१५ एप्रिल २०१३. सायंकाळी सातची वेळ. मी आणि पत्नी, तिचा आवडता अभिनेता - राजीव खंडेलवालचा "साऊंडट्रॅक" चित्रपट पाहत होतो. या चित्रपटात नायकाचा एक कान पूर्ण बधीर होतो आणि दुसर्या कानाला जेमतेम ३० टक्के श्रवणशक्ती राहते असा एक प्रसंग आहे. पुढे तर नायक पूर्णच बहिरा होतो. अर्थात त्याच्या या कमतरतेवर मात करूनही तो उत्तम संगीतकार म्हणून स्वत:ला सिद्ध करतो असे काहीसे चित्रपटाचे कथासूत्र आहे. तर आम्ही हा चित्रपट व्यवस्थित Enjoy केला. चित्रपट पाहतच रात्रीचे भोजनही उरकले आणि अचानक रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने तक्रार केली की तिला एका कानाने अजिबात ऐकू येत नाहीये. चित्रपट फारच परिणामकारक होता वाटतं असा शेरा मारून मी तिची तक्रार थट्टेवारी नेली आणि तिला झोपी जाण्यास सांगितले.
दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावरही पुन्हा तिची तीच तक्रार. मग मी तिचा कान विजेरीच्या प्रकाशात नीट पाहिला, पण कानात मळ, घाण असे काहीही नव्हते. कान खोलपर्यंत अगदी स्वच्छ दिसत होता. तिला कान दुखतोय का? हे देखील विचारले परंतु तिचा कान दुखतच नव्हता तर फक्त ऐकायला येत नाही इतकीच तक्रार होती. ठीक आहे पण दुसर्या कानाने तर ऐकता येत आहे ना? मग पाहू नंतर असे म्हणून मी माझ्या कामात गढून गेलो. डॉक्टरांकडे जाणे टाळलेच. खरे तर माझाही नाईलाज होता. मी मूळचा पुण्याचा. इथे व्यवसायानिमित्त धुळ्यात तात्पुरता निवास तोही शहरापासून १० किमी दूर औद्योगिक वसाहतीत. सल्लागार म्हणून एका आस्थापनेशी संबंध येतो. त्या माझ्या ग्राहक आस्थापनेनेच त्यांच्या कारखान्याच्या आवारात निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. सलग तीन साडेतीन महिने साप्ताहिक सूटी देखील न घेता त्यांना सेवा द्यायची आणि त्यानंतर आठ दहा दिवस त्यांच्या सोयीने सवड काढून पुण्याच्या घरी जाऊन यायचे असा माझा शिरस्ता. एप्रिल २०१३ मध्येही माझी आठवडाभर पुण्याला जाण्याची वेळ आली होती. पण रोज काहीना काही काम निघत होते आणि माझे पुण्याला जाणे लांबणीवर पडत होते. आताही मला एक दोन दिवसांत पुण्यास जायला मिळेल अशी आशा वाटत होती आणि त्यामुळेच मी धुळे शहरातील डॉक्टरांकडे जायचे टाळत होतो. कारण एक तर शहर माझ्या निवासापासून लांब, त्यात मला इथल्या डॉक्टरांची काहीच माहिती नाही. शिवाय इथे आम्ही दोघेच. पुण्याला गेल्यावर माझ्या घरचे इतर लोकही सोबतीला असणार होते त्यामुळे माझ्या पत्नीला मी एक दोन दिवस धीर धरण्यास सांगितले. तिलाही कान दुखत नसल्यामूळे अगदीच तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली नाही. पुढच्या काही दिवसांत तिला श्रवण दोषासोबतच कानामागे काहीतरी सळसळ जाणवू लागली होती. म्हणजे नेमके काय होतेय हे मला कळले नाही - "कुछ sensation हो रहा है।" असे तिचे शब्द होते.
