक्रवार २६ एप्रिल २०१३ रोजी पत्नीला चिंचवड येथील निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  आधी सर्व कागदपत्रांचे सोपस्कार, त्यानंतर विविध चाचण्या मग दुपारचे भोजन हे सर्व उरकल्यावर सुरुवातीचे इंजेक्शन देण्यास दोन वाजले.  आधी परिचारिकेने स्टॅण्ड वर सलाईनची बाटली चढविली आणि शिरेवाटे रुग्णास सलाईन देण्यास सुरुवात झाली.  मग काही वेळाने सलाईनच्या बाटलीत इंजेक्शन टोचून त्यात औषध सोडण्यात आले.  काही वेळाने पत्नीला त्रास होऊ लागला मग परिचारिकेला बोलावून सलाईनचा वेग कमी करण्यात आला.  त्यानंतरही कधी भुकेमुळे तर कधी नैसर्गिक विधीकरिता जावे लागल्याने सलाईन काढावे आणि पुन्हा जोडावे लागले.  दरेकवेळी परिचारिकेस बोलवावे लागले.  या सर्व उपद्व्यापांमध्ये वेळेचा बराच अपव्यय झाला आणि पहिल्या इंजेक्षनला पुर्णपणे शरीरात जाण्यास रात्रीचे बारा वाजले.

त्यानंतर मी बाजुच्या खाटेवर झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण झोप लागण्याची काही चिन्हे दिसेनात कारण ह्या खाटेवर काथ्यापासून बनविलेली गादी आणि त्यावर रेक्झीनचे आच्छादन होते.  एप्रिल महिन्यातल्या भयंकर उकाड्यातल्या रात्री अशा गादीवर झोपून अंग अजुनच घामाने चिंब होत होते.  त्यात बर्‍याच प्रयासाने जरा झोप येऊ लागली की पत्नीला औषध द्यायची वेळ होई आणि परिचारिका आत येत असे.  असे होत दिवस उजाडला तेव्हा माझी उणीपुरी दोन तासांची झोप झाली होती.  सकाळी पत्नीकरिता रुग्णालयातून नाष्टा आला त्यानंतर मी घरी जाऊन नित्यकर्मे आटोपली.  आरोग्य विमा कंपनीला Electronic Mails पाठविले आणि दोनेक तासांत पुन्हा रुग्णालयात हजर झालो.  आदल्या दिवशीचे इंजेक्षन दुपारी दोनला सुरू केले असल्याने २४ तास अंतर राखण्याकरिता दुसरे इंजेक्षनही दुपारी दोनलाच दिले जाणार असल्याचे कळले.  मधल्या काळात पुन्हा विविध चाचण्या आणि मेंदूतज्ज्ञांची भेटही झाली.  मेंदुतज्ज्ञांनी तर तीन इंजेक्शन्सनी फरक पडला नाही तर आपणे पाच इंजेक्शन्स देऊ असे सांगितले.  रुग्णालयाच्या इमारतीतच इतर मजल्यांवर केल्या जाणार्‍या चाचण्यांकरिता तिला त्या त्या विभागातून नेण्या आणण्याकरिता चाकाची खुर्ची आणि ती ढकलण्याकरिता सेवक देखील पुरविले जाऊ लागले.  हातीपायी अत्यंत व्यवस्थित असणारी व भोवळ वगैरे न येता व्यवस्थित चालु फिरू शकणारी माझी पत्नी खुर्चीतून जाणे नाकारत होती.  परंतु काही विभागांच्या सूचना अतिशय काटेकोर असल्याने ते तिला खुर्चीतूनच जाण्याची सक्ती करत तेव्हा खुर्चीवर बसून जाताना ती खळखळून हसत होती.  या सर्वांवर कडी म्हणजे चुंबकीय प्रतिध्वनी प्रतिमा चाचणी (Magnetic Resonance Imaging - MRI).  या चाचणीची सोय रुग्णालयात नव्हती.  त्याकरिता दोन किमी अंतरावरील केन्द्रात जायचे होते.  त्याकरिता रुग्णवाहिका व रुग्णशिबिकेची (Stretcher) व्यवस्था करण्यात आली होती.  स्ट्रेचर वरून रुग्णवाहिकेत जायचे मात्र तिने सपशेल नाकारले.  रुग्णवाहिकेत ती व्यवस्थित आसनावर जाऊन बसली आणि पुन्हा तशीच परतली.  त्यानंतर पुन्हा भोजन आणि सलाईनचा सोपस्कार आदल्या दिवशीप्रमाणेच पार पाडला.  सलाईन चालु असताना मध्ये मध्ये ती झोप काढायची.  जागी झाल्यावर दूरचित्रवाणी संचावर चित्रपट पाहत बसायची.  मी तिच्यासोबत बसून विविध वर्तमानपत्रे आणि सुहास शिरवळकरांची आठ पुस्तके वाचून काढली.

तिसर्‍या दिवशी असेच मी पुस्तक वाचत शेजारी बसलो आणि तीही कंटाळा घालविण्याकरिता माझ्यासोबत काहीतरी बोलत होती.  माझे तिच्याकडे लक्ष गेले आणि मी तिला म्हणालो, "आज तुला लाल नळीतून सलाईन का देत आहेत?"  अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तिने हात हलविल्यामुळे तिचा हात चढावर आणि नळी उतारावर गेलीये आणि तिच्या हातातून नळीत रक्त येऊ लागले आहे.  मी तातडीने परिचारिकेला बोलाविले तर तीही घाबरून गेलेली दिसली.  तिने अजून तिच्या दोन सहकारी परिचारिकांना बोलाविले आणि सर्वांनी मिळून पुन्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.                            

तिसरी रात्रही अशीच अर्धवट झोपेत काढल्यावर चौथा दिवस अर्थात २९ एप्रिल २०१३ उजाडला.  डॉ. कुलकर्णी व इतर सहकारी डॉक्टर भेट देऊन गेले.  पुन्हा सर्व चाचण्या केल्या गेल्या.  मुख्य म्हणजे ती Audio Test, ती देखील केली गेली.  सकारात्मक निकाल आले.  रुग्णाला अजून काही काळ निरीक्षणांतर्गत ठेवू असे कळविण्यात आले.  त्यानंतर ठीक आठ वाजता सुटका (Discharge) करण्यात आली.

रुग्णालयातून घरी परतल्यावरही तीन दिवस औषधे चालू होती.  आता दोन्ही कानांनी व्यवस्थित ऐकू येऊ लागले, परंतु चौथ्या दिवशी पुन्हा कानामागे सळसळ होऊ लागली.  तातडीने मी डॉ. कुलकर्णींना संपर्क केला.   त्यांनी विशेष काळजीचे कारण नसल्याचे सांगून एक calpol गोळी खाण्यास सांगितले.  तसे केल्यावर लगेचच ही सळसळ बंद झाली.

उपचारांदरम्यान वेळोवेळी माझे आई, वडील, भाऊ व वहिनी यांनी रुग्णालयात येऊन पत्नीला व मला धीर देण्याचे व मला वेळोवेळी Relieve करण्याचे कार्य केले याचा उल्लेख इथे करणे गरजेचे आहे.

पुण्यातील हे उपचार संपवून आम्ही धुळ्यात परतलो तेव्हा कानामागून येऊन तिखट बनलेली ही समस्या कायमची दूर झाली होती.   सर्व उपचारांचा खर्च रुपये चौतीस हजार पाचशे (रू.३४,५००/-) इतका झाला.  युनाईटेड इंडिया इन्शुरन्सची आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत त्यापैकी रुपये बावीस हजार (रू.२२,०००/-) इतकी रक्कम दोन आठवड्यानंतर आम्हाला प्राप्त झाली.
Saturday 8 March 2014

हकीगत एका अपघाताची

जानेवारी २००५ मध्ये एका वितरणसंस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत होतो.  पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीबाहेर ताथवडे नावाच्या एका गावात गोदाम भाड्याने घेऊन तेथे Kajaria Vitrified Tiles ची साठवणूक केली जात असे.  या Tiles भिवंडी येथील कजारिया कंपनीच्या गोदामातून थेट आमच्या गोदामात येत.  आम्ही १० टन किंवा अधिक इतक्या वजनाच्या Tiles एका वेळी मागवत असू त्यामूळे त्या आमच्या गोदामात थेट पोचविल्या जात.  आमच्या गोदामातून पुढे पुणे व पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात या  Tiles चे वितरण होत असे.  अर्थात आमच्या गोदामातून पुढे विकल्या जाणार्‍या Tiles ची संख्या तूलनेने कमी असल्याने वाहतूकदारांच्या गोदामापर्यंत त्या पोचवण्याचे काम आम्हालाच करावे लागे.  आमच्या गोदामापासून वाहतूकदारांची गोदामे दीड ते दोन किमी पर्यंत होती.  या अंतराकरिता सुरुवातीला आम्ही छोट्या तीन चाकी बजाज / एपे रिक्षा भाड्याने करीत असू.  ते रू.५०/- इतके भाडे आकारीत.  पुढे हा मार्ग अतिशय खराब व खड्डेमय झाल्याने छोट्या रिक्षा येत नसत. मग मोठ्या मिनीडोअर रिक्षांचा पर्याय उपलब्ध होता परंतू ते रू.१५०/- ते २००/- इतके भाडे आकारू लागले.  शिवाय अनेकदा त्यांची उपलब्धता नसली म्हणजे आम्हाला टाटा ४०७ चा पर्याय वापरावा लागे ज्याचे किमान भाडे रु.३५०/- असे.  इतक्या कमी अंतराकरिता हा खर्च आम्हाला झेपेनासा झाला.

त्यातच आमच्या वितरण संस्थेकडे ज्युपिटर एक्वा लाईन (जल) या मोहाली (पंजाब) स्थित कंपनीच्या Bathroom Fittings च्या वितरणाचेही काम आले.  ही जल कंपनी पटेल रोडवेज  द्वारा Bathroom Fittings पाठवित असे.  पटेल रोडवेज च्या गोदामातून आम्हाला या Bathroom Fittings आमच्या गोदामापर्यंत आणाव्या लागत असत.  थोडक्यात सांगायचे, तर ताथवड्याच्या अंतर्गत भागात लहान अंतरावरील वाहतूकीचा आमचा खर्च वाढू लागला होता.  आता आपल्या वितरण संस्थेला बाहेरच्या वाहनांचा भाड्याचा खर्च करण्यापेक्षा आपले स्वत:चे वाहन घ्यावे असा विचार मी करू लागलो.  नवीन मालवाहू वाहन घेण्यात अर्थ नव्हता, कारण रोजचे वाहतूकीचे अंतर १० किमीपेक्षा अधिक नव्हते.  जुने मालवाहू वाहन घेण्यात अडचण अशी होती की अशी वाहने व्यावसायिक तत्त्वावर चालत असल्याने त्यांचा अतिरिक्त वापर झालेला असून वाहन सुस्थितीत असत नाही व त्याच्या देखभालीचा खर्चही बराच येतो.  त्याशिवाय अजुन एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिक वाहनाला पिवळा क्रमांक फलक असतो.  व्यावसायिक वाहन दरवर्षी तपासणीकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात न्यावे लागते, शिवाय ते चालविण्याकरिता वेगळा परवाना घ्यावा लागतो ज्याचे नूतनीकरण दर तीन वर्षांनी करावे लागते.  या सर्व कारणांमूळे व्यावसायिक वाहन विकत घेण्याचा विचार अर्थातच मागे पडला.

आता पर्याय सुचला तो जीपसारखे एखादे हलके वाहन घेण्याचा.  असे वाहन खासगी नोंदणीक्रमांकासह (पांढरा नोंदणीक्रमांक फलक) येते आणि आपल्या नेहमीच्या वाहतूक परवान्यावर (LMV-NT) चालविले जाऊ शकते.  त्याप्रमाणे जुनी वाहने पाहिली जाऊ लागली आणि  फेब्रुवारी २००६ मध्ये चाळीस हजार रुपयांत एका जुन्या टेम्पो ट्रॆक्स टाऊन ऎन्ड कन्ट्री (१० आसनी) या वाहनाची खरेदी केली गेली.  वाहन संस्थेच्या नावावर खरेदी करावयाचे तर कर दुप्पट द्यावा लागतो असे कळले.  त्यामुळे ह्या वाहनाची खरेदी करताना ते माझ्या वडिलांच्या नावावर नोंदले आणि ती रक्कम मी स्वत:तर्फे खर्च केली.  याउप्पर जेव्हा वाहन गोदामाच्या कामाकरिता वापरले जाईल तेव्हा इंधनाची रक्कम गोदामातर्फे खर्ची टाकावी असे ठरले.

या वाहनात पुढे चालकाशेजारी दोन जण बसण्याची सोय असून मागे तीन आसनांचा एक बाक व त्याही पाठीमागे दोन दोन आसनांचे दोन बाक एकमेकांसमोर पाठीमागच्या दरवाज्याला काटकोनात अशी या वाहनाची आसन रचना होती.

दहा आसनी वाहनात बसणारे दोघेच - मी आणि माझा एक सहकारी.  उरलेल्या मोकळ्या जागेत आम्ही Tiles व Bathroom Fittings घेऊन जात असू.  आमच्या गोदामापासून ताथवडे अंतर्गत जवळच्या अंतरावरील वाहतूकदारांच्या गोदामापर्यंत सामान घेऊन जाण्यासाठी आम्हाला हे वाहन अत्यंत उपयूक्त व किफायतशीर ठरू लागले.  एकदा तर आम्ही त्यामधून १७००  (एक हजार सातशे फक्त) किग्रॆ वजनाचे सामान वाहून आणले.  तसेच हे वाहन ताथवड्यातील गोदामातून माझ्या निगडी येथील घरी जाण्याकरिताही मी वापरीत असे.  अशा प्रकारे या वाहनाने आम्हाला अत्यंत मोलाची सेवा दिली.

