१० फेब्रुवारी २०१० रोजी मी मारूति-सुझुकी इंडिया लिमिटेड च्या माय कार पुणे प्रायवेट लिमिटेड या वितरकाकडून आठ आसनी ओम्नी हे वाहन खरेदी केले. वाहनाचा वापर सुरुवातीपासूनच अतिशय कमी राहिल्यामुळे वाहनाची हमी (वॉरंटी) ४०,००० किमी अथवा दोन वर्षे अशी असली तरीही वाहन सुरुवातीच्या दोन वर्षांत केवळ १३००० किमीच वापरले गेले होते.
३० जुलै २०१२ रोजी कामानिमित्त पुण्याहून धुळे येथे राहावयास आल्यानंतर निवास आणि कार्यालय एकाच आवारात असल्यामुळे वाहनाचा वापर तर केवळ तीन / चार महिन्यातून एकदा पुण्याला जाण्यासाठीच होऊ लागला. इमारतीच्या आतील वाहन तळात एकदा वाहन उभे केले म्हणजे कित्येकदा तर ते सलग तीस-चाळीस दिवस सुरू देखील केले जात नसे. एका जागी उभे राहून टायर्सची झीज होऊ नये म्हणून मीच वाहन हाताने ढकलून मागे पुढे करायचो. वाहनाची २+२ वर्षी अशी अतिरिक्त हमी देखील ६०००० किमी पर्यंत असूनही डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत वाहन केवळ २१००० किमीच वापरले गेले होते.
वाहनाच्या हमी कालावधीत आतापर्यंत दोनवेळा क्लच प्लेट, एकदा स्टीअरिंग गिअर बॉक्स, एकदा शॉक ऍब्सॉर्बर, एकदा वायपर मोटर आणि इतरही काही लहान मोठे सुटे भाग बदलून घेतले होते.
१० फेब्रुवारी २०१४ ला वाहनाचा हमी कालावधी संपण्यापुर्वी त्याचा अजून थोडा जास्त वापर झाला तर हमी कालावधीत अजून काही सुटे भाग बदलून घेता आले असते.
दरम्यानच्या कालावधीत पत्नीनेही अनेकदा तिच्या माहेरी दिल्लीला आम्ही दोघांनी जायला हवे असे सूचविले होते. एप्रिल २०१२ मध्ये विवाह झाल्यापासून अथवा त्यापूर्वीदेखील एकदाही मी तिचे घर पाहिले नसल्याची तिची तक्रार होती. त्याशिवाय ती दिल्लीत नोकरी करीत असताना तिने शीतकपाट (रेफ्रिजरेटर), धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन), अतिसुक्ष्म लहर भट्टी (मायक्रोवेव्ह ओव्हन), विविध विषयांवरील अनेक पुस्तके, एअरोबिक्स स्टेपर, व्हायब्रेशन वेट लूझर, इत्यादी ज्या वस्तू विकत घेतल्या होत्या त्याही इथे धुळ्यात आणण्याविषयी ती आग्रही होती. अर्थातच या वस्तू आणावयाच्या म्हणजे आम्ही आगगाडी अथवा विमानाने दिल्लीला गेलो तरी परतताना एखादा ट्रक भाड्याने करावा लागणार हे उघड होते आणि त्या वस्तूंच्या किंमतीच्या तूलनेत वस्तूंच्या वाहतूकीचा खर्च जास्त होणार हे उघड होते.
तेव्हा काही ठळक मुद्दे विचारात घेतले ते असे:-
- आम्ही दोघे दिल्लीला जर विमानाने गेलो तर जाऊन येऊन किमान वीस हजार रूपये इतका खर्च येणार. आणि दिल्लीला पत्नीच्या माहेरी किमान एकदा तरी मला जाणे भाग आहेच.
- ओम्नी वाहनाचा अजून काहीसा वापर हमी कालावधी पूर्वी करणे भाग आहे.
- पत्नीने माहेरी जमविलेल्या वस्तू धुळ्यात आणणे ही तितकेच आवश्यक आहे.
वरील तीन मुद्यांपैकी मुद्दा क्रमांक दोन हा माझ्या इच्छेचा भाग होता आणि मुद्दा क्रमांक एक व तीन हे माझ्या पत्नीच्या इच्छेचा भाग असल्यामुळे अनिच्छेने का होईना परंतु मला ते मान्य करणे भाग होते. तेव्हा या तीनही गोष्टी साध्य व्हाव्यात या उद्देशाने मी माझे ओम्नी वाहन घेऊन दिल्लीला जायचे ठरविले. या आठ आसनी वाहनात सर्वात सुरुवातीला चालक व सहचालकाची दोन सुटी आसने आहेत त्यांच्या बरोबर पाठीस लागून तीन आसनांचा एक एकत्रित बाक आहे ज्याची दिशा विरुद्ध आहे. या बाकाच्या समोर अजून एक तीन आसनांचा एकत्रित बाक आहे. हा जो शेवटचा तीन आसनांचा बाक आहे तो नट बोल्ट्स च्या साहाय्याने वाहनात बसविलेला आहे. तो बाक डिकीचे मागचे झाकण उघडून नट बोल्ट्स खोलून मी अगदी दहा मिनीटांत वाहनातून वेगळा काढला. आता वाहनात बरीच मोकळी जागा झाली.
यानंतर धुळ्याहून दिल्लीस जाण्याच्या प्रवासाचे नियोजन सुरू झाले. गुगल मॅप्स मध्ये धुळ्याहून विविध टप्प्यांनुसार अंतराचे मापन केले असता खालील माहिती मिळाली.
- Manpur 218 किमी, 2 घंटे 57 मिनट
- Ratlam 345 किमी, 4 घंटे 41 मिनट
- Chittaurgarh 544 किमी, 7 घंटे 41 मिनट
- Bhilwara 601 किमी, 8 घंटे 28 मिनट
- Jaipur 852 किमी, 11 घंटे 39 मिनट
- Gurgaon 1,082 किमी, 15 घंटे 1 मिनट
- Rohini New Delhi 1,125 किमी, 15 घंटे 54 मिनट
मी सध्या अवधान, धुळे येथे राहतो. या जागेपासून सरळ महामार्ग क्रमांक तीन वरून साधारण २१८ किमी आग्र्याच्या दिशेने गेल्यावर मानपूरच्या अलीकडे रतलाम जाण्याकरिता डावीकडे वळावे. त्यानंतर रतलाम चित्तौडगड, भिलवाडा, जयपूर, गुरगाव मार्गे रोहिणी, नवी दिल्ली येथे जावे असे ठरविले. महामार्ग क्रमांक तीन वरूनच सरळ आग्रा येथे जाऊन तेथून दिल्लीस जाण्याचाही अजून एक पर्याय उपलब्ध होता परंतु तो मार्ग खराब आहे असे अनेकांनी सांगितल्यामुळे तो पर्याय विचारात घेतला गेला नाही.
