जानेवारी २००५ मध्ये एका वितरणसंस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत होतो. पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीबाहेर ताथवडे नावाच्या एका गावात गोदाम भाड्याने घेऊन तेथे Kajaria Vitrified Tiles ची साठवणूक केली जात असे. या Tiles भिवंडी येथील कजारिया कंपनीच्या गोदामातून थेट आमच्या गोदामात येत. आम्ही १० टन किंवा अधिक इतक्या वजनाच्या Tiles एका वेळी मागवत असू त्यामूळे त्या आमच्या गोदामात थेट पोचविल्या जात. आमच्या गोदामातून पुढे पुणे व पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात या Tiles चे वितरण होत असे. अर्थात आमच्या गोदामातून पुढे विकल्या जाणार्या Tiles ची संख्या तूलनेने कमी असल्याने वाहतूकदारांच्या गोदामापर्यंत त्या पोचवण्याचे काम आम्हालाच करावे लागे. आमच्या गोदामापासून वाहतूकदारांची गोदामे दीड ते दोन किमी पर्यंत होती. या अंतराकरिता सुरुवातीला आम्ही छोट्या तीन चाकी बजाज / एपे रिक्षा भाड्याने करीत असू. ते रू.५०/- इतके भाडे आकारीत. पुढे हा मार्ग अतिशय खराब व खड्डेमय झाल्याने छोट्या रिक्षा येत नसत. मग मोठ्या मिनीडोअर रिक्षांचा पर्याय उपलब्ध होता परंतू ते रू.१५०/- ते २००/- इतके भाडे आकारू लागले. शिवाय अनेकदा त्यांची उपलब्धता नसली म्हणजे आम्हाला टाटा ४०७ चा पर्याय वापरावा लागे ज्याचे किमान भाडे रु.३५०/- असे. इतक्या कमी अंतराकरिता हा खर्च आम्हाला झेपेनासा झाला.
त्यातच आमच्या वितरण संस्थेकडे ज्युपिटर एक्वा लाईन (जल) या मोहाली (पंजाब) स्थित कंपनीच्या Bathroom Fittings च्या वितरणाचेही काम आले. ही जल कंपनी पटेल रोडवेज द्वारा Bathroom Fittings पाठवित असे. पटेल रोडवेज च्या गोदामातून आम्हाला या Bathroom Fittings आमच्या गोदामापर्यंत आणाव्या लागत असत. थोडक्यात सांगायचे, तर ताथवड्याच्या अंतर्गत भागात लहान अंतरावरील वाहतूकीचा आमचा खर्च वाढू लागला होता. आता आपल्या वितरण संस्थेला बाहेरच्या वाहनांचा भाड्याचा खर्च करण्यापेक्षा आपले स्वत:चे वाहन घ्यावे असा विचार मी करू लागलो. नवीन मालवाहू वाहन घेण्यात अर्थ नव्हता, कारण रोजचे वाहतूकीचे अंतर १० किमीपेक्षा अधिक नव्हते. जुने मालवाहू वाहन घेण्यात अडचण अशी होती की अशी वाहने व्यावसायिक तत्त्वावर चालत असल्याने त्यांचा अतिरिक्त वापर झालेला असून वाहन सुस्थितीत असत नाही व त्याच्या देखभालीचा खर्चही बराच येतो. त्याशिवाय अजुन एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिक वाहनाला पिवळा क्रमांक फलक असतो. व्यावसायिक वाहन दरवर्षी तपासणीकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात न्यावे लागते, शिवाय ते चालविण्याकरिता वेगळा परवाना घ्यावा लागतो ज्याचे नूतनीकरण दर तीन वर्षांनी करावे लागते. या सर्व कारणांमूळे व्यावसायिक वाहन विकत घेण्याचा विचार अर्थातच मागे पडला.