पुढे जुलै २००६ मध्ये ताथवडे गाव हे पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत आले आणि तेथेही महानगरपालिकेची जकात लागू झाली तेव्हा वितरणसंस्थेचे गोदाम ताथवड्यातून फुरसूंगी येथे हलविण्यात आले.  अर्थातच व्यवस्थापन देखील इतर व्यक्तींकडे सोपविले गेले.  मीही इतर कामांमध्ये व्यस्त झालो.  वाहन माझ्या घरासमोरच उभे केलेले असायचे.  त्याचा फारसा वापर होत नसे.  इंधन कार्यक्षमता ८ ते १० किमी प्रतिलिटर असल्यमुळे एकट्यादुकट्या व्यक्तिला फिरण्याकरिता ते परवडणे शक्यच नव्हते.  तीन / चार अथवा अधिक लोकांना एकत्र प्रवास करावयाचा असल्यास मात्र आम्ही त्याचा आवर्जून वापर करीत असू.

२५ जानेवारी २००७ रोजी आमच्या एका परिचिताचा विवाहसोहळा संपन्न होणार होता.  त्याच्या आदल्या सायंकाळी म्हणजे २४ जानेवारी रोजी आमचे काही नातेवाईक आमच्या घरी मुक्कामाला येणार होते.  त्यांना निगडी बस स्थानकापासून आमच्या घरी आणण्याकरिता मी व माझी आई असे आम्ही दोघे आमच्या घरून निगडी बस स्थानकापाशी निघालो.  घरापासून निगडी बसस्थानक नेमके १.७ किमी अंतरावर आहे.  पाचेक मिनीटांत आम्ही १ किमी अंतर पार करून अग्नीशामक केन्द्र ओलांडले.  अजून थोडे पुढे आल्यावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (PCNTDA) इमारतीपाशी डावीकडे वळले की १०० मीटर अंतरावर निगडी बस स्थानक आहे.  डावीकडे वळण घेताना वाहन चौथ्या गिअर मधून आधी तिसर्‍या व नंतर दुसर्‍या गिअर मध्ये टाकायचे या विचाराने आधी वेग कमी करावा म्हणून मी प्रथम ब्रेकवर पेडलवर पाय ठेवला.  पेडल कुठल्याही रोधाशिवाय अगदी सहज खालपर्यंत दाबले गेले आणि वाहनाची गती जराही कमी झाली नाही.  क्षणार्धात पुढचा धोका माझ्या लक्षात आला आणि मी जोरात ओरडलो, "आई, गाडीचे ब्रेक फेल झालेत."

अर्थातच आता साधारण ताशी ३५ / ४० किमीचा वेग असल्याने  गिअर देखील बदलता येत नव्हते.   तशाच स्थितीत जेव्हा डावीकडचे वळण आले तेव्हा मी वाहन आपसूक डावीकडे वळविले कारण चौकातून पुढे जाणे किंवा उजवीकडे वळणे म्हणजे अधिकच वर्दळीत घुसावे लागले असते.  डावीकडे वळताना निदान काही अडथळा तरी नव्हता.  डावीकडे वळाल्यावर वेग अजूनच वाढला कारण या रस्त्यावर अतिशय तीव्र उतार होता.   रस्त्यावर अनेक पादचारीही होते.  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्या आईनेही लोकांना ओरडून गाडीचे ब्रेक फेल आहेत हे सांगितले.  सगळीकडे एकच गोंधळ उडाला.  आता या गोंधळामुळे लोक गडबडले आणि त्यातला एक जण बावचळून नेमका अगदी माझ्या वाहनासमोरच आला.

आता हा समोरचा इसम आपल्या वाहनाखाली सापडणार या कल्पनेनेच मी कमालीचा हादरलो आणि अगदी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी त्याप्रमाणे मी स्वत:च्याही नकळत स्टीअरिंग पूर्ण ताकदीनिशी (पॊवर स्टीअरिंग नसल्याने ताकद जास्त लावावी लागत असे) डावीकडे फिरविले. फार मोठा आवाज होऊन माझे वाहन थांबले होते.  घडले असे की, डावीकडे काही वाहने पदपथाला खेटून रांगेत उभी होती.  त्यापैकी एका इंडिकाला माझे वाहन धडकले.  इंडिकाचे उजव्या बाजूचे दोन्ही दरवाजे व बॊनेटचा काही भाग चेपला जाऊन माझे वाहन पुढे असलेल्या एका मारूती वॆगनार वर धडकून तिचा डिकीचा भाग ही चेपला होता. त्यानंतर माझे वाहन या दोन वाहनांच्या फटीतून आत घुसून पदपथावर आदळले होते. वाहनाचे उजवे चाक निखळून बाहेर आले होते.  अर्थात ह्या सर्व घटना अक्षरश: क्षणार्धात घडल्या होत्या.  वाहनातून खाली उतरून आजुबाजूला पाहिल्यावर काही मिनीटांनी मला ह्या सर्व बाबी ध्यानात आल्या.

समाधानाची बाब म्हणजे कुठल्याही व्यक्तिला किंचितसा धक्काही बसलेला नव्हता.   उभ्या असलेल्या वाहनांचे अर्थात निर्जीव वस्तूंचे मोल रुपया पैशात चूकते करता येऊ शकते.  परंतु कोणत्याही सजीवास इजा झाली तर ते नुकसान कसे भरून काढणार?  अर्थात असा अपराध माझ्या हातून घडला नाही म्हणून मी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि बाजूला जमलेल्या गर्दीला उद्देशून आधी दिलगिरी व्यक्त केली आणि मग या वाहनांचे मालक कोण आहेत याबाबत चौकशी केली.  गर्दीतले लोकही समजूतदार होते.  त्यांनी आधी मला ही खात्री करून दिली की पादचार्‍यांपैकी कोणीही जखमी झालेले नाहीत.  तसेच त्यांनी मला व माझ्या आईला काही इजा झाली आहे का याची विचारणा केली आणि आधी थोडा वेळ शांत बसण्यास सांगितले.  आईच्या हाताला खिडकीचा पत्रा लागून किरकोळ जखम झाली होती.  तिला जखमेवर रुमाल बांधून बसस्थानकावर पाठविले.  ती आमच्या नातेवाईकांना तिथून दोन रिक्षांमधून घरी घेऊन गेली.

इकडे हळूहळू गर्दी पांगली आणि मग मी दोन्ही वाहनांच्या मालकांचा शोध घेऊ लागलो.   काही वेळाने इंडिकाचा चालक समोर आला.  "तुला दिसत नाही का? अशी कशी गाडी ठोकलीस?" वगैरे चालू झालं.  मी त्याला शांतपणे सांगितले की झालेले नुकसान मी भरून देईन आधी मालकाला समोर बोलवा.  त्याप्रमाणे काही वेळातच मालकाला बोलावून घेतले.  आधी शांतपणे आम्ही दोघांनीही एकमेकांची ओळख करून घेतली.  त्याचे नाव त्याने शेख असे सांगितले.  मीही माझे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक  ही माहिती त्यास दिली.  "मग आता कसे करायचे बोला." त्याने मुद्यावर येत विचारले.  मीही त्यास सांगितले की माझ्या वाहनाचा तृतीय पक्ष विमा असल्यामुळे विमा कंपनीकडून त्याला संपूर्ण भरपाई मिळेल.  त्यावर त्याने याकरिता काय करावे लागेल हे विचारले.  त्यावर मी आधी विमा कंपनीत संपर्क केला.  साडेपाच वाजले होते आणि कार्यालय बंद व्हायची वेळ आली होती.  समाधानाची बाब म्हणजे व्यवस्थापक पहिल्याच प्रयत्नात दूरध्वनीवर हजर झाले. त्यांनी आधी अपघाताचा पोलिस पंचनामा करण्याची सूचना केली.

त्यावर मी श्री. शेख यांना आपण निगडी पोलिस ठाण्यात जाऊ असे सूचविले. त्यावर त्यांनी पोलिसांनाच इथे बोलावून घेतो असे सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्कही केला.  तिथले हवालदार जानराव यांच्याशी श्री. शेख यांचा परिचय असल्याचे त्यांनी सांगितले.  पोलिसांशी ओळख कशी काय? हे मी विचारले असता श्री. शेख उत्तरले की त्यांच्या CREATIVE ACADEMY या शिकवणी वर्गात बाहेरचे काही समाजकंटक येऊन विद्यार्थिनींना छेडतात त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता पोलिस ठाण्यात यावे लागल्याने पोलिसांसोबत ओळख झाली.  अधिक माहिती घेतली असता श्री. शेख हे पूर्वी टाकळकर क्लासेस, निगडी येथे ही शिकवत असल्याचे कळले.  तेव्हा मी त्यांना त्यांची व माझी १४ वर्षांपूर्वीच भेट झाल्याचे निदर्शनास आणून दिले.  आता वातावरणात मोकळेपणा आला होता.  त्यांनीही मला सध्या काय चालु आहे असे विचारले. तेव्हा मी नुकताच वितरण व्यवस्थापकाच्या जबाबदारीतून मोकळा झालो असल्याचे सांगितले.  आता औद्योगिक सल्लागार म्हणून कार्यरत असून सायंकाळच्या वेळी खासगी शिकवणी वर्गही घेत असल्याचे सांगितले.  त्यावर त्यांनी आमच्या CREATIVE ACADEMY त देखील ये असे आमंत्रण दिले.

आमचे बोलणे चालू असतानाच हवालदार जानराव तेथे आले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.  ही दोन्ही वाहने तातडीने पोलिस ठाण्याच्या आवारात घेऊन या असे त्यांनी सांगितले.  श्री. शेख यांची इंडिका बर्‍यापैकी चेपली असली तरीही तिचा चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडला गेला आणि किल्ली फिरवताच ती सुरूही झाली.  त्यानंतर ती लगेच पोलिस ठाण्याच्या आवारात हलविली गेली.  माझे वाहन मात्र सुरू होण्याच्या स्थितीत नव्हते.  मी घरी संपर्क करून वडिलांना बोलावून घेतले.  वडिल स्कूटर घेऊन आले.  मग त्यांच्यासोबत जाऊन मी क्रेनची शोधाशोध केली.  क्रेनचालकाला पाचशे रुपये देऊन माझे वाहन पोलिस ठाण्याच्या आवारात खेचून आणले.  आत गेल्यावर घटनेचा वृत्तांत लिहीण्यास सुरुवात झाली.  मी सर्व घटनाक्रम कथन केला.  त्यानंतर इंडिकाचालकास तुमच्या वाहनाचे किती  नुकसान झाले असे विचारले असता त्याने तीन हजार रुपयांचे असे उत्तर दिले.  त्यावर हवालदार जानरावांनीच अरे इतके कमी कसे असेल? असे म्हणत चल मी सात हजार लिहीतो असे म्हणत सात हजार लिहीले देखील.  श्री. शेख नेमके हा वृत्तांत लिहीते वेळी तिथे हजर नव्हते.  इतक्या कमी रकमेचे नुकसान त्यांनी मान्य केलेच नसते.  त्यानंतर आम्हा दोघा वाहन चालकांचे परवाने पोलिसांनी स्वत:कडे जमा करून घेतले व वाहनाची मूळ कागदपत्रे जमा करण्यास सांगितले.  माझ्या वाहनात नेहमीच मूळ कागदपत्रांच्या छायाप्रती असतात आणि घरात मूळ कागदपत्रे.  काही वेळातच मी घरून मूळ कागदपत्रे आणून ती पोलिसांच्या स्वाधीन केली.  वाहनाची मूळ कागदपत्रे मिळताच पोलिसांनी माझा परवाना मला परत केला.  श्री. शेख यांच्या वाहनाची मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने त्यांच्या चालकाचा परवाना पोलिसांनी स्वत:जवळच ठेवून घेतला.

आता पंचनामा करण्याचे काम पोलिस दुसर्‍या दिवशी करणार असे त्यांनी सांगितले. तथापि दुसरा दिवस अर्थात २५ जानेवारी रोजी आमच्या परिचितांचा विवाह सोहळा, त्यानंतर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुटी होती.  पोलिसांनी सांगितले की, पंचनामा लिहीण्याचे काम आम्ही आमच्या सोयीने करून घेऊ तुम्ही यायची गरज नाही.  आता थेट न्यायालयात ज्या दिवशी जायचे त्याच दिवशी तुम्ही पोलिस ठाण्यात या.  आम्ही तुम्हाला तसे कळवू.  आता कुठलीही चिंता न करता घरी जा.  लवकरच पुन्हा भेटूयात.

त्यानंतर २५ तारखेचा विवाहसोहळा २६ चा प्रजासत्ताक हे दिवस निघून गेले.  दिनांक २७ जानेवारीच्या सायंकाळी माझ्या घरच्या दूरध्वनीवर (त्या काळी माझ्यापाशी भ्रमणध्वनी संच नव्हता) श्री. शेख यांनी संपर्क केला आणि मला तातडीने त्यांच्या CREATIVE ACADEMY या शिकवणी वर्गावर बोलवून घेतले.  त्याप्रमाणे मी तिथे गेलो असता आधी हवापाण्याच्या गप्पा झाल्या आणि मग ते मुद्द्यावर आले.

शेख: पोलिस ठाण्यात पुन्हा जाऊन आलास का?
मी: नाही.
शेख: मी जाऊन आलो.  ते मला तीन हजार रुपये मागत होते.
मी: कशाबद्दल?  अपघात तर तुमच्या वाहनाकडून झालेला नाही, उलट तुम्ही तर पीडित आहात.
शेख: तरीपण पोलिसांना पैसे द्यावेच लागतात.
मी: हो पण तुमची तर त्यांच्याशी ओळख आहे ना?
शेख: अरे, ओळखीचं काय घेऊन बसलास; पोलिस तर स्वत:च्या सख्या बापालाही सोडत नाहीत.  तुला अजून बोलावले कसे नाही?  तुझ्याकडूनही ते पैसे मागणार आहेतच.
मी: माझ्याकडून? ते कशाबद्दल?
शेख: अरे, तुझी गाडी तू चालवत नसून तू फक्त शेजारी बसला होतास आणि कोणी तरी एक बाई तुझी गाडी चालवत होती.  पोलिसांकडे तसे सांगणारा एक साक्षीदार देखील आहे -  समोरच्या सावली उपाहारगृहातला एक कर्मचारी.