गुगल मॅप्स ने स्थळांचे अंतर व पोचण्याची अंदाजे वेळ दाखविली होती, ती पाहता आणि आपणांस त्यापेक्षा दीडपट वेळ लागेल हे लक्षात घेता चित्तौडगड अथवा भीलवाडा येथे मुक्काम करावयाचे ठरले. म्हणजे अंदाजे सहाशे किमी वाहन एका दमात चालवावे लागणार होते. वाहनात एकच चालक असताना एका वेळी इतका प्रवास करू नये असे मला मित्र, परिचित, नातेवाईक सर्वांनीच सुचविले. माझ्या धाकट्या भावाने पूर्वी एकदा सलग एका दिवसात ४५० किमी वाहन चालविले होते तेव्हा थकवा / झोप येऊ नये म्हणून त्याने व्हर्टिन आठ मिग्रॅ. ही गोळी सकाळी नाष्टा करून प्रवासास सुरुवात करण्यापुर्वी घेतली होती. मीही तशी गोळी घ्यावी असे त्याने मला सुचविले.
सोबत खाण्यापिण्याचे जिन्नस, पुरेसे पिण्याचे पाणी आणि थंडीत आवश्यक ते कपडे इत्यादी सर्व सामान वेगवेगळ्या थैल्या व सुटकेसेस मध्ये भरून ते सर्व वाहनात व्यवस्थित ठेवले आणि शुक्रवार, १७ जानेवारी २०१४ रोजी सकाळी सात वाजता अवधान, धुळे येथून प्रवासास प्रारंभ केला. भावाच्या सूचने प्रमाणे न्याहारी करून व्हर्टिन आठ मिग्रॅच्या एका गोळीचे सेवनही केले. प्रवासास निघायच्या आठवडाभर आधीच वाहनाची जवळच्या परिसरात एक फेरी मारून चाचणी घेतली आणि ते सुस्थितीत असल्याची खात्रीही करून घेतली होती. त्याबरोबरच इंधन टाकीही पूर्ण भरून घेतली होती.

प्रचंड थंडी आणि धुके यांचा सामना करीत आणि महामार्ग क्रमांक तीनच्या घाटातील ट्रक्सच्या रहदारीतून वाट काढीत तीन तासांत २१८ किमी वरील मानपूर जवळचे रतलामला जाण्यासाठीचे डावे वळण गाठले. हा मार्ग अतिशय चांगल्या दर्जाचा असून रहदारी देखील फारशी नाही हे जाणवले. रतलामपाशी आधी वाहनात इंधन भरले आणि नंतर मध्यान्ह भोजन उरकले. भोजनानंतर चित्तौडगडच्या दिशेने प्रयाण केले. मध्यप्रदेश राज्याची सीमा नयागांव येथे संपते. तोपर्यंतचा प्रवास अगदी सुकर होता आणि गुगल मॅप्स ने दर्शविलेल्या अंदाजित वेळेपेक्षाही कमी वेळात आम्ही ठिकाणे गाठत होतो. सरासरी वेग ताशी सत्तर किमीपेक्षाही अधिक राखला गेला होता. वातावरणात थंडीही बरीच जाणवत होती. दुपारी तीनच्या सुमारास राजस्थान राज्यात प्रवेश केला आणि वातावरणात प्रचंड उकाडा जाणवू लागला. त्याचप्रमाणे रस्ताही अगदीच खराब होता. दुभाजकाचा पत्ताच नाही, अतिशय अरूंद मार्ग आणि त्यातच मार्गावर मोठ्या आकाराचे खड्डे. वाहन चालविणे अतिशय त्रासदायक होऊ लागले. अनेकदा वाहनापुढे अतिशय मंद गतीने चालणारी अवजड वाहने आल्याने रस्त्याखाली उतरून डाव्या बाजूने मातीतून पुढचे वाहन ओलांडून पुन्हा रस्त्यावर येण्याची कसरत करावी लागली. अशा प्रकारे साधारण साठ किमी खडतर प्रवास केल्यावर चित्तौडगडनजीक पुन्हा रस्त्याचा दर्जा सुधारलेला आढळला. त्यानंतर भीलवाडा पासून पुन्हा वेगाने प्रवास करता आला.
वाहनाचा आसन सुरक्षा पट्टा अतिशय घट्ट होऊन उजव्या खांद्यापाशी काचू लागला म्हणून सोडून दिला आणि नेमके महामार्गावरील पोलिसांनी अडविले. तीनशे रूपये दंड भरा अशी मागणी केली. खरे तर नियमानुसार केवळ शंभर रूपये इतकाच दंड असूनही तीनशे रूपये भरावे लागले, कारण इतर वाहनचालकही निमूटपणे तेच करीत होते. हुज्जत घालून फक्त वेळ वाया जाण्याखेरीज इतर काहीच हाती लागले नसते. दंड भरून पुन्हा मार्गस्थ झालो आणि थोड्या वेळाने एके ठिकाणी थांबून इंधन भरले आणि पुढे लगेच रात्रीचे भोजनही उरकून घेतले. भोजनापश्चात् अजमेर जयपूर महामार्गाला लागलो. हा महामार्ग अगदी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची आठवण करून देणारा आहे. या मार्गावर अतिशय कमाल वेगाने वाहन हाकीत रात्री दहाच्या सुमारास जयपूर येथे पोचलो. घरापासून आता आम्ही साडे आठशे किमी अंतरावर आलो होतो. जितके अंतर पार केले होते त्याहूनही कमी अंतर पार करावयाचे होते. आता यापुढचा मार्ग म्हणजे जयपूर दिल्ली द्रुतगती मार्ग होता तोही अजमेर जयपूर मार्गाइतकाच प्रशस्त असेल तर आताच पुढे मार्गस्थ व्हावे कारण दिवसा दिल्लीत अतिशय जास्त रहदारी असते असे पत्नीने मला सूचविले. तसेही रात्री दहा वाजता जयपूर सारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळी आगाऊ नोंदणीशिवाय हॉटेलात खोली मिळविणे सोपे नव्हते आणि मिळाली तरी इतक्या प्रचंड थंडीत व्यवस्थित झोप होऊन पुन्हा दुसर्या दिवशी ताजे तवाने होऊन पुढचा प्रवास नीटपणे करता येईल याची काहीच खात्री देता येत नव्हती. तेव्हा सर्व बाजूंनी विचार करून मी प्रवास पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.
माझ्या पत्नीचा भाऊ अविनाश गुरगाव येथे नोकरी करतो. त्याची कार्यालयीन वेळ रात्री दहाच्या सुमारास संपत होती. पत्नीने त्यास दूरध्वनीद्वारे संपर्क करून वेळ संपल्यानंतरही अधिक काळ कार्यालयात थांबण्यास सांगितले, जेणे करून आम्ही गुरगावात पोचू तेव्हा तो आमच्या सोबत येऊन रोहिणी, नवी दिल्ली येथ पर्यंत जाण्याकरिताच्या पुढील प्रवासास आम्हांस मार्गदर्शन करू शकेल.