इथे आज उद्या करता करता मला थेट २३ एप्रिल रोजी पुण्यास जायची परवानगी मिळाली. नेहमीप्रमाणेच सकाळी माझ्या वाहनाने पुण्यास निघालो. वाटेत औरंगाबाद, अहमदनगर इथे थांबे घेत आमच्या तिथे राहणार्या नातेवाईकांनाही भेटून घेतले आणि रात्री उशिरा निगडी, पुणे येथील माझ्या घरी पोचलो. श्री. कुलकर्णी नावाचे माझ्या माहितीतले एक नाक-कान-घसा तज्ज्ञ आहेत त्यांना भेटायचे ठरले. दुसरा दिवस २४ एप्रिल २०१३ - बुधवार. बुधवारी डॉक्टर तळेगावात असतात असे कळले. त्यामुळे तो दिवसही गेला. पुढचा दिवस - गुरुवार २५ एप्रिल रोजी पत्नीला घेऊन डॉ. कुलकर्णी यांच्या दवाखान्यात गेलो. त्यांनी कानाची तपासणी केली पण काहीच आढळले नाही. मग त्यांनी मला सांगितले की - Audio Test करावी लागेल त्याचे शुल्क रु.७००/- (अक्षरी रुपये सातशे फक्त) होईल, करावी का? करा मी एटीएम मधून तितकी रक्कम घेऊन येतो असे सांगितले.
त्याप्रमाणे Audio Test झाली. त्यानंतर डॉक्टरांनी मला शांतपणे वस्तुस्थिती विशद केली. त्यांच्या निदानाप्रमाणे कानात दोष नसून कानापासून मेंदूला जाणार्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाली आहे. तिच्यामुळे सर्व समस्या निर्माण झाली आहे. त्या गुठळीला विरघळवावे लागेल. त्याकरिता तीन इंजेक्शने द्यावी लागतील. ही इंजेक्षने नेहमीप्रमाणे सिरींजने द्यावयाची नसून सलाईनच्या बाटलीतून हळूहळू शिरेवाटे द्यावी लागतील एक इंजेक्शन चार ते सहा तासात द्यावे लागेल. तसेच हे इंजेक्षन दिल्यावर शरीराला सूज येणे किंवा इतरही काही दुष्परिणाम दिसू शकतील. असे काही घडलेच तर लागलीच सलाइन शिरेतून सोडण्याचा वेग कमी करावा लागेल अथवा काही काळ थांबवावे देखील लागेल. एका दिवसात केवळ एकच इंजेक्शन देता येईल. तीन इंजेक्षन्स करिता तीन दिवस लागतील. एकूणातच हे उपचार अतिशय संवेदनशील असल्यामूळे मोठ्या रुग्णालयात दाखल होऊनच करावे लागतील. आता रुग्णाला चिंचवडच्या निरामय रुग्णालयात तातडीने दाखल व्हावे लागेल. तसेच या उपचारांकरिता रुग्णाने लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायचा असतो तरच सकारात्मक निकालांची तीस टक्के शक्यता असते. इथे आम्ही आधीच दहा दिवस उशिर केला होता त्यामुळे ही शक्यता अतिशय धूसर होती.
डॉक्टरांचे बोलणे संपल्यावर मी त्यांना एक दिवसाची मुदत मागितली आणि आम्ही दोघे घरी परतलो. माझ्या कपाटातली जुनी कागदपत्रे चाळू लागलो. सल्लागाराचा व्यवसाय करण्याच्या निमित्ताने माझा विविध क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळींशी संपर्क येत असतो. यात अनेक वैद्यकीय व्यावसायिकांचा देखील समावेश आहे. बरीच कागदपत्रे तपासल्यावर मला चार नाक-कान-घसा तज्ज्ञांचे संपर्क क्रमांक मिळाले. एकामागोमाग एक सर्वांशी संपर्क साधला. माझ्या पत्नीची समस्या आणि कराव्या लागणार्या उपचारांविषयी थोडक्यात माहिती देऊन त्यांचा सल्ला मागितला. सर्वांनीच डॉ. कुलकर्णींनी सूचविलेल्या उपायांसोबत सहमती दर्शविली आणि विनाविलंब उपचारांस सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. सर्वात शेवटी मी एका महिला तज्ज्ञाशी संपर्क साधला होता. त्यांनी मला विचारले की मी नेमका सेकंड ओपिनियनच्या भानगडीत वेळ का वाया घालवतोय? माझे उत्तर होते की, उपचारांचीच अतिशय भीती वाटते आहे. शिवाय ऐवीतेवी उपचार यशस्वी होण्याची शक्यता अगदीच कमी आहे तर मग उपचार घेऊन दुष्परिणाम भोगण्याची जोखीम तरी का पत्करावी? नाही ऐकू आले एका कानाने तर काय अडले? कान दुखत तर नाहीये. त्यावर त्यांनी मला सांगितले की कानापासून मेंदुपर्यंत श्रवणसंदेश पोचविणार्या नलिकेतली ही गुठळी हळूहळू रुग्णाच्या मेंदूपर्यंत पोचेल आणि मेंदुच्या कोणत्याही भागाला कितीही प्रमाणात हानी पोचवू शकेल. आता रुग्णाला फक्त एका कानाने ऐकायला येत नसले तरी नंतर कदाचित रुग्णाची दृष्टी, स्पर्शज्ञान, स्मृती किंवा इतर कोणत्याही कार्यावर विपरीत परिणाम होईल आणि तो कायमस्वरूपी असेल. तसेच मृत्यूसुद्धा ओढवू शकतो.