हे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटले.  एक तर त्या दिवशी माझ्या सोबत माझी आईच फक्त वाहनात होती.  पन्नाशीची महिला टेम्पो ट्रॆक्स सारखे अवघड वाहन कशाला चालवेल?  शिवाय त्या दिवशी अपघातानंतर आई लगेचच निघून गेली होती.  श्री. शेख किंवा त्यांच्या चालकाने तिला पाहिलेच नव्हते.  पोलिस तर बरेच उशिरा आले होते त्यांना तर अपघाताच्या वेळी आईच्या वाहनात असण्याविषयी काही ठाऊक असणे शक्यच नव्हते.  तरीही आता श्री. शेख जे काही सांगत होते ते ऐकल्यावर पोलिसांचा काहीतरी डाव असणार असा मला संशय आला.  एक तर माझ्या वाहनाचा तृतीय पक्ष विमा उतरविलेला होता (जो की कायद्याने बंधनकारक आहे) त्यामुळे माझ्या वाहनामूळे जर कोणाचे काही नुकसान झाले तर ते विमा कंपनी माझ्यातर्फे भरून देणार.  परंतु जर अपघातावेळी वाहन चालविणार्‍या व्यक्तीकडे वैध परवाना नसेल तर मात्र विमा कंपनीची जबाबदारी संपली.  अशा वेळी नुकसान भरपाई करुन देणे वाहन मालकावरच बंधनकारक असते.  अर्थात माझी आई वाहन चालवित होती असा पंचनामा पोलिसांनी तयार केला तर ते मला मोठे नुकसानीचे ठरणार होते.  तरी याविषयी श्री. शेख यांचेसोबत अधिक चर्चा न करता मी तेथून निघून आलो.

त्यानंतर २९ जानेवारी २००७ रोजी मला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.  मी नको म्हणत असतानाही वडिलांनी सूटी घेतली आणि तेही माझ्यासोबत आले.  पोलिस ठाण्यात पोचताच हवालदार जानरावांनी आमचे हसून स्वागत केले.  हल्ली पंच म्हणून प्रतिष्ठीत व्यक्ती मिळविणे किती अवघड जाते, लोकांना आग्रह करकरून बोलवावे लागते, मोठ्या कष्टाने पंचनामा बनवावा लागतो. या पंचांच्या चहापाण्याचा खर्चही पोलिसांनाच करावा लागतो वगैरे रडकथा जानरावांनी ऐकविली.  तर आमच्या वाहनाच्या अपघाताचा पंचनामा करण्याचा काही मेहनताना त्यांना हवा होता असे त्यांनी शेवटी प्रत्यक्षच सांगितले.  मी अशी कुठलीही रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली.  त्यावर "आम्ही तुमची केस कोर्टात कशी प्रेझेंट करू त्यावर तुम्हाला काय दंड होईल ते अवलंबून आहे.  तेव्हा तुम्ही आमची सोय पाहा, आम्ही तुमची सोय बघतो" अशी मखलाशी जानराव हवालदारांनी केली.

मी विचार करायला थोडा वेळ मागून घेतला आणि बाहेर जाऊन सार्वजनिक दूरध्वनी केंद्रावरून वकिलांना संपर्क केला.  वकीलांनी सांगितले, "अशा केसेसमध्ये पोलिस जे सांगतात त्याप्रमाणेच करा, फायद्यात राहाल.  गुन्हा कबूल केला तर आर्थिक दंड होईल आणि फार तर कोर्ट उठेपर्यंत कोर्टातच बसवून ठेवतील.  गुन्हा कबूल नाही म्हणालात तर जामिन घ्यावा लागेल, वकील द्यावा लागेल.  वकीलाची फी, प्रत्येक तारखेला हजर राहणे यात मोठा खर्च होईल आणि यातून इतकेच सिद्ध करता येईल की वाहनाचे ब्रेक फेल झाले यात तुमचा दोष नव्हता सबब तुम्हाला आर्थिक दंड होणार नाही. अर्थात पोलिसांनी जर केस चूकीच्या पद्धतीने प्रेझेंट केली असेल तर तो दंड देखील टाळता येणार नाहीच."

"पण समजा मी आता न्यायालयात गुन्हा कबूल आहे असे म्हंटले आणि मला तुरूंगवास झाला तर?" मी एक शंका व्यक्त केली.

"असे काही होणार नाही" वकील हसून उत्तरले, "तुम्ही पोलिसांचे ऐका, ते तुम्हाला सहकार्य करतील."

वकिलांसोबतचे संभाषण आटोपून हताश मनस्थितीत मी पोलिस ठाण्यात पोचलो.  माझा चेहरा पाहूनच वडील काय समजायचे ते समजले आणि त्यांनी चटकन पाचशे रूपये हवालदार जानरावांना दिले.  पाचशे रुपये मिळताच जानराव एकदम खूश झाले.  मग त्यांनी अजून एका हवालदाराला बोलावले.  "हे मुंगसे हवालदार.  यांच्यासोबत उद्या तुम्ही कोर्टात जा."  मग वडिलांनी मुंगसे हवालदारासोबत अजून काही बातचीत केली.  त्यात वडिलांच्या बालपणी त्यांच्या नेवासा तालुक्यातील देडगाव येथील शाळेत कोणी मुंगसे नावाचे शिक्षक होते त्यांचा उल्लेख झाला.  त्यांच्या संदर्भाने या मुंगसे हवालदाराची आणि वडिलांची ओळख निघाली.  त्यानंतर मुंगसे यांनी वडिलांना दुसर्‍या दिवशी निश्चिंत होऊन कामावर जायला सांगितले आणि मी एकट्यानेच मुंगसे हवालदारासोबत न्यायालयात जायचे असे ठरले.

३० जानेवारी २००७ रोजी मी सकाळी १० वाजताच निगडी पोलिस ठाण्यात पोचलो.  मुंगसे हवालदार तिथे हजर होतेच.   मुंगसे हवालदार म्हणजे कमालीचा सभ्य माणूस.  बाहेर कुठे गणवेशाशिवाय भेटले तर ते पोलिस कर्मचारी आहेत हे सांगुनही कुणाला पटलं नसतं.  तर मुंगसे मला म्हणाले, "चला तुम्ही पुढे कोर्टात आम्ही येतच आहोत मागून.  पिंपरी कोर्ट माहीत आहे ना तुम्हाला?"  "

"नाही.  पिंपरी न्यायालयात जायचा कधी संबंध आला नाही.  ग्राहक न्यायालयात काही वर्षांपूर्वी गेलो होतो पण ते पुण्यात आहे, पिंपरीत नाही.  शिवाय न्यायालयात मी तुमच्या गाडीतून जाणार ना?  एकटाच कसा जाऊ?"

"आमच्या या गाडीतून?" समोर उभ्या असलेल्या एका गडद निळ्या व्हॆन कडे निर्देश करीत ते म्हणाले, "नाही या गाडीतून आम्ही तुम्हाला कसे नेणार?  या गाडीतून आम्ही बरेच खतरनाक आरोपी घेऊन जात आहोत.  तुम्ही आमच्या मागे मागे तुमची गाडी घेऊन या."

मग पुढे आरोपींना घेऊन जाणारी, खिडकीला जाळी लावलेली पोलिस व्हॆन, आणि त्यापाठोपाठ बुलेटवर मी अशी आमची वरात निघाली.  वीसेक मिनिटांत आम्ही पिंपरी न्यायालयाच्या आवारात पोचलो.  तिथे पोचता क्षणी अनेक जणांनी पुढे येऊन व्हॆनला गराडा घातला.  बंदोबस्तावरील पोलिसांनी लाठ्या उगारून त्या लोकांना पांगवून लावले.    व्हॆनमधून आलेल्या आरोपींचे ते नातेवाईक होते.  त्यानंतर  व्हॆनचा दरवाजा उघडून पोलिस आरोपींना न्यायालयात घेऊन जाऊ लागले.  त्यांच्यापाठोपाठ मीही निघालो.

मला पाहताच मुंगसे उद्गारले, "तुम्ही कुठे आमच्याबरोबर येताय?"  "कुठे म्हणजे? अर्थातच न्यायालयात."  मी आश्चर्याने उत्तरलो.  "चला माझ्याबरोबर" असे म्हणत मुंगसे मला हाताला धरून बाहेरच्या दिशेने निघाले.  एका टपरीवजा हॊटेलात त्यांनी मला बसविले.  "ते सगळे, चोरी, दरोडी, मारामारी, बलात्कार, खून प्रकरणांमधले आरोपी आहेत.  त्यांच्याबरोबर तुम्ही कुठे आत येता?  तुमचा नंबर यायला अजून खूप वेळ आहे.  नंबर आला की मी स्वत: तुम्हाला बोलवायला येईल.  तोपर्यंत इथे बसून घ्या.  चहा नाष्टा उरकून घ्या हवं तर."  इतके बोलून मुंगसे हवालदार न्यायालयाच्या दिशेने निघून गेले.

मी त्या टपरीत बसलो असताना माझ्याजवळ काळ्या कोटातील तीन वकील आणि दोन नोटरी येऊन गेले.   माझं न्यायालयात काही काम असल्यास ते अतिशय किफायतशीर दरात करून द्यायची तयारीही त्यांनी दर्शविली.  अर्थात मला त्यांना विन्मुख परतविण्याशिवाय गत्यंतर नव्हते.  थोड्या वेळात मुंगसे हवालदार येताना दिसले.   आपल्या नावाचा न्यायालयात पुकारा केला असावा या कल्पनेने मी लगबगीने उठू लागलो  तोच मुंगसे जवळ येत मला पुन्हा बसायला सांगू लागले.  मुंगसे मला न्यायालयात घेऊन जाण्याकरिता आले नसून माझ्यासारखाच अजून एक तथाकथित "सभ्य आरोपी" घेऊन ते त्याला माझ्याशेजारी बसविण्याकरिता आले होते.  ह्या नवीन आरोपीचा गुन्हा काय तर त्याने त्याच्या मालकीचे देशी दारूचे दुकान रात्री नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक काळ उघडे ठेवले होते.  तर अशा आरोपीला खून, मारामारी, बलात्कार, चोरी प्रकरणातील आरोपींसोबत कसे बसविणार?  म्हणून तोही माझ्यासारखाच इथे टपरीत बसणार.

अजून साधारण दोन तास तिथे कंटाळवाण्या अवस्थेत बसून काढल्यावर मुंगसेंनी मला बोलावून घेतले.  न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले, "हे पाहा, कोर्ट तुम्हाला विचारेल - गुन्हा कबूल आहे का? तर मनात कुठलीही शंका आणू नका.  सरळ "कबूल आहे" म्हणा.  नाही म्हणालात तर फार अडचण होईल - तुमचीही आणि आमचीही."  त्यांचे बोलणे संपता संपताच आम्ही न्यायालयात प्रवेश करते झालो.  न्यायालयात चिकार गर्दी होती.  काही जण बसलेले आणि अनेक जण उभेही होते.  अशातच एका अगदी किनर्‍या आवाजात माझ्या नावाचा पूकारा झाला.  पाठोपाठ "गुन्हा कबूल आहे का?" अशी विचारणा झाली.  मी "गुन्हा कबूल आहे" असे सांगताच पुन्हा त्याच आवाजात "आरोपी कोण आहे? मला दिसत नाहीये.  जरा इथे समोर या" अशी सूचना झाली.  खरे तर मलाही इतक्या गर्दीमुळे न्यायाधीश कोण आहे ते दिसत नव्हते.  सूचनेसरशी मी समोर एकदम पुढे गेलो तर न्यायासनावर एक अतिशय लहान चणीची नाजूक दिसणारी तरूणी बसलेली होती.  तिला पाहिल्यावर माझ्या कल्पनेतल्या न्यायाधीशाच्या प्रतिमेत ती कुठेही बसत नसल्याचे जाणवले.  माझ्याकडे आश्चर्याने पाहत तिने पुन्हा मला गुन्हा कबूल आहे का असे विचारले.  कदाचित मीही तिच्या आरोपीच्या कल्पनेत कुठे बसत नसेल.  मी परत एकदा गुन्ह्याची कबूली दिल्यावर मला एका कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले.  मी स्वाक्षरी केल्यावर मुंगसेंनी मला पुन्हा बाहेर टपरीपाशी जाण्यास सांगितले.