जयपूरहून दिल्लीला जाण्याचा मार्ग केवळ नावापूरताच द्रूतगती मार्ग आहे हे लवकरच आमच्या लक्षात आले. पथकर नाक्यांची वारंवारिता जास्त आणि तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा, रस्त्यात अनेक उड्डाण पुलांची रखडलेली कामे, रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे आणि अनेक ठिकाणी महामार्गाचे अरूंद असणे या सर्व समस्यांसोबत अजून एक मोठी समस्या ही होती की महामार्गावर प्रवास करणारी बहुतांश अवजड वाहने होती आणि ती एकमेकांना समांतर जात असल्यामुळे अनेकदा पुढे जाण्यास वाट मिळत नव्हती. हॉर्न वाजवून वाजवून मी बेजार झालो तरी ही वाहने सहजी वाट देत नव्हती. या सर्व समस्यांमुळे रात्रीचे दोन वाजले तरीही आम्ही गुरगावपर्यंत पोचू शकलो नाही. इकडे अविनाश कडून पुन्हा पुन्हा कुठवर पोचलात अशी विचारणा होत होती. पहाटे अडीच वाजता आम्हाला महामार्गावर अनेक ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आढळल्या. पुढे जायला वाटच दिसत नव्हती. काही हलकी वाहने बाजूच्या सेवा रस्त्यावर उतरून पुढे मार्गक्रमण करीत होती म्हणून मीही तेच केले, परंतु तरीही पुढे सरकण्याचा वेग लक्षणीय रीत्या मंदावला होता. पुढे पुढे तर वाहन अगदी इंच इंच गतीने सरकत होते. आता तुम्ही हल्दीराम पथकर नाक्यापाशी पोचाल तेथून पुढे आल्यावर उजवीकडे वळा असे आम्हाला अविनाश सांगत होता. हा हल्दीराम पथकर नाका काही केल्या आमच्या दृष्टीपथात येत नव्हता. तेव्हा तुम्ही महामार्ग क्रमांक आठ वर च आहात ना? याची खात्री करून घ्या असे अविनाशने मला सूचविले. आम्ही महामार्ग क्रमांक आठ वरच असल्याची खात्री करून घेतली आणि तो हल्दीराम पथकर नाका अजून बराच पुढे असल्याचेही आम्हाला समजले. वाहनांची तोबा गर्दी, पहाटेची वेळ, संथ गतीने वाहनांचे पुढे सरकणे आणि तशातच पाऊस सुरू झाला. मी वायपर फिरविण्यास सुरुवात केली परंतु समोरच्या काचेवर घट्ट धूळ, सिमेंटचे कण उडालेले असल्यामुळे वायपरचे रबर फाटले आणि वायपर अतिशय थरथरत फिरू लागला. समोरचे नीट दिसतही नव्हते. अशाच परिस्थितीत वाहन पुढे दामटले आणि थोड्या वेळात हल्दीरामचा पथकर नाका दिसला. परंतू वाहनांच्या रांगा प्रचंड मोठ्या होत्या. अशा वेळी काही हलकी वाहने अगदी डावी कडून जाताना दिसली म्हणून मीही त्यांच्या पाठी मागेच माझे वाहन पळविले. बरेच अंतर पुढे गेल्यावर कळले की हा मार्ग बंद आहे, मग सर्वांबरोबरच मीही वाहन उलट दिशेने फिरवून मुख्य रांगेत ट्रक्सच्या मध्ये घुसविले. असे करीत करीत एकदाचा हल्दीराम पथकर नाका पहाटे सव्वातीन नंतर ओलांडला.
आता नेमक्या कुठल्या टिकाणी उजवीकडे वळायचे हे विचारण्या करिता पत्नीने अविनाशला संपर्क केला. तो एकंदरीत आम्हाला डावी उजवीकडे कोणत्या इमारती दिसत आहेत ते विचारत होता आणि सरळ मार्गक्रमण करण्याचाच सल्ला देत होता. अचानक डी एल एफ ची इमारत आम्हाला दिसली हे ऐकल्यावर त्याने पुढच्या वळणावर उजवीकडे वळून यू टर्न घेण्यास सांगितले. पत्नीने मला त्याचा तसा निरोप दिला. परंतु बरेच अंतर पुढे जाऊनही रस्ता दुभाजक अखंडच दिसत होता आणि यू टर्न घेण्यास वाव नव्हता. तसे मी पत्नीला सांगितले. तीही पुन्हा पुन्हा अविनाशला उजवीकडे वळण घेण्यास कुठे जागा आहे हे विचारत होती. अचानक माझ्या लक्षात आले की हा सारा रस्ता वरून जाणारा (इलेव्हेटेड रोड) आहे. म्हणजे मला यू टर्न घेण्याकरिता रस्तादुभाजकाचा खंडित भाग ओलांडायचा नसून डावीकडे निघणार्या एक्झिट्स मधून बाहेर पडून खाली येऊन रस्त्या खालून यू टर्न घ्यायचा आहे. मी तसे अविनाशला विचारून खात्री करून घेतली. आता एकच समस्या होती ती म्हणजे आमचे वाहन अगदी उजवी कडे होते आणि डावीकडून जाणार्या इतर वाहनांचा तसेच आमच्याही वाहनाचा वेग बराच जास्त होता. हळूहळू इंडिकेटर्स देत डावीकडे व्हावे लागणार होते. तसे करेपर्यंत अजून दोन डाव्या एक्झिट्स पार झाल्या. शेवटी तिसर्या एक्झिट मधून बाहेर पडत यू टर्न घेतला आणि अजून काही किमीचे अंतर पार करीत एकदाचे आम्ही अविनाशच्या कार्यालयीन इमारतीपाशी पोचलो.
अविनाशला सोबत घेतले आणि पुन्हा पुढे जाऊन यू टर्न घेतला कारण मगाशी आम्ही ज्या इलेवेटेड रोडने जात होतो त्याच मार्गाने पुन्हा रोहिणी, नवी दिल्लीला जायचे होते. थोड्या वेळातच पहाटे ०४:३० च्या सुमारास आम्ही नवी दिल्लीत प्रवेश केला. त्यानंतर अविनाशने दिशादर्शन केले आणि त्यानुसार मी रोहिणी येथील त्यांच्या घरापाशी पहाटे ०५:३० च्या सुमारास पोचलो. शेवटच्या अर्धा तासाच्या प्रवासात मला प्रचंड झोप येत होती. कसेबसे झोपेला टाळत मी वाहन घरापर्यंत आणले.
खाली वसाहतीच्या वाहनतळापाशी वाहन उभे करून वरच्या मजल्यावर सर्व सामान आणले आणि सकाळी ०६:०० ते दुपारी ११:०० पर्यंत एक झोप घेतली. झोप झाल्यावर सकाळची आन्हिके उरकून भोजन केले आणि शनिवार १८ जानेवारीचा उरलेला वेळ आम्हाला भेटावयास आलेल्या परिसरातील इतर नातेवाईंकाशी बोलण्यात घालविला.