हे ऐकल्यावर मी तातडीने पत्नीला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दुसर्या दिवशी अर्थात शुक्रवार २६ एप्रिल २०१३ रोजी पत्नीला चिंचवड येथील निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आधी सर्व कागदपत्रांचे सोपस्कार, त्यानंतर विविध चाचण्या मग दुपारचे भोजन हे सर्व उरकल्यावर सुरुवातीचे इंजेक्शन देण्यास दोन वाजले. आधी परिचारिकेने स्टॅण्ड वर सलाईनची बाटली चढविली आणि शिरेवाटे रुग्णास सलाईन देण्यास सुरुवात झाली. मग काही वेळाने सलाईनच्या बाटलीत इंजेक्शन टोचून त्यात औषध सोडण्यात आले. काही वेळाने पत्नीला त्रास होऊ लागला मग परिचारिकेला बोलावून सलाईनचा वेग कमी करण्यात आला. त्यानंतरही कधी भुकेमुळे तर कधी नैसर्गिक विधीकरिता जावे लागल्याने सलाईन काढावे आणि पुन्हा जोडावे लागले. दरेकवेळी परिचारिकेस बोलवावे लागले. या सर्व उपद्व्यापांमध्ये वेळेचा बराच अपव्यय झाला आणि पहिल्या इंजेक्षनला पुर्णपणे शरीरात जाण्यास रात्रीचे बारा वाजले.
त्यानंतर मी बाजुच्या खाटेवर झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण झोप लागण्याची काही चिन्हे दिसेनात कारण ह्या खाटेवर काथ्यापासून बनविलेली गादी आणि त्यावर रेक्झीनचे आच्छादन होते. एप्रिल महिन्यातल्या भयंकर उकाड्यातल्या रात्री अशा गादीवर झोपून अंग अजुनच घामाने चिंब होत होते. त्यात बर्याच प्रयासाने जरा झोप येऊ लागली की पत्नीला औषध द्यायची वेळ होई आणि परिचारिका आत येत असे. असे होत दिवस उजाडला तेव्हा माझी उणीपुरी दोन तासांची झोप झाली होती. सकाळी पत्नीकरिता रुग्णालयातून नाष्टा आला त्यानंतर मी घरी जाऊन नित्यकर्मे आटोपली. आरोग्य विमा कंपनीला Electronic Mails पाठविले आणि दोनेक तासांत पुन्हा रुग्णालयात हजर झालो. आदल्या दिवशीचे इंजेक्षन दुपारी दोनला सुरू केले असल्याने २४ तास अंतर राखण्याकरिता दुसरे इंजेक्षनही दुपारी दोनलाच दिले जाणार असल्याचे कळले. मधल्या काळात पुन्हा विविध चाचण्या आणि मेंदूतज्ज्ञांची भेटही झाली. मेंदुतज्ज्ञांनी तर तीन इंजेक्शन्सनी फरक पडला नाही तर आपणे पाच इंजेक्शन्स देऊ असे सांगितले. रुग्णालयाच्या इमारतीतच इतर मजल्यांवर केल्या जाणार्या चाचण्यांकरिता तिला त्या त्या विभागातून नेण्या आणण्याकरिता चाकाची खुर्ची आणि ती ढकलण्याकरिता सेवक देखील पुरविले जाऊ लागले. हातीपायी अत्यंत व्यवस्थित असणारी व भोवळ वगैरे न येता व्यवस्थित चालु फिरू शकणारी माझी पत्नी खुर्चीतून जाणे नाकारत होती. परंतु काही विभागांच्या सूचना अतिशय काटेकोर असल्याने ते तिला खुर्चीतूनच जाण्याची सक्ती करत तेव्हा खुर्चीवर बसून जाताना ती खळखळून हसत होती. या सर्वांवर कडी म्हणजे चुंबकीय प्रतिध्वनी प्रतिमा चाचणी (Magnetic Resonance Imaging - MRI). या