थोड्याच वेळात मुंगसेही टपरीपाशी आले आणि मला अगदी आनंदात म्हणाले,"चला झाली तुमची सुटका.  आताच दंड भरून आलो.  किती दंड झाला असेल याची काही कल्पना आहे का तुम्हाला?"  मला अर्थातच काहीच कल्पना नव्हती, पण मुंगसे पुन्हापुन्हा माझा अंदाज विचारत होते तेव्हा "झाला असेल चार पाचशे रुपये" असा माझा एक अंदाज मी ठोकून दिला.  "फक्त शंभर रुपये." असे म्हणत मुंगसेंनी माझ्या हाती दंडाची पावती दिली.  "हे कसे काय शक्य आहे?" मी विचारले.  "इतक्या साध्या केसमध्ये कोर्ट थोडीच स्वत:चं डोकं लावतं?  हा दंड किती आकारायचा हे आम्ही म्हणजे पोलिसांतर्फे मी आणि कोर्टातर्फे त्यांचे भाऊसाहेब आणि कारकूनच ठरवतात आणि या ठरलेल्या दंडाच्या पावतीवर कोर्ट सही करतं.  शिवाय कोर्टानं काही शंका व्यक्त केलीच तर अडचण नको म्हणून आम्ही पंचनाम्यात अपोझिट पार्टीच्या गाडीचे दरवाजे खरडले जाऊन फक्त पाचशे रुपयाचं नुकसान झाल्याचं दाखवलं होतं.  शिवाय त्याची गाडीही नोपार्किंग मध्ये उभी होती ही गोष्ट देखील तितकीच खरी होतीना? थोडक्यात तुमची चूक अतिशय किरकोळ असल्याचंच आम्ही प्रेझेंट केलं.  त्याचप्रमाणे तुम्ही पहिल्याच सुनावणीत गुन्ह्याची कबूली दिलीत.  तारखांवर तारखा पाडून कोर्टाचा वेळ वाया घालवला नाहीत यावरही कोर्ट समाधानी झालं.  अर्थात यासाठी मला दोन कारकूनांना प्रत्येकी शंभर रुपये आणि भाऊसाहेबांना दोनशे रुपये द्यावे लागले."  एकूण बेरीज करून मी मुंगसेंना पाचशेची नोट काढून दिली.  "हे तर झाले कोर्टातले, मला काही नको का?" मुंगसेंनी अगदी गरीब चेहरा करीत विचारले.   "किती देऊ?" मी चेहरा शक्य तितका कोरा ठेवीत विचारले.  "तुम्ही जे द्याल ते मी खुशीने घेईल."  मुंगसेंनी पुन्हा चेंडू माझ्याच कोर्टात टाकला.  मी निमूटपणे दोनशे रुपये काढून मुंगसेंच्या हाती दिले.  ते घेऊन मुंगसे आनंदाने निघून गेले आणि मीही माझ्या घरी निघून आलो.

तिसर्‍याच दिवशी सायंकाळी श्री. शेख यांनी मला दूरध्वनीवर संपर्क केला.  पुन्हा त्यांच्या शिकवणी वर्गावर मला बोलावलं.  त्याप्रमाणे मी तिथे गेलो.  शेख यांनी मला पैशाची मागणी केली.  त्यांची इंडिका त्यांनी टाटा च्या बीयू भंडारी यांच्या अधिकृत सेवा केन्द्रात दुरूस्ती करिता दिली होती.   तिथे त्यांना दुरूस्तीखर्चाचा अंदाज नव्वद हजार रुपये इतका सांगितला गेला होता.  अर्थात त्यांच्याकडे इतकी रक्कम नसल्यामुळे त्यांनी दुरूस्ती प्रलंबित ठेवली होती त्यामूळे त्यांना वाहनतळावर वाहन उभे करण्याचा खर्च म्हणून रोजचे २५० रुपये द्यावे लागत होते.   तरी त्यांनी इतका प्रचंड खर्च करण्यापेक्षा बाहेरच्या गॆरेज मध्ये दुरुस्ती करायचे ठरविले होते.  हा खर्चही साधारण पन्नास ते साठ हजार रुपये होता. ही रक्कम त्यांना माझ्याकडून अपेक्षित होती.  मी अर्थातच ही रक्कम त्यांना देण्यास असमर्थता दर्शविली.  ही रक्कम त्यांना माझ्या विमा कंपनीकडून मिळेल असे मी त्यांना आश्वासन दिले.  तरीही पुन्हा रोज रोज त्यांची या रकमेकरिता दूरध्वनीवरून विचारणा होऊ लागली.

या रोजच्या कटकटीला कंटाळून मी एक दिवशी पोलिस ठाण्यात गेलो आणि पोलिसांना हा सारा प्रकार कथन केला.  "अरे अशी कशी काय तुमच्याकडून नुकसान भरपाई मागू शकतात ते?" पोलिस तावातावाने बोलू लागले, "तुम्ही कायदेशीर रीत्या पोलिसांकडे आलात, पोलिसांनी तुम्हाला आरोपी केले.  कोर्टात नेले, कोर्टाने तुम्हाला दोषी ठरविले.  त्या दोषाची शिक्षाही दिली.  ती शिक्षाही तुम्ही भोगलीत (अर्थात शंभर रुपये दंड भरला).  आता तुम्ही शिक्षा भोगून झालेले एक सामान्य नागरिक आहात आणि तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही.  दिलाच तर आम्ही तुम्हाला पूर्ण संरक्षण देऊ.  त्या शेखचा मोबाईल नंबर आम्हाला द्या.  पुन्हा परत तुम्हाला त्याचा फोन येणार नाही ही आम्ही तुम्हाला खात्री देतो."

आणि खरंच त्यानंतर पुन्हा श्री. शेख यांनी मला आजतागायत संपर्क साधला नाही.  आता या सर्व प्रकरणातील तांत्रिक बाबी अशा की, माझ्या वाहनाने श्री. शेख यांच्या वाहनास धडक दिली.  माझ्या वाहनाचा चालक म्हणून माझ्यावर पोलिस फौजदारी खटला भरणार, पण प्रत्यक्षात पोलिस दोन्ही वाहनांची बाजू तपासतात.  माझ्या वाहनाचा चालक म्हणून मी इंडिकाला धडक देताना चूकलो हे खरेच. परंतु, श्री. शेख यांची इंडिका ही अशा जागी रस्त्यावर उभी होती जिथे वाहने लावण्यास मनाई आहे, तरीही वाहने लावल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होते.  दुसरी बाब अशी की रस्त्यावर धावणारे वाहन इतर वाहनांचे / व्यक्तिंचे किती नुकसान करू शकेल याची काहीच गणती नाही.  म्हणजे असे की एखाद्या पन्नास हजार रुपये किंमतीच्या दुचाकीने एखाद्या मासिक एक लाख रुपये वेतन कमा‍वणार्‍या संगणक अभियंत्याला मृत्युमूखी पाडले तर त्याचे वारसदार सहज अडीच तीन कोटी रुपये नुकसान भरपाई मागू शकतात आणि ती रास्त असल्यामुळे द्यावीही लागते. दुचाकीमालक इतकी रक्कम कोठून आणणार?  याकरिता रस्त्यावर धावणार्‍या प्रत्येक वाहनास तृतीय पक्ष विमा बंधनकारक आहे.  वाहनमालकातर्फे विमा कंपनी ही भरपाई पीडित व्यक्तीला देते.  त्याचप्रमाणे जर आपण वाहनाचा संपूर्ण विमा (Comprehensive Policy) उतरविला असेल तर विमा कंपनी आपल्या वाहनाला झालेला दुरुस्ती खर्चही देते.  श्री. शेख यांचे वाहन कर्जात होते.  अशा वाहनांना संपूर्ण विमा (Comprehensive Policy)  बंधनकारक असतो.  तो श्री. शेख यांनी उतरविला नव्हता.  त्याचप्रमाणे कायद्याने बंधनकारक असलेला किमान तृतीय पक्ष विमा देखील त्यांनी उतरविला नव्हता.  इतकेच नव्हे तर त्यांचे वाहन हे त्यांच्या स्वत:च्या नावावर नव्हते.  ते कोणा विकास रोकडे यांच्या नावावर होते.  या सर्व बाबी फौजदारी खटल्याच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आल्या होत्या.

फौजदारी खटल्याचा निकाल लागल्यावर त्या निकालाची प्रत घेऊन दिवाणी न्यायालयात पीडिताने नुकसानभरपाईचा दावा दाखल करायचा असतो.  हा दावा अपघा‍त घडवून आणणार्‍या वाहनाच्या चालकावर नव्हे तर मालकावर दाखल करायचा असतो.  (म्हणजे आमच्या संदर्भात माझ्या वडिलांवर - कारण वाहन त्यांच्या नावावर होते).  त्यानंतर या अपघात घडवून आणणार्‍या वाहनमालकाच्या वतीने त्याची विमा कंपनी दिवाणी न्यायालयात खटला लढते.  जर कंपनी हरली तर न्यायालयाच्या आदेशानुसार ठरेल ती नुकसान भरपाई विमा कंपनी अपघात पीडितास देते.  आमच्या संदर्भात श्री. शेख हा कायदेशीर मार्ग चोखाळू शकत नव्हते कारण फौजदारी खटल्यात त्यांचे इतके दोष नमूद करण्यात आले होते की दिवाणी दावा जिंकणे त्यांना अशक्यच होते.  त्यामुळेच ते थेट माझ्याकडून  काही नुकसानभरपाई मिळू शकते का हे पाहात होते.  मी पोलिसांची मदत घेतल्यामुळे त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी झाला.

या घटनेत माझ्याकडून व श्री. शेख यांच्याकडूनही काही चूका झाल्या. त्या चूकांवरून बोध घेऊन मी काही नियम कटाक्षाने पाळतो.


 1. जुनाट जड वाहन वापरण्यापेक्षा नवीन, हलके वाहन (जसे की माझी आताची मारूती ओम्नी) वापरणे जेणेकरून त्याची उपद्रव क्षमता किमान असेल.
 2. वाहनाचा कायम संपूर्ण विमा उतरविलेला असणे.  (संपूर्ण विम्यात तृतीय पक्ष विमाही समाविष्ट असतो.)
 3. शक्यतो गर्दीच्या रस्त्यावरून पूर्णपणे बाहेर पडत नाही तोवर चौथ्या गिअरमध्ये वाहन न पळविणे.  ब्रेक कधीही दगा देऊ शकतात अशा वेळी खालच्या गिअरमध्ये गती झटकन नियंत्रणात आणता येते.
 4. आपल्या हातून इतके करूनही जर चूक घडलीच तर आधी पोलिसांना माहिती देणे कारण इतर कुठल्याही देशाप्रमाणेच आपली न्यायव्यवस्था आरोपीला संरक्षण देते.


Friday 21 February 2014

क्रेझी जर्नी (अर्थात धुळे दिल्ली आणि दिल्ली धुळे प्रवास थेट)

१० फेब्रुवारी २०१० रोजी मी मारूति-सुझुकी इंडिया लिमिटेड च्या माय कार पुणे प्रायवेट लिमिटेड या वितरकाकडून आठ आसनी ओम्नी हे वाहन खरेदी केले.  वाहनाचा वापर सुरुवातीपासूनच अतिशय कमी राहिल्यामुळे वाहनाची हमी (वॉरंटी) ४०,००० किमी अथवा दोन वर्षे अशी असली तरीही वाहन सुरुवातीच्या दोन वर्षांत केवळ १३००० किमीच वापरले गेले होते.  

३० जुलै २०१२ रोजी कामानिमित्त पुण्याहून धुळे येथे राहावयास आल्यानंतर निवास आणि कार्यालय एकाच आवारात असल्यामुळे वाहनाचा वापर तर केवळ तीन / चार महिन्यातून एकदा पुण्याला जाण्यासाठीच होऊ लागला.  इमारतीच्या आतील वाहन तळात एकदा वाहन उभे केले म्हणजे कित्येकदा तर ते सलग तीस-चाळीस दिवस सुरू देखील केले जात नसे.  एका जागी उभे राहून टायर्सची झीज होऊ नये म्हणून मीच वाहन हाताने ढकलून मागे पुढे करायचो.   वाहनाची २+२ वर्षी अशी अतिरिक्त हमी देखील ६०००० किमी पर्यंत असूनही डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत वाहन केवळ २१००० किमीच वापरले गेले होते.

वाहनाच्या हमी कालावधीत आतापर्यंत दोनवेळा क्लच प्लेट, एकदा स्टीअरिंग गिअर बॉक्स, एकदा शॉक ऍब्सॉर्बर, एकदा वायपर मोटर आणि इतरही काही लहान मोठे सुटे भाग बदलून घेतले होते. 

१० फेब्रुवारी २०१४ ला वाहनाचा हमी कालावधी संपण्यापुर्वी त्याचा अजून थोडा जास्त वापर झाला तर हमी कालावधीत अजून काही सुटे भाग बदलून घेता आले असते.  

दरम्यानच्या कालावधीत पत्नीनेही अनेकदा तिच्या माहेरी दिल्लीला आम्ही दोघांनी जायला हवे असे सूचविले होते.  एप्रिल २०१२ मध्ये विवाह झाल्यापासून अथवा त्यापूर्वीदेखील एकदाही मी तिचे घर पाहिले नसल्याची तिची तक्रार होती.  त्याशिवाय ती दिल्लीत नोकरी करीत असताना तिने शीतकपाट (रेफ्रिजरेटर), धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन), अतिसुक्ष्म लहर भट्टी (मायक्रोवेव्ह ओव्हन), विविध विषयांवरील अनेक पुस्तके, एअरोबिक्स स्टेपर, व्हायब्रेशन वेट लूझर,  इत्यादी ज्या वस्तू विकत घेतल्या होत्या त्याही इथे धुळ्यात आणण्याविषयी ती आग्रही होती.  अर्थातच या वस्तू आणावयाच्या म्हणजे  आम्ही आगगाडी अथवा विमानाने दिल्लीला गेलो तरी परतताना एखादा ट्रक भाड्याने करावा लागणार हे उघड होते आणि त्या वस्तूंच्या किंमतीच्या तूलनेत वस्तूंच्या वाहतूकीचा खर्च जास्त होणार हे उघड होते.  