त्यानंतर रविवार १९ जानेवारी रोजी पत्नीच्या काकांना व मोठ्या आत्याला भेटावयाचे ठरले. मी माझ्याच वाहनातून प्रवास करायचे ठरवित होतो परंतु पत्नी व सासुबाई या दोघींनीही सक्त मनाई केली. त्यांच्या मते दिल्लीतल्या प्रचंड वाहतूकीत मला वाहन चालविणे शक्य होणार नव्हते. शेवटी त्यांच्या आग्रहाला बळी पडून मेगा कॅब द्वारे संचलित टूरिस्ट टॅक्सी मागविण्यात आली. त्या टॅक्सीत बसून आमचा प्रवास सुरू झाला. पत्नीच्या काकांची भेट झाली. त्यानंतर सागर रत्न उपाहारगृहात भोजनही झाले, परंतु काही कारणास्तव मोठ्या आत्याबाईंची भेट होऊ शकली नाही. मराठी संकेतस्थळावर लेखन करणारे माझे एक स्नेही श्री. अरूण जोशी हेही दिल्लीतच राहतात हे मला ठाऊक होते. तेव्हा त्यांची भेट घेण्याचे ठरविले. वेस्ट मुकर्जी नगर परिसरात राहणार्या श्री. जोशी यांचे निवास स्थान सागर रत्न उपाहारगृहापासून जवळच असल्याचे समजले आणि मग आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळविला.
अरूण जोशी यांच्या घरी गप्पा मारण्यात आमचा वेळ अगदी मजेत गेला. त्यांच्याकडून निघून पुन्हा रोहिणी येथील निवासस्थानी गेलो तेव्हा टूरिस्ट टॅक्सीचे बिल सत्तावीसशे रूपये झाल्याचे समजले आणि मला धक्काच बसला. त्यानंतर पुढचा दिवस सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी पत्नीच्या सर्वात धाकट्या आत्याबाईंना भेटावयाचे ठरले. टूरिस्ट टॅक्सी इतकी महागडी आहे हे ठाऊक झाल्यामुळे आता माझ्या वाहनाचाच वापर करावयाचे ठरवले. ठरल्याप्रमाणे दुपारी दोन वाजता मी माझी पत्नी व माझ्या सासुबाई असे आम्ही तिघे रोहिणीतून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागलो. दिल्लीतली वाहतूक अतिशय बेशिस्त असल्याचे जाणवले. देशाची राजधानी असूनही बिनदिक्कत इथे दुचाकी वाहनावर तिघे प्रवास करताना आढळत होते. सायकल रिक्षा व विजेवर चालणार्या मोटर सायकल रिक्षांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. टाटा एस मॅजिक वाहनातून तर वीस पंचवीस प्रवासी कोंबले जात होते. अशा परिस्थितीतून वाट काढीत एकदाचे आत्याबाईंच्या घरी पोचलो. काही वेळ तिथे थांबून संध्याकाळी रोहिणीत परतलो.
आता दिल्लीच्या वाहतूकीचा अंदाज आला आणि तिथे वाहन चालविण्याचा सरावही झाला. पुढचा दिवस दिनांक २१ जानेवारी मंगळवार - दिल्ली विद्यापीठात शिकविणार्या आणि तिथेच राहणार्या पत्नीच्या आतेबहीणीला भेटावयाचे ठरले. हे जरा लांबच्या अंतरावरील ठिकाण होते आणि रहदारी देखील जास्त होती. त्यामुळे आदल्या दिवशीपेक्षा थोडा जास्त त्रास झाला तरी सायंकाळी ०५:०० वाजता विद्यापीठातील त्यांच्या निवासस्थानी पोचलो. सायंकाळी आठ वाजता परत रोहिणी कडे येण्यास सुरूवात केली आणि एक वेगळीच समस्या उद्भवली. एके ठिकाणी रस्त्याचे वेगवेगळ्या पातळीत तीन भाग केले होते आणि तसे दर्शविणारे दगड बसविण्याचे काम अपूर्णावस्थेत होते. सायंकाळच्या अपुर्या प्रकाशात ते नीट दिसले नाही आणि वाहनाची डावीकडील दोन चाके खालच्या पातळीच्या रस्त्यावर आणि उजवीकडची दोन चाके वरच्या पातळीच्या रस्त्यावर येऊन वाहन रस्त्यावरच अडकून बसले. ऍक्सलरेटर पेडलवर कितीही दाब दिला तरी वाहन जागचे हलेना. फक्त मागची चाके जागेवरच फिरू लागली. शेवटी मदतीकरता रस्त्यावरच्या काही लोकांना बोलावले. लगेचच आठ दहा लोक जमले आणि त्यांना वाहनाला हलकासा धक्का देत डावी कडे कमी पातळीच्या भागात आणले. त्यांचे आभार मानत पुढचा प्रवास सुरू केला आणि अर्ध्या तासात रोहिणीला परतलो.
बुधवार २२ जानेवारी - पत्नीचे साऊथ एक्स्टेंशनला काही काम असल्यामुळे तेथे जावे लागले. रोहिणीच्या त्यांच्या घरापासून हे अंतर फारच जास्त म्हणजे ४० किमी आहे. भयंकर वाहतूक, चिखल पाऊस अशा अडचणीतून वाट काढत इच्छित स्थळी पोचलो आणि परतताना क्लच पेडल व ब्रेक दाबण्याचा विक्रमच करावा लागला इतकी वाहनांची तोबा गर्दी. वाहनांच्या पाच समांतर रांगा. कुठली रांग केव्हा पुढे जाईल याचा नेम नाही. हळू हळू इंडिकेटर्स देत सारखे या रांगेतून त्या रांगेत होत एकदाचे अडीच तासात घरी पोचलो तेव्हा आपल्याला दिल्लीच्या गर्दीत वाहन चालविण्याचा पुरता सराव झाल्याचे समाधान झाले. पत्नी व सासुबाईंनीही माझ्या या निष्कर्षास पुष्टी दिली.
त्यानंतर गुरूवार दिनांक २३ जानेवारी रोजी रोहिणीच्या जवळपासच असलेल्या एका ग्रामीण भागात जावे लागले. तिथून परतताना जवळचा मार्ग (शॉर्ट कट) पकडण्याच्या नादात वाहन एका मोकळ्या मैदानातून नेले आणि नेमके ते तिथल्या चिखल, दलदलवजा भागात अडकले. वाहनातून खाली उतरून कोणास मदतीला बोलवावे म्हंटले तर तीही सोय नव्हती कारण वाहनाच्या चारही बाजूला प्रचंड चिखल. त्यात उतरणार तरी कसे? शेवटी वाहन एकदा पहिल्या गियरमध्ये टाकून एक्सलरेटर पेडलवर पूर्ण दाब दिला. वाहनाची मागील चाके वेगात जागेवरच फिरली आणि फिरताना त्यांनी बराचसा चिखल मागे उडविला. त्यानंतर वाहन रिवर्स गिअर मध्ये टाकून पुन्हा एक्सलरेटर पेडलवर पूर्ण दाब दिला. पुन्हा बरेचसे चिखल घुसळले गेले. असे रिवर्स फॉरवर्ड मध्ये अनेक वेळा केल्यानंतर शेवटी एक वेळ अशी आली की, पहिल्या गिअर मध्ये टाकले गेलेले वाहन एक्सलेटर पेडलवर पूर्ण दाब दिले असता हळू हळू इंच इंच पुढे सरकते आहे हे जाणवले. त्याच स्थितीत स्टीअरिंग घट्ट धरून बसून राहिलो आणि पंधरा वीस मिनीटात संपूर्ण दलदल पार करून बाहेर आलो तेव्हा सूटकेचा नि:श्वास टाकला आणि एकदाचे घरी पोचलो.