आता पर्याय सुचला तो जीपसारखे एखादे हलके वाहन घेण्याचा. असे वाहन खासगी नोंदणीक्रमांकासह (पांढरा नोंदणीक्रमांक फलक) येते आणि आपल्या नेहमीच्या वाहतूक परवान्यावर (LMV-NT) चालविले जाऊ शकते. त्याप्रमाणे जुनी वाहने पाहिली जाऊ लागली आणि फेब्रुवारी २००६ मध्ये चाळीस हजार रुपयांत एका जुन्या टेम्पो ट्रॆक्स टाऊन ऎन्ड कन्ट्री (१० आसनी) या वाहनाची खरेदी केली गेली. वाहन संस्थेच्या नावावर खरेदी करावयाचे तर कर दुप्पट द्यावा लागतो असे कळले. त्यामुळे ह्या वाहनाची खरेदी करताना ते माझ्या वडिलांच्या नावावर नोंदले आणि ती रक्कम मी स्वत:तर्फे खर्च केली. याउप्पर जेव्हा वाहन गोदामाच्या कामाकरिता वापरले जाईल तेव्हा इंधनाची रक्कम गोदामातर्फे खर्ची टाकावी असे ठरले.
या वाहनात पुढे चालकाशेजारी दोन जण बसण्याची सोय असून मागे तीन आसनांचा एक बाक व त्याही पाठीमागे दोन दोन आसनांचे दोन बाक एकमेकांसमोर पाठीमागच्या दरवाज्याला काटकोनात अशी या वाहनाची आसन रचना होती.
दहा आसनी वाहनात बसणारे दोघेच - मी आणि माझा एक सहकारी. उरलेल्या मोकळ्या जागेत आम्ही Tiles व Bathroom Fittings घेऊन जात असू. आमच्या गोदामापासून ताथवडे अंतर्गत जवळच्या अंतरावरील वाहतूकदारांच्या गोदामापर्यंत सामान घेऊन जाण्यासाठी आम्हाला हे वाहन अत्यंत उपयूक्त व किफायतशीर ठरू लागले. एकदा तर आम्ही त्यामधून १७०० (एक हजार सातशे फक्त) किग्रॆ वजनाचे सामान वाहून आणले. तसेच हे वाहन ताथवड्यातील गोदामातून माझ्या निगडी येथील घरी जाण्याकरिताही मी वापरीत असे. अशा प्रकारे या वाहनाने आम्हाला अत्यंत मोलाची सेवा दिली.
पुढे जुलै २००६ मध्ये ताथवडे गाव हे पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत आले आणि तेथेही महानगरपालिकेची जकात लागू झाली तेव्हा वितरणसंस्थेचे गोदाम ताथवड्यातून फुरसूंगी येथे हलविण्यात आले. अर्थातच व्यवस्थापन देखील इतर व्यक्तींकडे सोपविले गेले. मीही इतर कामांमध्ये व्यस्त झालो. वाहन माझ्या घरासमोरच उभे केलेले असायचे. त्याचा फारसा वापर होत नसे. इंधन कार्यक्षमता ८ ते १० किमी प्रतिलिटर असल्यमुळे एकट्यादुकट्या व्यक्तिला फिरण्याकरिता ते परवडणे शक्यच नव्हते. तीन / चार अथवा अधिक लोकांना एकत्र प्रवास करावयाचा असल्यास मात्र आम्ही त्याचा आवर्जून वापर करीत असू.
२५ जानेवारी २००७ रोजी आमच्या एका परिचिताचा विवाहसोहळा संपन्न होणार होता. त्याच्या आदल्या सायंकाळी म्हणजे २४ जानेवारी रोजी आमचे काही नातेवाईक आमच्या घरी मुक्कामाला येणार होते. त्यांना निगडी बस स्थानकापासून आमच्या घरी आणण्याकरिता मी व माझी आई असे आम्ही दोघे आमच्या घरून निगडी बस स्थानकापाशी निघालो. घरापासून निगडी बसस्थानक नेमके १.७ किमी अंतरावर आहे. पाचेक मिनीटांत आम्ही १ किमी अंतर पार करून अग्नीशामक केन्द्र ओलांडले. अजून थोडे पुढे आल्यावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (PCNTDA) इमारतीपाशी डावीकडे वळले की १०० मीटर अंतरावर निगडी बस स्थानक आहे. डावीकडे वळण घेताना वाहन चौथ्या गिअर मधून आधी तिसर्या व नंतर दुसर्या गिअर मध्ये टाकायचे या विचाराने आधी वेग कमी करावा म्हणून मी प्रथम ब्रेकवर पेडलवर पाय ठेवला. पेडल कुठल्याही रोधाशिवाय अगदी सहज खालपर्यंत दाबले गेले आणि वाहनाची गती जराही कमी झाली नाही. क्षणार्धात पुढचा धोका माझ्या लक्षात आला आणि मी जोरात ओरडलो, "आई, गाडीचे ब्रेक फेल झालेत."