तेव्हा काही ठळक मुद्दे विचारात घेतले ते असे:-
 1. आम्ही दोघे दिल्लीला जर विमानाने गेलो तर जाऊन येऊन किमान वीस हजार रूपये इतका खर्च येणार.  आणि दिल्लीला पत्नीच्या माहेरी किमान एकदा तरी मला जाणे भाग आहेच.
 2. ओम्नी वाहनाचा अजून काहीसा वापर हमी कालावधी पूर्वी करणे भाग आहे.
 3. पत्नीने माहेरी जमविलेल्या वस्तू धुळ्यात आणणे ही तितकेच आवश्यक आहे. 
वरील तीन मुद्यांपैकी मुद्दा क्रमांक दोन हा माझ्या इच्छेचा भाग होता आणि मुद्दा क्रमांक एक व तीन हे माझ्या पत्नीच्या इच्छेचा भाग असल्यामुळे अनिच्छेने का होईना परंतु मला ते मान्य करणे भाग होते.  तेव्हा या तीनही गोष्टी साध्य व्हाव्यात या उद्देशाने मी माझे ओम्नी वाहन घेऊन दिल्लीला जायचे ठरविले.  या आठ आसनी वाहनात सर्वात सुरुवातीला चालक व सहचालकाची दोन सुटी आसने आहेत त्यांच्या बरोबर पाठीस लागून  तीन आसनांचा एक एकत्रित बाक आहे ज्याची दिशा विरुद्ध आहे.  या बाकाच्या समोर अजून एक तीन आसनांचा एकत्रित बाक आहे.  हा जो शेवटचा तीन आसनांचा बाक आहे तो नट बोल्ट्स च्या साहाय्याने वाहनात बसविलेला आहे.  तो बाक डिकीचे मागचे झाकण उघडून नट बोल्ट्स खोलून मी अगदी दहा मिनीटांत वाहनातून वेगळा काढला.  आता वाहनात बरीच मोकळी जागा झाली.  

यानंतर धुळ्याहून दिल्लीस जाण्याच्या प्रवासाचे नियोजन सुरू झाले.  गुगल मॅप्स मध्ये धुळ्याहून विविध टप्प्यांनुसार अंतराचे मापन केले असता खालील माहिती मिळाली.

 • Manpur  218 किमी, 2 घंटे 57 मिनट
 • Ratlam 345 किमी, 4 घंटे 41 मिनट 
 • Chittaurgarh 544 किमी, 7 घंटे 41 मिनट 
 • Bhilwara 601 किमी, 8 घंटे 28 मिनट 
 • Jaipur 852 किमी, 11 घंटे 39 मिनट 
 • Gurgaon 1,082 किमी, 15 घंटे 1 मिनट 
 • Rohini New Delhi 1,125 किमी, 15 घंटे 54 मिनट  
मी सध्या अवधान, धुळे येथे राहतो.  या जागेपासून सरळ महामार्ग क्रमांक तीन वरून साधारण २१८ किमी आग्र्याच्या दिशेने गेल्यावर मानपूरच्या अलीकडे रतलाम जाण्याकरिता डावीकडे वळावे.  त्यानंतर रतलाम चित्तौडगड, भिलवाडा, जयपूर, गुरगाव मार्गे रोहिणी, नवी दिल्ली येथे जावे असे ठरविले.  महामार्ग क्रमांक तीन वरूनच सरळ आग्रा येथे जाऊन तेथून दिल्लीस जाण्याचाही अजून एक पर्याय उपलब्ध होता परंतु तो मार्ग खराब आहे असे अनेकांनी सांगितल्यामुळे तो पर्याय विचारात घेतला गेला नाही.   

गुगल मॅप्स ने स्थळांचे अंतर व पोचण्याची अंदाजे वेळ दाखविली होती, ती पाहता आणि आपणांस त्यापेक्षा दीडपट वेळ लागेल हे लक्षात घेता चित्तौडगड अथवा भीलवाडा येथे मुक्काम करावयाचे ठरले.  म्हणजे अंदाजे सहाशे किमी वाहन एका दमात चालवावे लागणार होते.  वाहनात एकच चालक असताना एका वेळी इतका प्रवास करू नये असे मला मित्र, परिचित, नातेवाईक सर्वांनीच सुचविले.  माझ्या धाकट्या भावाने पूर्वी एकदा सलग एका दिवसात ४५० किमी वाहन चालविले होते तेव्हा थकवा / झोप येऊ नये म्हणून त्याने व्हर्टिन आठ मिग्रॅ. ही गोळी सकाळी नाष्टा करून प्रवासास सुरुवात करण्यापुर्वी घेतली होती.  मीही तशी गोळी घ्यावी असे त्याने मला सुचविले.

सोबत खाण्यापिण्याचे जिन्नस, पुरेसे पिण्याचे पाणी आणि थंडीत आवश्यक ते कपडे इत्यादी सर्व सामान वेगवेगळ्या थैल्या व सुटकेसेस मध्ये भरून ते सर्व वाहनात व्यवस्थित ठेवले आणि शुक्रवार, १७ जानेवारी २०१४ रोजी सकाळी सात वाजता अवधान, धुळे येथून प्रवासास प्रारंभ केला.  भावाच्या सूचने प्रमाणे  न्याहारी करून व्हर्टिन आठ मिग्रॅच्या एका गोळीचे सेवनही केले.  प्रवासास निघायच्या आठवडाभर आधीच वाहनाची जवळच्या परिसरात एक फेरी मारून चाचणी घेतली आणि ते सुस्थितीत असल्याची खात्रीही करून घेतली होती.  त्याबरोबरच इंधन टाकीही पूर्ण भरून घेतली होती.

प्रचंड थंडी आणि धुके यांचा सामना करीत आणि महामार्ग क्रमांक तीनच्या घाटातील ट्रक्सच्या रहदारीतून वाट काढीत तीन तासांत २१८ किमी वरील मानपूर जवळचे रतलामला जाण्यासाठीचे डावे वळण गाठले.  हा मार्ग अतिशय चांगल्या दर्जाचा असून रहदारी देखील फारशी नाही हे जाणवले.  रतलामपाशी आधी वाहनात इंधन भरले आणि नंतर मध्यान्ह भोजन उरकले.  भोजनानंतर चित्तौडगडच्या दिशेने प्रयाण केले.  मध्यप्रदेश राज्याची सीमा नयागांव येथे संपते.  तोपर्यंतचा प्रवास अगदी सुकर होता आणि गुगल मॅप्स ने दर्शविलेल्या अंदाजित वेळेपेक्षाही कमी वेळात आम्ही ठिकाणे गाठत होतो.  सरासरी वेग ताशी सत्तर किमीपेक्षाही अधिक राखला गेला होता.   वातावरणात थंडीही बरीच जाणवत होती.  दुपारी तीनच्या सुमारास राजस्थान राज्यात  प्रवेश केला आणि वातावरणात प्रचंड उकाडा जाणवू लागला.  त्याचप्रमाणे रस्ताही अगदीच खराब होता.  दुभाजकाचा पत्ताच नाही, अतिशय अरूंद मार्ग आणि त्यातच मार्गावर मोठ्या आकाराचे खड्डे.  वाहन चालविणे अतिशय त्रासदायक होऊ लागले.  अनेकदा वाहनापुढे अतिशय मंद गतीने चालणारी अवजड वाहने आल्याने रस्त्याखाली उतरून डाव्या बाजूने मातीतून पुढचे वाहन ओलांडून पुन्हा रस्त्यावर येण्याची कसरत करावी लागली.  अशा प्रकारे साधारण साठ किमी खडतर प्रवास केल्यावर चित्तौडगडनजीक पुन्हा रस्त्याचा दर्जा सुधारलेला आढळला.  त्यानंतर भीलवाडा पासून पुन्हा वेगाने प्रवास करता आला.  

वाहनाचा आसन सुरक्षा पट्टा अतिशय घट्ट होऊन उजव्या खांद्यापाशी काचू लागला म्हणून सोडून दिला आणि नेमके महामार्गावरील पोलिसांनी अडविले.  तीनशे रूपये दंड भरा अशी मागणी केली.  खरे तर नियमानुसार केवळ शंभर रूपये इतकाच दंड असूनही तीनशे रूपये भरावे लागले, कारण इतर वाहनचालकही निमूटपणे तेच करीत होते.  हुज्जत घालून फक्त वेळ वाया जाण्याखेरीज इतर काहीच हाती लागले नसते.  दंड भरून पुन्हा मार्गस्थ झालो आणि थोड्या वेळाने एके ठिकाणी थांबून इंधन भरले आणि पुढे लगेच रात्रीचे भोजनही उरकून घेतले.  भोजनापश्चात् अजमेर जयपूर महामार्गाला लागलो.  हा महामार्ग अगदी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची आठवण करून देणारा आहे.  या मार्गावर अतिशय कमाल वेगाने वाहन हाकीत रात्री दहाच्या सुमारास जयपूर येथे पोचलो.  घरापासून आता आम्ही साडे आठशे किमी अंतरावर आलो होतो.  जितके अंतर पार केले होते त्याहूनही कमी अंतर पार करावयाचे होते.  आता यापुढचा मार्ग म्हणजे जयपूर दिल्ली द्रुतगती मार्ग होता तोही अजमेर जयपूर मार्गाइतकाच प्रशस्त असेल तर आताच  पुढे मार्गस्थ व्हावे कारण दिवसा दिल्लीत अतिशय जास्त रहदारी असते असे पत्नीने मला सूचविले.  तसेही रात्री दहा वाजता जयपूर सारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळी आगाऊ नोंदणीशिवाय हॉटेलात खोली मिळविणे सोपे नव्हते आणि मिळाली तरी इतक्या प्रचंड थंडीत व्यवस्थित झोप होऊन पुन्हा दुसर्‍या दिवशी ताजे तवाने होऊन पुढचा प्रवास नीटपणे करता येईल याची काहीच खात्री देता येत नव्हती.  तेव्हा सर्व बाजूंनी विचार करून मी प्रवास पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.

माझ्या पत्नीचा भाऊ अविनाश गुरगाव येथे नोकरी करतो.  त्याची कार्यालयीन वेळ रात्री दहाच्या सुमारास संपत होती.  पत्नीने त्यास दूरध्वनीद्वारे संपर्क करून वेळ संपल्यानंतरही अधिक काळ कार्यालयात थांबण्यास सांगितले, जेणे करून आम्ही गुरगावात पोचू तेव्हा तो आमच्या सोबत येऊन रोहिणी, नवी दिल्ली येथ पर्यंत जाण्याकरिताच्या पुढील प्रवासास आम्हांस मार्गदर्शन करू शकेल.  

जयपूरहून दिल्लीला जाण्याचा मार्ग केवळ नावापूरताच द्रूतगती मार्ग आहे हे लवकरच आमच्या लक्षात आले. पथकर नाक्यांची वारंवारिता जास्त आणि तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा, रस्त्यात अनेक उड्डाण पुलांची रखडलेली कामे, रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे आणि अनेक ठिकाणी महामार्गाचे अरूंद असणे या सर्व समस्यांसोबत अजून एक मोठी समस्या ही होती की महामार्गावर प्रवास करणारी बहुतांश अवजड वाहने होती आणि ती एकमेकांना समांतर जात असल्यामुळे अनेकदा पुढे जाण्यास वाट मिळत नव्हती.  हॉर्न वाजवून वाजवून मी बेजार झालो तरी ही वाहने सहजी वाट देत नव्हती.  या सर्व समस्यांमुळे रात्रीचे दोन वाजले तरीही आम्ही गुरगावपर्यंत पोचू शकलो नाही.  इकडे अविनाश कडून पुन्हा पुन्हा कुठवर पोचलात अशी विचारणा होत होती.  पहाटे अडीच वाजता आम्हाला महामार्गावर अनेक ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आढळल्या.  पुढे जायला वाटच दिसत नव्हती.  काही हलकी वाहने बाजूच्या सेवा रस्त्यावर उतरून पुढे मार्गक्रमण करीत होती म्हणून मीही तेच केले, परंतु तरीही पुढे सरकण्याचा वेग लक्षणीय रीत्या मंदावला होता.  पुढे पुढे तर वाहन अगदी इंच इंच गतीने सरकत होते.  आता तुम्ही हल्दीराम पथकर नाक्यापाशी पोचाल तेथून पुढे आल्यावर उजवीकडे वळा असे आम्हाला अविनाश सांगत होता.  हा हल्दीराम पथकर नाका काही केल्या आमच्या दृष्टीपथात येत नव्हता.  तेव्हा तुम्ही महामार्ग क्रमांक आठ वर च आहात ना? याची खात्री करून घ्या असे अविनाशने मला सूचविले.  आम्ही महामार्ग क्रमांक आठ वरच असल्याची खात्री करून घेतली आणि तो हल्दीराम पथकर नाका अजून बराच पुढे असल्याचेही आम्हाला समजले.  वाहनांची तोबा गर्दी, पहाटेची वेळ, संथ गतीने वाहनांचे पुढे सरकणे आणि तशातच पाऊस सुरू झाला.  मी वायपर फिरविण्यास सुरुवात केली परंतु समोरच्या काचेवर घट्ट धूळ, सिमेंटचे कण उडालेले असल्यामुळे वायपरचे रबर फाटले आणि वायपर अतिशय थरथरत फिरू लागला.  समोरचे नीट दिसतही नव्हते. अशाच परिस्थितीत वाहन पुढे दामटले आणि थोड्या वेळात हल्दीरामचा पथकर नाका दिसला.  परंतू वाहनांच्या रांगा प्रचंड मोठ्या होत्या.  अशा वेळी काही हलकी वाहने अगदी डावी कडून जाताना दिसली म्हणून मीही त्यांच्या पाठी मागेच माझे वाहन पळविले.  बरेच अंतर पुढे गेल्यावर कळले की हा मार्ग बंद आहे, मग सर्वांबरोबरच मीही वाहन उलट दिशेने फिरवून मुख्य रांगेत ट्रक्सच्या मध्ये घुसविले.  असे करीत करीत एकदाचा हल्दीराम पथकर नाका पहाटे सव्वातीन नंतर ओलांडला.  