दिनांक २४ आणि २५ जानेवारी रोजी कुठेच गेलो नाही. घरीच आराम केला. रविवार, दिनांक २६ जानेवारी रोजी अविनाशसोबत त्याच्याच अल्टो ८०० वाहनातून बाहेर फिरलो. काही जरूरीच्या वस्तूंची खरेदी केली आणि सायंकाळनंतर सामानाची आवराआवर सुरू केली. आमच्या दोन सुटकेसेस आणि इतर पिशव्यांसोबतच आता धुलाई यंत्र, अतिसुक्ष्म लहर भट्टी (मायक्रोवेव्ह ओव्हन), विविध विषयांवरील अनेक पुस्तके, एअरोबिक्स स्टेपर, व्हायब्रेशन वेट लूझर, इत्यादी वस्तूही वाहनात भरल्या. शीतकपाट फारच मोठ्या आकाराचे (२०० लीटर्स) असल्यामुळे ते काही वाहनात बसविता आले नाही. बाकी सर्व वस्तू भरल्यावर वाहनाची पुन्हा एक फेरी मारून चाचणी घेतली आणि इंधन टाकीदेखील पूर्ण भरून घेतली.
सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ०६:३० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. याही वेळी आधी न्याहारी आणि व्हर्टिन आठ मिग्रॅचे सेवन केले होतेच. रोहिणीतून बाहेर निघून मुख्य रस्त्याला (रिंग रोड) लागलो तेव्हा बरीच थंडी आणि विरळ धुके होते. हळू हळू धुके नाहीसे झाले आणि हलक्या वाहनांची रहदारी वाढू लागली. अर्थात अवजड वाहने नसल्यामुळे वाहतूकीला वेग होता. सकाळी ०७:३० च्या सुमारास नवी दिल्ली चा पथकर नाका ओलांडून गुरगाव मध्ये प्रवेश केला. वीसच मिनीटांत गुरगावचा पथकर नाकादेखील ओलांडला आणि दिल्ली जयपूर मार्गावर धावू लागलो. येतेवेळी जितका खराब वाटला होता तितका हा मार्ग आता त्रासदायक वाटला नाही. एकतर अवजड वाहनांची वर्दळ तूलनेने कमी होती. दुसरे म्हणजे दिवसा उजेडी उड्डाण पुलांची रखडलेली कामे, मार्गाची कमी जास्त होणारी रूंदी या बाबी पुरेशा लवकर दृष्टीपथात येत असल्यामुळे वाहनाच्या गतीवर आणि सुकाणूवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येत होते.
काही वेळाने मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तपासणी चालविलेली दिसली. यावेळी आम्ही (काचत असले तरीही) आसन सुरक्षा पट्टे व्यवस्थित लावले होते त्यामुळे निर्धास्त होते. तरीही पोलिसांनी आमचे वाहन थांबवलेच. आम्ही वेगमर्यादा ओलांडली असल्याचे त्यांनी आम्हास सांगितले. माझ्या वाहनाने वेगमर्यादा ओलांडली यावर माझा विश्वास नसल्याचे मी त्यांना प्रत्यूत्तरादाखल सांगितले. त्यावर त्यांनी त्यांच्या जिप्सी वाहनात असलेले संगणक मला दाखविले. पडद्यावर माझे वाहन दिसत होते आणि वेग ताशी ७३ किमी इतका दिसत होता. मी समाधानी होत त्यांना वेगमर्यादा ताशी ८० किमी असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी महामार्गावर तुम्ही ८० च काय पण ९० किमी वेगाने देखील वाहन चालवू शकाल परंतू आता शहर हद्दीत तुम्हाला ताशी ६० किमी इतक्या वेगमर्यादेचे पालन करावे लागेल असे सांगितले. तसेच त्यांनी आम्ही कोठून आलो व कोठे चाललो याचीही विचारणा केली. आम्ही दिल्लीहून महाराष्ट्रात चाललो हे ऐकल्यावर रस्ता चूकल्याचेही सांगितले. त्यांच्या म्हणण्यानूसार आम्ही जयपूर शहराच्या हद्दीत प्रवेश केला होता आणि काही अंतर आधीच एक डावीकडचे वळण घेतले असते तर जयपूर बाह्यवळण मार्गे जयपूर अजमेर द्रुतगती मार्गाला लागलो असतो. आता आम्हाला जयपूर शहराच्या हद्दीतून अजमेर रस्त्याला जावे लागणार होते. त्याशिवाय वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल दंड म्हणून रू.१,१००/- (रूपये अकराशे फक्त) भरावे लागतील असे सांगण्यात आले. तसेच वाहनात जे गृहोपयोगी सामान भरले होते त्याबद्दल अजून वेगळा दंड - जो की पोलिस ठरवू शकत नाही आणि त्यासाठी आमच्या वाहनास न्यायालयासमोर सादर करावे लागेल. खरे तर वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल इतक्या रकमेचा दंड होत नाही. तसेच वाहनात सामान भरण्याचा मुद्दा असेल तर पोलिसांच्या जिप्सीतही तीन संगणक आणि इतर सामग्री होती त्याचे काय? अर्थात पोलिसासोबत वाद घालण्यात अर्थ नव्हता. त्याने दंड न भरता तडजोड म्हणून सहाशे रूपये भरण्यास सांगितले. शेवटी घासाघीस करीत त्यास तीनशे रूपये दिले आणि पुढे मार्गस्थ झालो.
त्यानंतर जयपूर शहरातून पुढे अजमेर ला जायचा रस्ता विचारला असता अनेकांना तो ठाऊक नसल्याचे समजले. अनेकांनी चूकीचे मार्गदर्शनही केले. त्यामुळे आम्ही अधिकच गर्दी असलेल्या भागात शिरलो. काही ठिकाणी तर चिंचोळा रस्ता, दोन्ही बाजूला झोपडपट्टी, मध्येच आलेले रेल्वे क्रॉसिंग अशी दिव्ये ओलांडत शेवटी एका डेड एंडपाशी पोचलो. शेवटी तिथून मागे फिरत पुन्हा अनेकांना विचारत एकदाचे मेट्रो लाईनपाशी आलो. रस्त्याच्या वरून जाणार्या मेट्रो लाईनच्या मार्गानेच पुढे गेल्यास अजमेर रस्ता लागेल असे खात्रीने समजल्यावर त्याप्रमाणे मार्ग क्रमू लागलो. जयपूरच्या वाहतूक नियंत्रक दिव्यांचे चक्र दोन मिनीटांहूनही अधिक असल्यामुळे अजूनच वेळेची नासाडी झाली. शेवटी मजल दरमजल करीत जयपूर अजमेर द्रुतगती मार्गावर एकदाचे आलो.