चाचणीची सोय रुग्णालयात नव्हती. त्याकरिता दोन किमी अंतरावरील केन्द्रात जायचे होते. त्याकरिता रुग्णवाहिका व रुग्णशिबिकेची (Stretcher) व्यवस्था करण्यात आली होती. स्ट्रेचर वरून रुग्णवाहिकेत जायचे मात्र तिने सपशेल नाकारले. रुग्णवाहिकेत ती व्यवस्थित आसनावर जाऊन बसली आणि पुन्हा तशीच परतली. त्यानंतर पुन्हा भोजन आणि सलाईनचा सोपस्कार आदल्या दिवशीप्रमाणेच पार पाडला. सलाईन चालु असताना मध्ये मध्ये ती झोप काढायची. जागी झाल्यावर दूरचित्रवाणी संचावर चित्रपट पाहत बसायची. मी तिच्यासोबत बसून विविध वर्तमानपत्रे आणि सुहास शिरवळकरांची आठ पुस्तके वाचून काढली.
तिसर्या दिवशी असेच मी पुस्तक वाचत शेजारी बसलो आणि तीही कंटाळा घालविण्याकरिता माझ्यासोबत काहीतरी बोलत होती. माझे तिच्याकडे लक्ष गेले आणि मी तिला म्हणालो, "आज तुला लाल नळीतून सलाईन का देत आहेत?" अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तिने हात हलविल्यामुळे तिचा हात चढावर आणि नळी उतारावर गेलीये आणि तिच्या हातातून नळीत रक्त येऊ लागले आहे. मी तातडीने परिचारिकेला बोलाविले तर तीही घाबरून गेलेली दिसली. तिने अजून तिच्या दोन सहकारी परिचारिकांना बोलाविले आणि सर्वांनी मिळून पुन्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
तिसरी रात्रही अशीच अर्धवट झोपेत काढल्यावर चौथा दिवस अर्थात २९ एप्रिल २०१३ उजाडला. डॉ. कुलकर्णी व इतर सहकारी डॉक्टर भेट देऊन गेले. पुन्हा सर्व चाचण्या केल्या गेल्या. मुख्य म्हणजे ती Audio Test, ती देखील केली गेली. सकारात्मक निकाल आले. रुग्णाला अजून काही काळ निरीक्षणांतर्गत ठेवू असे कळविण्यात आले. त्यानंतर ठीक आठ वाजता सुटका (Discharge) करण्यात आली.
रुग्णालयातून घरी परतल्यावरही तीन दिवस औषधे चालू होती. आता दोन्ही कानांनी व्यवस्थित ऐकू येऊ लागले, परंतु चौथ्या दिवशी पुन्हा कानामागे सळसळ होऊ लागली. तातडीने मी डॉ. कुलकर्णींना संपर्क केला. त्यांनी विशेष काळजीचे कारण नसल्याचे सांगून एक calpol गोळी खाण्यास सांगितले. तसे केल्यावर लगेचच ही सळसळ बंद झाली.
उपचारांदरम्यान वेळोवेळी माझे आई, वडील, भाऊ व वहिनी यांनी रुग्णालयात येऊन पत्नीला व मला धीर देण्याचे व मला वेळोवेळी Relieve करण्याचे कार्य केले याचा उल्लेख इथे करणे गरजेचे आहे.
पुण्यातील हे उपचार संपवून आम्ही धुळ्यात परतलो तेव्हा कानामागून येऊन तिखट बनलेली ही समस्या कायमची दूर झाली होती. सर्व उपचारांचा खर्च रुपये चौतीस हजार पाचशे (रू.३४,५००/-) इतका झाला. युनाईटेड इंडिया इन्शुरन्सची आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत त्यापैकी रुपये बावीस हजार (रू.२२,०००/-) इतकी रक्कम दोन आठवड्यानंतर आम्हाला प्राप्त झाली.
No comments:
Post a Comment