आता नेमक्या कुठल्या टिकाणी उजवीकडे वळायचे हे विचारण्या करिता पत्नीने अविनाशला संपर्क केला.  तो एकंदरीत आम्हाला डावी उजवीकडे कोणत्या इमारती दिसत आहेत ते विचारत होता आणि सरळ मार्गक्रमण करण्याचाच सल्ला देत होता.  अचानक डी एल एफ ची इमारत आम्हाला दिसली हे ऐकल्यावर त्याने पुढच्या वळणावर उजवीकडे वळून यू टर्न घेण्यास सांगितले.  पत्नीने मला त्याचा तसा निरोप दिला.  परंतु बरेच अंतर पुढे जाऊनही रस्ता दुभाजक अखंडच दिसत होता आणि यू टर्न घेण्यास वाव नव्हता.  तसे मी पत्नीला सांगितले.  तीही पुन्हा पुन्हा अविनाशला उजवीकडे वळण घेण्यास कुठे जागा आहे हे विचारत होती.  अचानक माझ्या लक्षात आले की हा सारा रस्ता वरून जाणारा (इलेव्हेटेड रोड) आहे.  म्हणजे मला यू टर्न घेण्याकरिता रस्तादुभाजकाचा खंडित भाग ओलांडायचा नसून डावीकडे निघणार्‍या एक्झिट्स मधून बाहेर पडून खाली येऊन रस्त्या खालून यू टर्न घ्यायचा आहे.  मी तसे अविनाशला विचारून खात्री करून घेतली.  आता एकच समस्या होती ती म्हणजे आमचे वाहन अगदी उजवी कडे होते आणि डावीकडून जाणार्‍या इतर वाहनांचा तसेच आमच्याही वाहनाचा वेग बराच जास्त होता.  हळूहळू इंडिकेटर्स देत डावीकडे व्हावे लागणार होते.  तसे करेपर्यंत अजून दोन डाव्या एक्झिट्स पार झाल्या.  शेवटी तिसर्‍या एक्झिट मधून बाहेर पडत यू टर्न घेतला आणि अजून काही किमीचे अंतर पार करीत एकदाचे आम्ही अविनाशच्या कार्यालयीन इमारतीपाशी पोचलो.

अविनाशला सोबत घेतले आणि पुन्हा पुढे जाऊन यू टर्न घेतला कारण मगाशी आम्ही ज्या इलेवेटेड रोडने जात होतो त्याच मार्गाने पुन्हा रोहिणी, नवी दिल्लीला जायचे होते.  थोड्या वेळातच पहाटे ०४:३० च्या सुमारास आम्ही नवी दिल्लीत प्रवेश केला.  त्यानंतर अविनाशने दिशादर्शन केले आणि त्यानुसार मी रोहिणी येथील त्यांच्या घरापाशी पहाटे ०५:३० च्या सुमारास पोचलो.  शेवटच्या अर्धा तासाच्या प्रवासात मला प्रचंड झोप येत होती.  कसेबसे झोपेला टाळत मी वाहन घरापर्यंत आणले.  

खाली वसाहतीच्या वाहनतळापाशी वाहन उभे करून वरच्या मजल्यावर सर्व सामान आणले आणि सकाळी ०६:०० ते दुपारी ११:०० पर्यंत एक झोप घेतली.  झोप झाल्यावर सकाळची आन्हिके उरकून भोजन केले आणि शनिवार १८ जानेवारीचा उरलेला वेळ आम्हाला भेटावयास आलेल्या परिसरातील इतर नातेवाईंकाशी बोलण्यात घालविला.

त्यानंतर रविवार १९ जानेवारी रोजी पत्नीच्या काकांना व मोठ्या आत्याला भेटावयाचे ठरले.  मी माझ्याच वाहनातून प्रवास करायचे ठरवित होतो परंतु पत्नी व सासुबाई या दोघींनीही सक्त मनाई केली.  त्यांच्या मते दिल्लीतल्या प्रचंड वाहतूकीत मला वाहन चालविणे शक्य होणार नव्हते.  शेवटी त्यांच्या आग्रहाला बळी पडून मेगा कॅब द्वारे संचलित टूरिस्ट टॅक्सी मागविण्यात आली.  त्या टॅक्सीत बसून आमचा प्रवास सुरू झाला.  पत्नीच्या काकांची भेट झाली.  त्यानंतर सागर रत्न उपाहारगृहात भोजनही झाले, परंतु काही कारणास्तव मोठ्या आत्याबाईंची भेट होऊ शकली नाही.  मराठी संकेतस्थळावर लेखन करणारे माझे एक स्नेही श्री. अरूण जोशी हेही दिल्लीतच राहतात हे मला ठाऊक होते.  तेव्हा त्यांची भेट घेण्याचे ठरविले.  वेस्ट मुकर्जी नगर परिसरात राहणार्‍या श्री. जोशी यांचे निवास स्थान सागर रत्न उपाहारगृहापासून जवळच असल्याचे समजले आणि मग आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळविला.  

अरूण जोशी यांच्या घरी गप्पा मारण्यात आमचा वेळ अगदी मजेत गेला.  त्यांच्याकडून निघून पुन्हा रोहिणी येथील निवासस्थानी गेलो तेव्हा टूरिस्ट टॅक्सीचे बिल सत्तावीसशे रूपये झाल्याचे समजले आणि मला धक्काच बसला.  त्यानंतर पुढचा दिवस सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी पत्नीच्या सर्वात धाकट्या आत्याबाईंना भेटावयाचे ठरले.  टूरिस्ट टॅक्सी इतकी महागडी आहे हे ठाऊक झाल्यामुळे आता माझ्या वाहनाचाच वापर करावयाचे ठरवले.  ठरल्याप्रमाणे दुपारी दोन वाजता मी माझी पत्नी व माझ्या सासुबाई असे आम्ही तिघे रोहिणीतून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागलो.  दिल्लीतली वाहतूक अतिशय बेशिस्त असल्याचे जाणवले.  देशाची राजधानी असूनही बिनदिक्कत इथे दुचाकी वाहनावर तिघे प्रवास करताना आढळत होते.  सायकल रिक्षा व विजेवर चालणार्‍या मोटर सायकल रिक्षांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता.  टाटा एस मॅजिक वाहनातून तर वीस पंचवीस प्रवासी कोंबले जात होते.  अशा परिस्थितीतून वाट काढीत एकदाचे आत्याबाईंच्या घरी पोचलो.  काही वेळ तिथे थांबून संध्याकाळी रोहिणीत परतलो.  

आता दिल्लीच्या वाहतूकीचा अंदाज आला आणि तिथे वाहन चालविण्याचा सरावही झाला.  पुढचा दिवस दिनांक २१ जानेवारी मंगळवार - दिल्ली विद्यापीठात शिकविणार्‍या आणि तिथेच राहणार्‍या पत्नीच्या  आतेबहीणीला भेटावयाचे ठरले.  हे जरा लांबच्या अंतरावरील ठिकाण होते आणि रहदारी देखील जास्त होती.  त्यामुळे आदल्या दिवशीपेक्षा थोडा जास्त त्रास झाला तरी सायंकाळी ०५:०० वाजता विद्यापीठातील त्यांच्या निवासस्थानी पोचलो.  सायंकाळी आठ वाजता परत रोहिणी कडे येण्यास सुरूवात केली आणि एक वेगळीच समस्या उद्भवली.  एके ठिकाणी रस्त्याचे वेगवेगळ्या पातळीत तीन भाग केले होते आणि तसे दर्शविणारे दगड बसविण्याचे काम अपूर्णावस्थेत होते.  सायंकाळच्या अपुर्‍या प्रकाशात ते नीट दिसले नाही आणि वाहनाची डावीकडील दोन चाके खालच्या पातळीच्या रस्त्यावर आणि उजवीकडची दोन चाके वरच्या पातळीच्या रस्त्यावर येऊन वाहन रस्त्यावरच अडकून बसले.  ऍक्सलरेटर पेडलवर कितीही दाब दिला तरी वाहन जागचे हलेना.  फक्त मागची चाके जागेवरच फिरू लागली.  शेवटी मदतीकरता रस्त्यावरच्या काही लोकांना बोलावले. लगेचच आठ दहा लोक जमले आणि त्यांना वाहनाला हलकासा धक्का देत डावी कडे कमी पातळीच्या भागात आणले.  त्यांचे आभार मानत पुढचा प्रवास सुरू केला आणि अर्ध्या तासात रोहिणीला परतलो.

बुधवार २२ जानेवारी - पत्नीचे साऊथ एक्स्टेंशनला काही काम असल्यामुळे तेथे जावे लागले.  रोहिणीच्या त्यांच्या घरापासून हे अंतर फारच जास्त म्हणजे ४० किमी आहे.  भयंकर वाहतूक, चिखल पाऊस अशा अडचणीतून वाट काढत इच्छित स्थळी पोचलो आणि परतताना क्लच पेडल व ब्रेक दाबण्याचा विक्रमच करावा लागला इतकी वाहनांची तोबा गर्दी.  वाहनांच्या पाच समांतर रांगा.  कुठली रांग केव्हा पुढे जाईल याचा नेम नाही.  हळू हळू इंडिकेटर्स देत सारखे या रांगेतून त्या रांगेत होत एकदाचे अडीच तासात घरी पोचलो तेव्हा आपल्याला दिल्लीच्या गर्दीत वाहन चालविण्याचा पुरता सराव झाल्याचे समाधान झाले.  पत्नी व सासुबाईंनीही माझ्या या निष्कर्षास पुष्टी दिली.

त्यानंतर गुरूवार दिनांक २३ जानेवारी रोजी रोहिणीच्या जवळपासच असलेल्या एका ग्रामीण भागात जावे लागले.  तिथून परतताना जवळचा मार्ग (शॉर्ट कट) पकडण्याच्या नादात वाहन एका मोकळ्या मैदानातून नेले आणि नेमके ते तिथल्या चिखल, दलदलवजा भागात अडकले.  वाहनातून खाली उतरून कोणास मदतीला बोलवावे म्हंटले तर तीही सोय नव्हती कारण वाहनाच्या चारही बाजूला प्रचंड चिखल.  त्यात उतरणार तरी कसे?  शेवटी वाहन एकदा पहिल्या गियरमध्ये टाकून एक्सलरेटर पेडलवर पूर्ण दाब दिला.  वाहनाची मागील चाके वेगात जागेवरच फिरली आणि फिरताना त्यांनी बराचसा चिखल मागे उडविला.  त्यानंतर वाहन रिवर्स गिअर मध्ये टाकून पुन्हा एक्सलरेटर पेडलवर पूर्ण दाब दिला.  पुन्हा बरेचसे चिखल घुसळले गेले.  असे रिवर्स फॉरवर्ड मध्ये अनेक वेळा केल्यानंतर शेवटी एक वेळ अशी आली की, पहिल्या गिअर मध्ये टाकले गेलेले वाहन एक्सलेटर पेडलवर पूर्ण दाब दिले असता हळू हळू इंच इंच पुढे सरकते आहे हे जाणवले.  त्याच स्थितीत स्टीअरिंग घट्ट धरून बसून राहिलो आणि पंधरा वीस मिनीटात संपूर्ण दलदल पार करून बाहेर आलो तेव्हा सूटकेचा नि:श्वास टाकला आणि एकदाचे घरी पोचलो.

दिनांक २४ आणि २५ जानेवारी रोजी कुठेच गेलो नाही.  घरीच आराम केला.  रविवार, दिनांक २६ जानेवारी रोजी  अविनाशसोबत त्याच्याच अल्टो ८०० वाहनातून बाहेर फिरलो.  काही जरूरीच्या वस्तूंची खरेदी केली आणि सायंकाळनंतर सामानाची आवराआवर सुरू केली.  आमच्या दोन सुटकेसेस आणि इतर पिशव्यांसोबतच आता धुलाई यंत्र, अतिसुक्ष्म लहर भट्टी (मायक्रोवेव्ह ओव्हन), विविध विषयांवरील अनेक पुस्तके, एअरोबिक्स स्टेपर, व्हायब्रेशन वेट लूझर, इत्यादी वस्तूही वाहनात भरल्या.  शीतकपाट फारच मोठ्या आकाराचे (२०० लीटर्स) असल्यामुळे ते काही वाहनात बसविता आले नाही.  बाकी सर्व वस्तू भरल्यावर वाहनाची पुन्हा एक फेरी मारून चाचणी घेतली आणि इंधन टाकीदेखील पूर्ण भरून घेतली.

सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ०६:३० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.  याही वेळी आधी न्याहारी आणि व्हर्टिन आठ मिग्रॅचे सेवन केले होतेच.    रोहिणीतून बाहेर निघून मुख्य रस्त्याला (रिंग रोड) लागलो तेव्हा बरीच थंडी आणि विरळ धुके होते.  हळू हळू धुके नाहीसे झाले आणि हलक्या वाहनांची रहदारी वाढू लागली.  अर्थात अवजड वाहने नसल्यामुळे वाहतूकीला वेग होता.  सकाळी ०७:३० च्या सुमारास नवी दिल्ली चा पथकर नाका ओलांडून गुरगाव मध्ये प्रवेश केला.  वीसच मिनीटांत गुरगावचा पथकर नाकादेखील ओलांडला आणि दिल्ली जयपूर मार्गावर धावू लागलो.  येतेवेळी जितका खराब वाटला होता तितका हा मार्ग आता त्रासदायक वाटला नाही.  एकतर अवजड वाहनांची वर्दळ तूलनेने कमी होती.  दुसरे म्हणजे दिवसा उजेडी उड्डाण पुलांची रखडलेली कामे, मार्गाची कमी जास्त होणारी रूंदी या बाबी पुरेशा लवकर दृष्टीपथात येत असल्यामुळे वाहनाच्या गतीवर आणि सुकाणूवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येत होते.  