मध्यान्ह भोजन उरकून प्रचंड वेगात प्रवास सुरु केला कारण आधीच पोलिसांमुळे आणि नंतर जयपूर शहरात प्रवेश करून अजमेर मार्ग हुडकण्यात बराच वेळ नाहक खर्ची पडला होता. वाटेत दुदू येथे इंधन भरून घेतले आणि पुढे चित्तौडगढ, भीलवाडा ओलांडून राजस्थान मध्यप्रदेश सीमेच्या ६० किमी अलीकडे पोचलो. पुन्हा एकदा खराब एकेरी रस्त्याचा सामना करावा लागला. रस्त्यावरचे खड्डे, पुढे अवजड वाहनांची गर्दी यासोबतच अंधारामुळेही अजूनच उशीर होत होता. पुन्हा आधीसारखेच रस्त्याच्या खाली उतरून पुढची अवजड वाहने ओलांडावी लागत होती. अंधारामुळे खड्डे नीट दिसत नव्हते आणि वाहनात सामान असल्यामुळे खड्ड्यांची ही समस्या अधिकच जाणवत होती. तरीही मोठ्या नेटाने हा खडतर मार्ग पार केला आणि मध्यप्रदेश सीमेच्या नजीक येऊन ठेपलो.
आता रस्त्यावर दुभाजक होता आणि पुढे बर्याच अंतरावर पथकर नाकाही दिसत होता. दुभाजकाच्या डाव्या बाजूने आम्ही जात होतो आणि पथकर नाक्याच्या अलीकडे आम्ही असल्यामुळे इकडच्या वाहनांची तपासणी केली जात होती. वाहनांची प्रचंड मोठी रांग होती आणि या मंदगतीने समोरचा पथकरनाका ओलांडायला आम्हाला कित्येक तासही लागू शकणार होते. काय करावे ते सूचत नव्हते. अशावेळी अचानक माझ्या निदर्शनास आले की आमच्या पुढे असलेल्या महिन्द्रा झायलो वाहनाने दुभाजक ओलांडून चक्क रस्त्याच्या उजव्या बाजूने (रॉंग साईडने) पुढे जायला सुरुवात केली होती. त्याचा उद्देश तत्काळ माझ्या ध्यानात आला आणि मीही त्याचेच अनुकरण करीत परिणामांचा विचार न करता माझेही वाहन त्याच्या मागे दामटले. एक अतिशय साधी गोष्ट होती. विरुद्ध बाजूने येणारी वाहने ही मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून राजस्थानात शिरली होती. त्यांची तपासणी पथकर नाक्याच्या आधीच करण्यात आली होती त्यामुळे त्या वाहतूकीला वेग होता. त्या पट्ट्यात कुठलीही तपासणी चालु नव्हती. त्या वाहनांच्या बाजुला मिळणार्या अरूंद चिंचोळ्या वाटेतून महिन्द्रा झायलो वाहन वेगाने चालले होते आणि मीही त्या वाहनाचे मागोमाग माझे वाहन दामटत होतो. आम्ही रस्त्याच्या अगदी उजव्या बाजूने चाललो होतो परंतु राजस्थान पोलिस आमच्या वाहनांकडे ढुंकूनही पाहत नव्हते. अगदी अल्प वेळेत आम्ही फार मोठा पल्ला पार करून पथकर नाक्यापाशी पोचलो होतो. आता अगदीच कसोटीचा क्षण होता कारण पथकर नाक्यापाशी अंतिम तपासणी होती आणि तिथे आम्हाला कुणीही चूकीच्या दिशेने नाका ओलांडून देणार नव्हते. मी झायलोवर अगदी बारकाईने लक्ष ठेऊन होतो. झायलो चालकाने अवजड वाहनांच्या गर्दीतून मिळालेल्या फटींमधून अगदी शिताफीने वाहन रस्त्याच्या मधोमध आणून उभे केले. त्याच्या मागोमाग मीही येऊन पोचलो. त्याने रस्ता दुभाजकावर वाहन चढविले आणि संधी मिळताच पुन्हा दुभाजकाच्या डाव्या बाजूला असलेल्या अवजड वाहनांच्या गर्दीत आपले वाहन घुसविले. मध्ये जराही अंतर पडू न देता मी त्याचे अनुकरण केले. आता आम्हा दोघांचीही वाहने योग्य प्रवाहात आली होती. पथकर नाक्यावर अंतिम तपासणी होऊन आम्ही मध्यप्रदेश राज्यात प्रवेश केला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. आता पुन्हा चांगला प्रशस्त गुळगुळीत रस्ता समोर दिसत होता. आमचा प्रवास पुन्हा वेगात सुरू झाला. थोड्या वेळाने रात्रीचे भोजन उरकून आम्ही रतलामच्या दिशेने कूच केले.
रतलाम पार केल्यावर आता आम्हाला मुंबईला जाणारा मार्ग धरायचा होता. त्यानुसार मार्गफलक पाहून जावराच्या दिशेने आम्ही निघालो. जावराला पोचलो आणि पुन्हा इंधन भरून घेतले. बाहेर प्रचंड गारवा होता आणि आम्हाला खिडक्यांच्या काचा बंद करणे भाग होते. परंतु तसे केले म्हणजे समोरच्या काचेवर आतील बाजूस बाष्प साचत होते. ते सारखे पुसत बसणे ही एक समस्या होऊन बसली. त्यामुळे थंडी वाजत असूनही अत्यंत नाईलाजाने खिडकीच्या काचा अगदी किंचित किलकिल्या होतील इतपत खाली घेतल्या. या सर्व अडचणींमुळे वाहनाचा वेग काहीसा मंदावला होता. रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि आता मला समस्या जाणवू लागली ती झोपेची. डोळ्यांवर गाढ झोप येऊ घातली होती आणि तिच्यावर मात करीत मी कसाबसा वाहन हाकत होतो. पत्नी तर शेजारच्या आसनावर सुरक्षा पट्टा बांधून कधीची निद्राधीन झाली होती. मी कोणत्या स्थितीत वाहन चालवित होतो याची तिला अजिबात कल्पनाही नव्हती. आम्ही अजून मध्यप्रदेश राज्यातच असल्यामुळे महामार्गावर दर ठराविक अंतरावर वाहने उभी करून विश्रांती करण्याचीही सोय उपलब्ध होती. या ट्रक बे वर अनेक ट्रक्स उभे होते आणि त्यांचे वाहन चालक / सहचालक विश्रांती घेत होते. सोबत स्वच्छतागृहांचीही सुविधा होती. अनेकदा माझ्या मनात आले की आपणही त्या जागी वाहन उभे करून वाहनात जराशी विश्रांती घ्यावी. परंतु पुन्हा तो विचार बाजूस सारून मी वाहन पुढे नेत होतो. दोनदा वाहन थांबवून मी डोळ्यांवर थंड पाणी मारले आणि पुन्हा प्रवास पुढे चालु ठेवला. रात्री दोनच्या सुमारास झोपेचे आक्रमण फारच तीव्रतेने होऊ लागल्यावर पुन्हा एक व्हर्टिन आठ मिग्रॅ चे सेवन केले आणि पुन्हा प्रवासास सुरूवात केली. थोडे अंतर पुढे जाताच मला दिसले की एक जोडरस्ता आणि पूल ओलांडला की आम्ही महामार्ग क्रमांक तीन (आग्रा मुंबई रस्ता) वर पोहोचू. आता आपले मुक्कामाचे ठिकाण जवळ आले या आनंदात मी झोपेचा अंमल दूर सारीत वाहन चालविणे सुरूच ठेवले. या जोडरस्त्यावर एका पथकर नाक्यापाशी पथकर भरण्याकरिता थांबलो असता दोन पोलिस वाहनाजवळ आले आणि त्यांनी काहीशा संशयाने माझ्याकडे पाहिले आणि मी कोठून आलो, कोठे जात आहे याची चौकशी केली. त्यांच्या नजरेत संशय का आहे हे आधी मला कळलेच नाही पण शेजारी वळून बघताच मला त्याचा उलगडा झाला. पत्नी गाढ झोपेत होती आणि झोपेत व्यक्ती एखाद्या बाजूला कलते त्याप्रमाणे तिचे शरीर प्रवासादरम्यान कलले असले तरी आसन पट्ट्यामुळे तिची मान आणि चेहरा पुढे लटकत होते. बाहेरून पाहणार्या पोलिसाला कदाचित ती जिवंत तरी आहे की नाही असे वाटले असावे. पोलिसांचे शंका निरसन व्हावे म्हणून मी आधी पत्नीला उठविले आणि मग पोलिसांच्या चौकशीला तोंड दिले. वाहनात मागे ठेवलेले मोठ्या आकाराचे धुलाई यंत्र आणि इतर सामान पाहून पोलिसांनी त्याचीही चौकशी केलीच. परंतु हे सामान आपण आपल्या माहेर च्या घरून स्वत:च्या घरी नेत आहोत असे पत्नीने त्यांना सांगितल्यावर पोलिसांनी अधिक चौकशी केली नाही व पथकर भरून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. पत्नीही लगेच पुन्हा पहिल्यासारखी गाढ झोपी गेली.
थोड्याच वेळात महामार्ग क्रमांक तीन वर पोचून तो अवघड घाटही पार केला. अजूनही झोपेचा त्रास जाणवत होताच. त्यामुळे अर्थातच आता सरासरी वेग बराच मंदावला होता. सेंधवा पाशी पोचताच पुन्हा टाकीत इंधन भरून घेतले. डोळ्यांवर पाणी मारले आणि प्रवास पुढे चालु ठेवला. थोड्याच वेळात महाराष्ट्र सीमेपाशी पोचलो इथे पोलिसांनी आमची कुठलीही तपासणी केली नाही की सोबत असलेल्या सामानाबद्दल चौकशी. ते अवजड वाहनांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात मग्न होते. थोड्याच वेळात सकाळी ठीक सहा वाजता अवधान, धुळे येथील आमच्या निवासस्थानी पोचलो.
यानंतर एका आठवड्याने म्हणजे २ फेब्रुवारी रोजी धुळ्याहून पुणे येथे गेलो आणि ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत साई सर्विस फुगेवाडी येथे वाहनाची हमी काळातली शेवटची मोफत दुरूस्ती करून घेतली. यात वाहनाचा स्पीडोमीटर व इतर काही नादुरुस्त झालेले सुटे भाग बदलून घेतले.
या प्रवासादरम्यान काही निरीक्षणे नोंदविली गेली ती अशी:-
असो. तर असा हा सलग १२०० किमीचा प्रवास आम्ही धुळे ते दिल्ली आणि दिल्ली ते धुळे मिळून दोन वेळा केला. प्रवासास निघण्याआधीही अनेकांनी मला असा प्रवास न करण्याविषयी सुचविले होते. प्रवासाहून आल्यावरही अनेकांनी तुम्ही यातून काय साध्य केले अशी विचारणा केली. यापेक्षाही कमी खर्चात दोघे विमानाने जाऊन आला असता असेही लोकांचे मत पडले. एक मात्र खरे की, यापैकी कुणीही सलग एका वेळी इतका लांबचा प्रवास स्वत:च्या वाहनाने रस्त्यावरून केला नव्हता.
या प्रवासातून आम्ही काय साध्य केले अशी विचारणा करणार्यांना मला इतकेच सांगावेसे वाटते की, अनेक जण गिर्यारोहण, पॅराजम्पिंग, पॅराग्लायडिंग आणि अजून काही साहस कृत्ये करतात त्यातून त्यांना काय साध्य होते? मध्यंतरी एका युवतीने उत्तर ध्रुव आणि नंतर दक्षिण ध्रुव अशा दोन्ही ठिकाणी पॅराजम्पिंग केले. तिला त्यातून काय साध्य झाले? खरे तर तिचे तिथे काही कामही नव्हते. ती तर फक्त साहस करण्याकरिताच तिथवर गेली. मला तरी निदान दिल्लीला जायचे काही तरी प्रयोजन होते. विमानाने किंवा आगगाडीने जावे लागणार होतेच. त्याऐवजी स्वत:च्या वाहनाने गेलो इतकेच. म्हणजेच इच्छित कार्य घडण्यासोबतच साहसही घडले. नाहीतरी स्वतंत्र रीत्या साहसी मोहिमा घडवाव्या हे निदान मला तरी पटत नाही.
व्हर्टिकल लिमिट या गाजलेल्या चित्रपटात सुरुवातीस एक साहसी गिर्यारोहण मोहीम दाखविली आहे. या मोहिमेत एक वृद्ध आणि त्याचा एक मुलगा व मुलगी असे तिघे एका संकटादरम्यान नाईलाजास्तव असा एक निर्णय घेतात की ज्यामुळे वृद्धाचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू होतो व त्याची मुले जगतात. त्यानंतर मुलगा साहसी मोहिमांमधून अंग काढून घेतो व नॅशनल जिओग्राफिक करिता कार्य करू लागतो. त्याच्या कार्यातही साहस असते परंतु ते कार्याबरोबरीनेच येत असते. याउलट त्याची बहीण केवळ साहसाच्या समाधानाकरिता अशा मोहिमांमध्ये भाग घेतच राहते. एक वेळ अशी येते की ती तिच्या मोहिमेदरम्यान संकटात सापडते. तेव्हा तिच्या सुटकेकरिता जे पथक जाते (रेस्क्य़ू टीम) त्यात भाऊ देखील सामील होतो आणि तिला सुखरूप सोडवून आणतो. बहीण साहसाकरता साहस करते तर भाऊ काही एका निश्चित हेतूने साहसी मोहिमेत सामील होतो. यात भावाचा निर्णय योग्य आहे असे निदान मला तरी वाटते.