काही वेळाने मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तपासणी चालविलेली दिसली.  यावेळी आम्ही (काचत असले तरीही) आसन सुरक्षा पट्टे व्यवस्थित लावले होते त्यामुळे निर्धास्त होते.  तरीही पोलिसांनी आमचे वाहन थांबवलेच.  आम्ही वेगमर्यादा ओलांडली असल्याचे त्यांनी आम्हास सांगितले.  माझ्या वाहनाने वेगमर्यादा ओलांडली यावर माझा विश्वास नसल्याचे मी त्यांना प्रत्यूत्तरादाखल सांगितले.  त्यावर त्यांनी त्यांच्या जिप्सी वाहनात असलेले संगणक मला दाखविले.  पडद्यावर माझे वाहन दिसत होते आणि वेग ताशी ७३ किमी इतका दिसत होता.  मी समाधानी होत त्यांना वेगमर्यादा ताशी ८० किमी असल्याचे सांगितले.  त्यावर त्यांनी महामार्गावर तुम्ही ८० च काय पण ९० किमी वेगाने देखील वाहन चालवू शकाल परंतू आता शहर हद्दीत तुम्हाला ताशी ६० किमी इतक्या वेगमर्यादेचे पालन करावे लागेल असे सांगितले.  तसेच त्यांनी आम्ही कोठून आलो व कोठे चाललो याचीही विचारणा केली.  आम्ही दिल्लीहून महाराष्ट्रात चाललो हे ऐकल्यावर रस्ता चूकल्याचेही सांगितले.  त्यांच्या म्हणण्यानूसार आम्ही जयपूर शहराच्या हद्दीत प्रवेश केला होता आणि काही अंतर आधीच एक डावीकडचे वळण घेतले असते तर जयपूर बाह्यवळण मार्गे जयपूर अजमेर द्रुतगती मार्गाला लागलो असतो.  आता आम्हाला जयपूर शहराच्या हद्दीतून अजमेर रस्त्याला जावे लागणार होते.  त्याशिवाय वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल दंड म्हणून रू.१,१००/- (रूपये अकराशे फक्त) भरावे लागतील असे सांगण्यात आले.  तसेच वाहनात जे गृहोपयोगी सामान भरले होते त्याबद्दल अजून वेगळा दंड - जो की पोलिस ठरवू शकत नाही आणि त्यासाठी आमच्या वाहनास न्यायालयासमोर सादर करावे लागेल.  खरे तर वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल इतक्या रकमेचा दंड होत नाही.  तसेच वाहनात सामान भरण्याचा मुद्दा असेल तर पोलिसांच्या जिप्सीतही तीन संगणक आणि इतर सामग्री होती त्याचे काय?  अर्थात पोलिसासोबत वाद घालण्यात अर्थ नव्हता.  त्याने दंड न भरता तडजोड म्हणून सहाशे रूपये भरण्यास सांगितले.  शेवटी घासाघीस करीत त्यास तीनशे रूपये दिले आणि पुढे मार्गस्थ झालो.

त्यानंतर जयपूर शहरातून पुढे अजमेर ला जायचा रस्ता विचारला असता अनेकांना तो ठाऊक नसल्याचे समजले.  अनेकांनी चूकीचे मार्गदर्शनही केले.  त्यामुळे आम्ही अधिकच गर्दी असलेल्या भागात शिरलो.  काही ठिकाणी तर चिंचोळा रस्ता, दोन्ही बाजूला झोपडपट्टी, मध्येच आलेले रेल्वे क्रॉसिंग अशी दिव्ये ओलांडत शेवटी एका डेड एंडपाशी पोचलो.  शेवटी तिथून मागे फिरत पुन्हा अनेकांना विचारत एकदाचे मेट्रो लाईनपाशी आलो.  रस्त्याच्या वरून जाणार्‍या मेट्रो लाईनच्या मार्गानेच पुढे गेल्यास अजमेर रस्ता लागेल असे खात्रीने समजल्यावर त्याप्रमाणे मार्ग क्रमू लागलो.  जयपूरच्या वाहतूक नियंत्रक दिव्यांचे चक्र दोन मिनीटांहूनही अधिक असल्यामुळे अजूनच वेळेची नासाडी झाली.  शेवटी मजल दरमजल करीत जयपूर अजमेर द्रुतगती मार्गावर एकदाचे आलो.  

मध्यान्ह भोजन उरकून प्रचंड वेगात प्रवास सुरु केला कारण आधीच पोलिसांमुळे आणि नंतर जयपूर शहरात प्रवेश करून अजमेर मार्ग हुडकण्यात बराच वेळ नाहक खर्ची पडला होता.  वाटेत दुदू येथे इंधन भरून घेतले आणि पुढे चित्तौडगढ, भीलवाडा ओलांडून राजस्थान मध्यप्रदेश सीमेच्या ६० किमी अलीकडे पोचलो.  पुन्हा एकदा खराब एकेरी रस्त्याचा सामना करावा लागला.  रस्त्यावरचे खड्डे, पुढे अवजड वाहनांची गर्दी यासोबतच अंधारामुळेही अजूनच उशीर होत होता.  पुन्हा आधीसारखेच रस्त्याच्या खाली उतरून पुढची अवजड वाहने ओलांडावी लागत होती.  अंधारामुळे खड्डे नीट दिसत नव्हते आणि वाहनात सामान असल्यामुळे खड्ड्यांची ही समस्या अधिकच जाणवत होती.  तरीही मोठ्या नेटाने हा खडतर मार्ग पार केला आणि मध्यप्रदेश सीमेच्या नजीक येऊन ठेपलो.

आता रस्त्यावर दुभाजक होता आणि पुढे बर्‍याच अंतरावर पथकर नाकाही दिसत होता.  दुभाजकाच्या डाव्या बाजूने आम्ही जात होतो आणि पथकर नाक्याच्या अलीकडे आम्ही असल्यामुळे इकडच्या वाहनांची तपासणी केली जात होती.  वाहनांची प्रचंड मोठी रांग होती आणि या मंदगतीने समोरचा पथकरनाका ओलांडायला आम्हाला कित्येक तासही लागू शकणार होते.  काय करावे ते सूचत नव्हते.  अशावेळी अचानक माझ्या निदर्शनास आले की आमच्या पुढे असलेल्या महिन्द्रा झायलो वाहनाने दुभाजक ओलांडून चक्क रस्त्याच्या उजव्या बाजूने (रॉंग साईडने) पुढे जायला सुरुवात केली होती.  त्याचा उद्देश तत्काळ माझ्या ध्यानात आला आणि मीही त्याचेच अनुकरण करीत परिणामांचा विचार न करता माझेही वाहन त्याच्या मागे दामटले.  एक अतिशय साधी गोष्ट होती.  विरुद्ध बाजूने येणारी वाहने ही मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून राजस्थानात शिरली होती.  त्यांची तपासणी पथकर नाक्याच्या आधीच करण्यात आली होती त्यामुळे त्या वाहतूकीला वेग होता.  त्या पट्ट्यात कुठलीही तपासणी चालु नव्हती.  त्या वाहनांच्या बाजुला मिळणार्‍या अरूंद चिंचोळ्या वाटेतून महिन्द्रा झायलो वाहन वेगाने चालले होते आणि मीही त्या वाहनाचे मागोमाग माझे वाहन दामटत होतो.  आम्ही रस्त्याच्या अगदी उजव्या बाजूने चाललो होतो परंतु राजस्थान पोलिस आमच्या वाहनांकडे ढुंकूनही पाहत नव्हते.     अगदी अल्प वेळेत आम्ही फार मोठा पल्ला पार करून पथकर नाक्यापाशी पोचलो होतो.  आता अगदीच कसोटीचा क्षण होता कारण पथकर नाक्यापाशी अंतिम तपासणी होती आणि तिथे आम्हाला कुणीही चूकीच्या दिशेने नाका ओलांडून देणार नव्हते.  मी झायलोवर अगदी बारकाईने लक्ष ठेऊन होतो.  झायलो चालकाने अवजड वाहनांच्या गर्दीतून मिळालेल्या फटींमधून अगदी शिताफीने वाहन रस्त्याच्या मधोमध आणून उभे केले.  त्याच्या मागोमाग मीही येऊन पोचलो.  त्याने रस्ता दुभाजकावर वाहन चढविले आणि संधी मिळताच पुन्हा दुभाजकाच्या डाव्या बाजूला असलेल्या अवजड वाहनांच्या गर्दीत आपले वाहन घुसविले.  मध्ये जराही अंतर पडू न देता मी त्याचे अनुकरण केले.  आता आम्हा दोघांचीही वाहने योग्य प्रवाहात आली होती. पथकर नाक्यावर अंतिम तपासणी होऊन आम्ही मध्यप्रदेश राज्यात प्रवेश केला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते.  आता पुन्हा चांगला प्रशस्त गुळगुळीत रस्ता समोर दिसत होता.  आमचा प्रवास पुन्हा वेगात सुरू झाला.  थोड्या वेळाने रात्रीचे भोजन उरकून आम्ही रतलामच्या दिशेने कूच केले.  

रतलाम पार केल्यावर आता आम्हाला मुंबईला जाणारा मार्ग धरायचा होता.  त्यानुसार मार्गफलक पाहून जावराच्या दिशेने आम्ही निघालो.  जावराला पोचलो आणि पुन्हा इंधन भरून घेतले.  बाहेर प्रचंड गारवा होता आणि आम्हाला खिडक्यांच्या काचा बंद करणे भाग होते.  परंतु तसे केले म्हणजे समोरच्या काचेवर आतील बाजूस बाष्प साचत होते.  ते सारखे पुसत बसणे ही एक समस्या होऊन बसली.  त्यामुळे थंडी वाजत असूनही अत्यंत नाईलाजाने खिडकीच्या काचा अगदी किंचित किलकिल्या होतील इतपत खाली घेतल्या.  या सर्व अडचणींमुळे वाहनाचा वेग काहीसा मंदावला होता.  रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि आता मला समस्या जाणवू लागली ती झोपेची.  डोळ्यांवर गाढ झोप येऊ घातली होती आणि तिच्यावर मात करीत मी कसाबसा वाहन हाकत होतो.  पत्नी तर शेजारच्या आसनावर सुरक्षा पट्टा बांधून कधीची निद्राधीन झाली होती.  मी कोणत्या स्थितीत वाहन चालवित होतो याची तिला अजिबात कल्पनाही नव्हती.  आम्ही अजून मध्यप्रदेश राज्यातच असल्यामुळे महामार्गावर दर ठराविक अंतरावर वाहने उभी करून विश्रांती करण्याचीही सोय उपलब्ध होती.  या ट्रक बे वर अनेक ट्रक्स उभे होते आणि त्यांचे वाहन चालक / सहचालक विश्रांती घेत होते.  सोबत स्वच्छतागृहांचीही सुविधा होती.  अनेकदा माझ्या मनात आले की आपणही त्या जागी वाहन उभे करून वाहनात जराशी विश्रांती घ्यावी.  परंतु पुन्हा तो विचार बाजूस सारून मी वाहन पुढे नेत होतो.  दोनदा वाहन थांबवून मी डोळ्यांवर थंड पाणी मारले आणि पुन्हा प्रवास पुढे चालु ठेवला.     रात्री दोनच्या सुमारास झोपेचे आक्रमण फारच तीव्रतेने होऊ लागल्यावर पुन्हा एक व्हर्टिन आठ मिग्रॅ चे सेवन केले आणि पुन्हा प्रवासास सुरूवात केली.  थोडे अंतर पुढे जाताच मला दिसले की एक जोडरस्ता आणि पूल ओलांडला की आम्ही महामार्ग क्रमांक तीन (आग्रा मुंबई रस्ता) वर पोहोचू.  आता आपले मुक्कामाचे ठिकाण जवळ आले या आनंदात मी झोपेचा अंमल दूर सारीत वाहन चालविणे सुरूच ठेवले.  या जोडरस्त्यावर एका पथकर नाक्यापाशी पथकर भरण्याकरिता थांबलो असता दोन पोलिस वाहनाजवळ आले आणि त्यांनी काहीशा संशयाने माझ्याकडे पाहिले आणि मी कोठून आलो, कोठे जात आहे याची चौकशी केली.  त्यांच्या नजरेत संशय का आहे हे आधी मला कळलेच नाही पण शेजारी वळून बघताच मला त्याचा उलगडा झाला.  पत्नी गाढ झोपेत होती आणि झोपेत व्यक्ती एखाद्या बाजूला कलते त्याप्रमाणे तिचे शरीर प्रवासादरम्यान कलले असले तरी आसन पट्ट्यामुळे तिची मान आणि चेहरा पुढे लटकत होते.  बाहेरून पाहणार्‍या पोलिसाला कदाचित ती जिवंत तरी आहे की नाही असे वाटले असावे.  पोलिसांचे शंका निरसन व्हावे म्हणून मी आधी पत्नीला उठविले आणि मग पोलिसांच्या चौकशीला तोंड दिले.  वाहनात मागे ठेवलेले मोठ्या आकाराचे धुलाई यंत्र आणि इतर सामान पाहून पोलिसांनी त्याचीही चौकशी केलीच.  परंतु हे सामान आपण आपल्या माहेर च्या घरून स्वत:च्या घरी नेत आहोत असे पत्नीने त्यांना सांगितल्यावर पोलिसांनी अधिक चौकशी केली नाही व पथकर भरून आम्ही पुढे मार्गस्थ झालो.  पत्नीही लगेच पुन्हा पहिल्यासारखी गाढ झोपी गेली.

थोड्याच वेळात महामार्ग क्रमांक तीन वर पोचून तो अवघड घाटही पार केला.  अजूनही झोपेचा त्रास जाणवत होताच.  त्यामुळे अर्थातच आता सरासरी वेग  बराच मंदावला होता.  सेंधवा पाशी पोचताच पुन्हा टाकीत इंधन भरून घेतले.  डोळ्यांवर पाणी मारले आणि प्रवास पुढे चालु ठेवला.  थोड्याच वेळात महाराष्ट्र सीमेपाशी पोचलो इथे पोलिसांनी आमची कुठलीही तपासणी केली नाही की सोबत असलेल्या सामानाबद्दल चौकशी.  ते अवजड वाहनांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात मग्न होते.  थोड्याच वेळात सकाळी ठीक सहा वाजता अवधान, धुळे येथील आमच्या निवासस्थानी पोचलो.

यानंतर एका आठवड्याने म्हणजे २ फेब्रुवारी रोजी धुळ्याहून पुणे येथे गेलो आणि ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत साई  सर्विस फुगेवाडी येथे वाहनाची हमी काळातली शेवटची मोफत दुरूस्ती करून घेतली.  यात वाहनाचा स्पीडोमीटर व इतर काही नादुरुस्त झालेले सुटे भाग बदलून घेतले.

या प्रवासादरम्यान काही निरीक्षणे नोंदविली गेली ती अशी:-

 1. एकूण प्रवास जातेवेळी ११९१ किमी तर येतेवेळी ११९३ किमी झाला.  जाताना २२ तास ३० मिनीटे तर येताना २३ तास ३० मिनीटे लागली.  दिल्ली अंतर्गत प्रवास एकूण १८१ किमी झाला.

 2. km Reading
  Time
  Date
  Awadhan, DHULE
  21580
  07:00
  17 January 2014
  Rohini New Delhi
  22771
  05:30
  18 January 2014
  Distance
  1191
  22:30 Hrs
  Rohini New Delhi
  22952
  06:30
  27 January 2014
  Awadhan, DHULE
  24145
  06:00
  28 January 2014
  Distance
  1193
  23:30 Hrs
  Total Distance Travelled
  2565

  Distance Travelled inside Delhi
  181
  Distance Travelled on Highway
  2384
  एका बाजूचा एकूण पथकर रूपये ९६२/- इतका खर्च झाला.  महाराष्ट्रात केलेला प्रवास हा तूलनेने कमी असला तरी पथकराची बरीच रक्कम त्याकरिता खर्च झाली.  येतेवेळी आम्ही जयपूर शहर बाह्यवळण न घेतल्याने दौलतपुरा नाक्यावरील रूपये ४६/- इतका पथकर वाचला असला तरी त्याची किंमत आम्हाला जयपूर शहरांतर्गत प्रवासात खर्ची पडलेला नाहक वेळ आणि पोलिसांना द्याव्या लागलेल्या तीनशे रुपयांच्या भुर्दंडाच्या स्वरूपात चूकती करावी लागली.
   
  Sr. No.
  Time
  Date
  Place
  Amount (Rs.)
  Return Time
  Return Date
  1
  07:21
  17 January 2014
  Songir
  50
  05:21
  28 January 2014
  2
  07:30
  17 January 2014
  Nardana
  8
  04:52
  28 January 2014
  3
  07:58
  17 January 2014
  Shirpur
  75
  04:51
  28 January 2014
  4
  08:52
  17 January 2014
  NH3 @ KM 141.85
  79
  03:35
  28 January 2014
  5
  09:39
  17 January 2014

  74
  02:29
  28 January 2014
  6
  10:15
  17 January 2014

  20
  01:00
  28 January 2014
  7
  10:44
  17 January 2014
  Chhokala
  35
  00:05
  28 January 2014
  8
  11:36
  17 January 2014
  Chikliya
  31
  23:37
  27 January 2014
  9
  13:14
  17 January 2014
  Jaora
  25
  22:02
  27 January 2014
  10
  14:03
  17 January 2014
  Piplyamandi
  26
  21:23
  27 January 2014
  11
  15:05
  17 January 2014
  Nayagaon
  16
  20:04
  27 January 2014
  12
  16:16
  17 January 2014
  Rithola
  35
  17:59
  27 January 2014
  13
  16:49
  17 January 2014
  Jojora Ka Kheda
  60
  17:31
  27 January 2014
  14
  18:09
  17 January 2014
  Kanwaliyas
  75
  16:11
  27 January 2014
  15
  20:47
  17 January 2014
  Kishangadh
  90
  13:17
  27 January 2014
  16
  22:38
  17 January 2014
  Daulatpura
  46
  ----
  27 January 2014
  17
  23:12
  17 January 2014
  Manoharpura
  55
  10:50
  27 January 2014
  18
  00:54
  18 January 2014
  Shahjahanpura
  114
  09:03
  27 January 2014
  19
  03:21
  18 January 2014
  Gurgaon
  27
  07:49
  27 January 2014
  20
  04:30
  18 January 2014
  New Delhi
  21
  07:30
  27 January 2014
  TOTAL
  962

 3. निरनिराळ्या ठिकाणी इंधन दरांमध्येही अतिशय तफावत आढळली.  अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्रात इंधन दर अतिशय जास्त असून मध्यप्रदेश, राजस्थान मार्गाने ते घटत दिल्लीत सर्वात कमी असल्याचे आढळले.  त्याचप्रमाणे इंधन कार्यक्षमतेचा विचार केला असता महाराष्ट्र मध्यप्रदेश दरम्यानच्या प्रवासात रस्ता चांगला होता परंतु मला प्रति लिटर केवळ १३.५ किमी इतकीच सरासरी धाव मिळाली.  मध्यप्रदेश राजस्थान दरम्यान काही अंतर रस्ता अतिशय खराब व रहदारी अतिशय वर्दळीची असूनही मला प्रति लिटर १४.३ किमी इतकी सरासरी धाव मिळाली.  तर राजस्थान पासून दिल्लीला जाताना सर्वात जास्त काळ आणि सर्वात जास्त वाहतूक खोळंबा होऊन ही १५.९ किमी इतकी सर्वोच्च प्रति लिटर धाव मिळाली.  याचाच अर्थ ज्या मार्गावर मी ताशी ११० / ११० किमी इतका कमाल वेग घेतला होता त्या मार्गावर मला इंधन कार्यक्षमता अतिशय कमी असल्याचे आढळले.  परतीच्या प्रवासातही हेच दिसून आले की जिथे माझा वेग कमी त्या मार्गावर मला इंधन कार्यक्षमता अत्युच्च मिळाली आहे.  प्रत्येकच ठिकाणी इंधनाची टाकी पूर्ण भरणे शक्य न झाल्याने त्या त्या वेळी इंधन कार्यक्षमता मोजता येऊ शकली नाही.  तसेच मोठ्या अंतरावरील सरासरी इंधन क्षमतेचे मापन करण्याकरिता मी दिल्ली धुळे प्रवासानंतर जो धुळे पुणे आणि पुन्हा पुणे धुळे असा प्रवास केला त्यावेळच्या इंधन भरल्याच्या नोंदीही खालील तक्त्यात दर्शविल्या आहेत.
  km
  Place
  Amount (Rs.)
  Rate
  Qty
  KMPL
  21577
  Dhule
  2250
  79.28
  28.38

  21934
  Ratlam
  2032
  77
  26.39
  13.52805118
  22313
  Bandanwara
  2012.94
  75.96
  26.5
  14.30188679

  New Delhi
  500
  72.47
  6.899

  22800
  New Delhi
  1710.29
  72.47
  23.6
  15.9675382
  22944
  New Delhi
  979.79
  72.47
  13.52
  10.6509354
  23313
  Dudu
  2000.16
  75.85
  26.37
  13.99320554
  23750
  Jaora
  2116
  77.06
  27.46
  15.91456522
  24037
  Sendhwa
  1000
  78.2
  12.79

  24179
  Zodage
  1092
  79.52
  13.73
  16.17639852
  24576
  Rajgurunagar
  2319.35
  79.43
  29.2
  13.59592558
  2999
  TOTAL
  18012.53

  206.5
  14.52595441

 4. ओम्नी वाहनाचा आसन पट्टा मध्येच घट्ट होऊन शरीराला काचतो.  यापूर्वी एकदा मी हमी कालावधीत आसन पट्टा बदलून घेतला होता पण काही दिवसातच हा आसन पट्टादेखील घट्ट होऊ लागला.  ओम्नी वाहनाच्या विशिष्ट रचनेमुळे आसन पट्टा अशा प्रकारे घट्ट होतो अशी माहिती मला सेवा केंद्रात मिळाली.  केवळ पोलिसांकडून दंड आकारला जाऊ नये म्हणून मग आसन पट्टा वरून खेचताना जरा जास्त प्रमाणात खेचावा आणि त्याच्या वरील टोकाकडे तो थोडासा दुमडून त्यास यू क्लिप लावावी अशी युक्तीही मला सेवा केंद्रातील वाहनचालकाने सांगितली.  खरे तर इतर कार्सच्या तूलनेत ओम्नीचे आसन बरेच उंचावर आहे आणि सुकाणू चक्र (स्टीअरिंग व्हील) खाली आहे.  इतर   कार श्रेणीतील वाहनांमध्ये अपघात प्रसंगी सुकाणू चक्र शरीरावर आदळण्याचा जसा धोका असतो तसा तो ओम्नी वाहनात अजिबात नसतो.  सबब ओम्नी वाहनास आसन सुरक्षा पट्ट्याची गरज व उपयोग अजिबात नाही.  तरी ज्याप्रमाणे बस अथवा ट्रक चालकाने आसन सुरक्षा पट्टा लावला आहे किंवा नाही हे पोलिस अजिबात तपासत नाही त्याचप्रमाणे ओम्नीलाही या तपासणीतून वगळले पाहिजे.
एकूणच मध्यप्रदेशातील रस्ते व पोलिस यांचे अनुभव चांगले आहेत.  तूलनेने राजस्थान पोलिस व रस्ते यांचे अनुभव अतिशय वाईट म्हणावे लागतील.  दिल्ली येथेही रस्ते बरे आहेत.  पोलिस कुठे दिसलेच नाहीत.  अगदी राजधानीच्या मुख्य रस्त्यांवरही टाटा एस मॅजिक वाहनातून २५ / ३० प्रवासी कोंबून नेले जात असतानाही त्यांना पोलिस दंड करताना दिसत नाहीत ही आश्चर्याची गोष्ट आहे.  महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बेकायदेशीर वाहतूक होताना निदान मी तरी पाहिली नाही.  रहदारीच्या शिस्तपालनाकरिता मुंबईच्या बर्‍याच भागांमध्ये तर तीन आसनी रिक्षांना देखील परवानगी नाही.  देशाच्या राजधानीत मात्र सर्रास  ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, इलेक्ट्रीक बाईकला मागे सहा आसने जोडलेल्या रिक्षा, टाटा मॅजिक एस यांची वाहतूक सुरूच असते.

असो. तर असा हा सलग १२०० किमीचा प्रवास आम्ही धुळे ते दिल्ली आणि दिल्ली ते धुळे मिळून दोन वेळा केला. प्रवासास निघण्याआधीही अनेकांनी मला असा प्रवास न करण्याविषयी सुचविले होते.  प्रवासाहून आल्यावरही अनेकांनी तुम्ही यातून काय साध्य केले अशी विचारणा केली.  यापेक्षाही कमी खर्चात दोघे विमानाने जाऊन आला असता असेही लोकांचे मत पडले.  एक मात्र खरे की, यापैकी कुणीही सलग एका वेळी इतका लांबचा प्रवास स्वत:च्या वाहनाने रस्त्यावरून केला नव्हता.

या प्रवासातून आम्ही काय साध्य केले अशी विचारणा करणार्‍यांना मला इतकेच सांगावेसे वाटते की, अनेक जण गिर्यारोहण, पॅराजम्पिंग, पॅराग्लायडिंग आणि अजून काही साहस कृत्ये करतात त्यातून त्यांना काय साध्य होते?  मध्यंतरी एका युवतीने उत्तर ध्रुव आणि नंतर दक्षिण ध्रुव अशा दोन्ही ठिकाणी पॅराजम्पिंग केले.  तिला त्यातून काय साध्य झाले?  खरे तर तिचे तिथे काही कामही नव्हते.  ती तर फक्त साहस करण्याकरिताच तिथवर गेली.  मला तरी निदान दिल्लीला जायचे काही तरी प्रयोजन होते.  विमानाने किंवा आगगाडीने जावे लागणार होतेच.  त्याऐवजी स्वत:च्या वाहनाने गेलो इतकेच.  म्हणजेच इच्छित कार्य घडण्यासोबतच साहसही घडले.  नाहीतरी स्वतंत्र रीत्या साहसी मोहिमा घडवाव्या हे निदान मला तरी पटत नाही.

व्हर्टिकल लिमिट या गाजलेल्या चित्रपटात सुरुवातीस एक साहसी गिर्यारोहण मोहीम दाखविली आहे.  या मोहिमेत एक वृद्ध आणि त्याचा एक मुलगा व मुलगी असे तिघे एका संकटादरम्यान नाईलाजास्तव असा एक निर्णय घेतात की ज्यामुळे वृद्धाचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू होतो व त्याची मुले जगतात.  त्यानंतर मुलगा साहसी मोहिमांमधून अंग काढून घेतो व नॅशनल जिओग्राफिक करिता कार्य करू लागतो.  त्याच्या कार्यातही साहस असते परंतु ते कार्याबरोबरीनेच येत असते.  याउलट त्याची बहीण केवळ साहसाच्या समाधानाकरिता अशा मोहिमांमध्ये भाग घेतच राहते.  एक वेळ अशी येते की ती तिच्या मोहिमेदरम्यान संकटात सापडते.  तेव्हा तिच्या सुटकेकरिता जे पथक जाते (रेस्क्य़ू टीम) त्यात भाऊ देखील सामील होतो आणि तिला सुखरूप सोडवून आणतो.  बहीण साहसाकरता साहस करते तर भाऊ काही एका निश्चित हेतूने साहसी मोहिमेत सामील होतो.  यात भावाचा निर्णय योग्य आहे असे निदान मला तरी वाटते.

हौशी साहसवीरांचे जग नेहमीच कौतूक करीत आले आहे.  सहेतूक कार्यात साहसाचे मिश्रण करणार्‍यांचे जगाने कौतूक करावे अशी त्यांची अपेक्षा नसतेच; निदान त्यांना नाउमेद तरी केले जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा हा लेख संपविताना व्यक्त करतो.

http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=03072014103004#