हौशी साहसवीरांचे जग नेहमीच कौतूक करीत आले आहे. सहेतूक कार्यात साहसाचे मिश्रण करणार्यांचे जगाने कौतूक करावे अशी त्यांची अपेक्षा नसतेच; निदान त्यांना नाउमेद तरी केले जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा हा लेख संपविताना व्यक्त करतो.
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=03072014103004#

- एकूण प्रवास जातेवेळी ११९१ किमी तर येतेवेळी ११९३ किमी झाला. जाताना २२ तास ३० मिनीटे तर येताना २३ तास ३० मिनीटे लागली. दिल्ली अंतर्गत प्रवास एकूण १८१ किमी झाला.
- km ReadingTimeDateAwadhan, DHULE2158007:0017 January 2014Rohini New Delhi2277105:3018 January 2014Distance119122:30 HrsRohini New Delhi2295206:3027 January 2014Awadhan, DHULE2414506:0028 January 2014Distance119323:30 HrsTotal Distance Travelled2565Distance Travelled inside Delhi181Distance Travelled on Highway2384
Sr. No.TimeDatePlaceAmount (Rs.)Return TimeReturn Date107:2117 January 2014Songir5005:2128 January 2014207:3017 January 2014Nardana804:5228 January 2014307:5817 January 2014Shirpur7504:5128 January 2014408:5217 January 2014NH3 @ KM 141.857903:3528 January 2014509:3917 January 20147402:2928 January 2014610:1517 January 20142001:0028 January 2014710:4417 January 2014Chhokala3500:0528 January 2014811:3617 January 2014Chikliya3123:3727 January 2014913:1417 January 2014Jaora2522:0227 January 20141014:0317 January 2014Piplyamandi2621:2327 January 20141115:0517 January 2014Nayagaon1620:0427 January 20141216:1617 January 2014Rithola3517:5927 January 20141316:4917 January 2014Jojora Ka Kheda6017:3127 January 20141418:0917 January 2014Kanwaliyas7516:1127 January 20141520:4717 January 2014Kishangadh9013:1727 January 20141622:3817 January 2014Daulatpura46----27 January 20141723:1217 January 2014Manoharpura5510:5027 January 20141800:5418 January 2014Shahjahanpura11409:0327 January 20141903:2118 January 2014Gurgaon2707:4927 January 20142004:3018 January 2014New Delhi2107:3027 January 2014TOTAL962 - निरनिराळ्या ठिकाणी इंधन दरांमध्येही अतिशय तफावत आढळली. अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्रात इंधन दर अतिशय जास्त असून मध्यप्रदेश, राजस्थान मार्गाने ते घटत दिल्लीत सर्वात कमी असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे इंधन कार्यक्षमतेचा विचार केला असता महाराष्ट्र मध्यप्रदेश दरम्यानच्या प्रवासात रस्ता चांगला होता परंतु मला प्रति लिटर केवळ १३.५ किमी इतकीच सरासरी धाव मिळाली. मध्यप्रदेश राजस्थान दरम्यान काही अंतर रस्ता अतिशय खराब व रहदारी अतिशय वर्दळीची असूनही मला प्रति लिटर १४.३ किमी इतकी सरासरी धाव मिळाली. तर राजस्थान पासून दिल्लीला जाताना सर्वात जास्त काळ आणि सर्वात जास्त वाहतूक खोळंबा होऊन ही १५.९ किमी इतकी सर्वोच्च प्रति लिटर धाव मिळाली. याचाच अर्थ ज्या मार्गावर मी ताशी ११० / ११० किमी इतका कमाल वेग घेतला होता त्या मार्गावर मला इंधन कार्यक्षमता अतिशय कमी असल्याचे आढळले. परतीच्या प्रवासातही हेच दिसून आले की जिथे माझा वेग कमी त्या मार्गावर मला इंधन कार्यक्षमता अत्युच्च मिळाली आहे. प्रत्येकच ठिकाणी इंधनाची टाकी पूर्ण भरणे शक्य न झाल्याने त्या त्या वेळी इंधन कार्यक्षमता मोजता येऊ शकली नाही. तसेच मोठ्या अंतरावरील सरासरी इंधन क्षमतेचे मापन करण्याकरिता मी दिल्ली धुळे प्रवासानंतर जो धुळे पुणे आणि पुन्हा पुणे धुळे असा प्रवास केला त्यावेळच्या इंधन भरल्याच्या नोंदीही खालील तक्त्यात दर्शविल्या आहेत.kmPlaceAmount (Rs.)RateQtyKMPL21577Dhule225079.2828.3821934Ratlam20327726.3913.5280511822313Bandanwara2012.9475.9626.514.30188679New Delhi50072.476.89922800New Delhi1710.2972.4723.615.967538222944New Delhi979.7972.4713.5210.650935423313Dudu2000.1675.8526.3713.9932055423750Jaora211677.0627.4615.9145652224037Sendhwa100078.212.7924179Zodage109279.5213.7316.1763985224576Rajgurunagar2319.3579.4329.213.595925582999TOTAL18012.53206.514.52595441
- ओम्नी वाहनाचा आसन पट्टा मध्येच घट्ट होऊन शरीराला काचतो. यापूर्वी एकदा मी हमी कालावधीत आसन पट्टा बदलून घेतला होता पण काही दिवसातच हा आसन पट्टादेखील घट्ट होऊ लागला. ओम्नी वाहनाच्या विशिष्ट रचनेमुळे आसन पट्टा अशा प्रकारे घट्ट होतो अशी माहिती मला सेवा केंद्रात मिळाली. केवळ पोलिसांकडून दंड आकारला जाऊ नये म्हणून मग आसन पट्टा वरून खेचताना जरा जास्त प्रमाणात खेचावा आणि त्याच्या वरील टोकाकडे तो थोडासा दुमडून त्यास यू क्लिप लावावी अशी युक्तीही मला सेवा केंद्रातील वाहनचालकाने सांगितली. खरे तर इतर कार्सच्या तूलनेत ओम्नीचे आसन बरेच उंचावर आहे आणि सुकाणू चक्र (स्टीअरिंग व्हील) खाली आहे. इतर कार श्रेणीतील वाहनांमध्ये अपघात प्रसंगी सुकाणू चक्र शरीरावर आदळण्याचा जसा धोका असतो तसा तो ओम्नी वाहनात अजिबात नसतो. सबब ओम्नी वाहनास आसन सुरक्षा पट्ट्याची गरज व उपयोग अजिबात नाही. तरी ज्याप्रमाणे बस अथवा ट्रक चालकाने आसन सुरक्षा पट्टा लावला आहे किंवा नाही हे पोलिस अजिबात तपासत नाही त्याचप्रमाणे ओम्नीलाही या तपासणीतून वगळले पाहिजे.