अर्थातच आता साधारण ताशी ३५ / ४० किमीचा वेग असल्याने गिअर देखील बदलता येत नव्हते. तशाच स्थितीत जेव्हा डावीकडचे वळण आले तेव्हा मी वाहन आपसूक डावीकडे वळविले कारण चौकातून पुढे जाणे किंवा उजवीकडे वळणे म्हणजे अधिकच वर्दळीत घुसावे लागले असते. डावीकडे वळताना निदान काही अडथळा तरी नव्हता. डावीकडे वळाल्यावर वेग अजूनच वाढला कारण या रस्त्यावर अतिशय तीव्र उतार होता. रस्त्यावर अनेक पादचारीही होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माझ्या आईनेही लोकांना ओरडून गाडीचे ब्रेक फेल आहेत हे सांगितले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. आता या गोंधळामुळे लोक गडबडले आणि त्यातला एक जण बावचळून नेमका अगदी माझ्या वाहनासमोरच आला.
आता हा समोरचा इसम आपल्या वाहनाखाली सापडणार या कल्पनेनेच मी कमालीचा हादरलो आणि अगदी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी त्याप्रमाणे मी स्वत:च्याही नकळत स्टीअरिंग पूर्ण ताकदीनिशी (पॊवर स्टीअरिंग नसल्याने ताकद जास्त लावावी लागत असे) डावीकडे फिरविले. फार मोठा आवाज होऊन माझे वाहन थांबले होते. घडले असे की, डावीकडे काही वाहने पदपथाला खेटून रांगेत उभी होती. त्यापैकी एका इंडिकाला माझे वाहन धडकले. इंडिकाचे उजव्या बाजूचे दोन्ही दरवाजे व बॊनेटचा काही भाग चेपला जाऊन माझे वाहन पुढे असलेल्या एका मारूती वॆगनार वर धडकून तिचा डिकीचा भाग ही चेपला होता. त्यानंतर माझे वाहन या दोन वाहनांच्या फटीतून आत घुसून पदपथावर आदळले होते. वाहनाचे उजवे चाक निखळून बाहेर आले होते. अर्थात ह्या सर्व घटना अक्षरश: क्षणार्धात घडल्या होत्या. वाहनातून खाली उतरून आजुबाजूला पाहिल्यावर काही मिनीटांनी मला ह्या सर्व बाबी ध्यानात आल्या.
समाधानाची बाब म्हणजे कुठल्याही व्यक्तिला किंचितसा धक्काही बसलेला नव्हता. उभ्या असलेल्या वाहनांचे अर्थात निर्जीव वस्तूंचे मोल रुपया पैशात चूकते करता येऊ शकते. परंतु कोणत्याही सजीवास इजा झाली तर ते नुकसान कसे भरून काढणार? अर्थात असा अपराध माझ्या हातून घडला नाही म्हणून मी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि बाजूला जमलेल्या गर्दीला उद्देशून आधी दिलगिरी व्यक्त केली आणि मग या वाहनांचे मालक कोण आहेत याबाबत चौकशी केली. गर्दीतले लोकही समजूतदार होते. त्यांनी आधी मला ही खात्री करून दिली की पादचार्यांपैकी कोणीही जखमी झालेले नाहीत. तसेच त्यांनी मला व माझ्या आईला काही इजा झाली आहे का याची विचारणा केली आणि आधी थोडा वेळ शांत बसण्यास सांगितले. आईच्या हाताला खिडकीचा पत्रा लागून किरकोळ जखम झाली होती. तिला जखमेवर रुमाल बांधून बसस्थानकावर पाठविले. ती आमच्या नातेवाईकांना तिथून दोन रिक्षांमधून घरी घेऊन गेली.
इकडे हळूहळू गर्दी पांगली आणि मग मी दोन्ही वाहनांच्या मालकांचा शोध घेऊ लागलो. काही वेळाने इंडिकाचा चालक समोर आला. "तुला दिसत नाही का? अशी कशी गाडी ठोकलीस?" वगैरे चालू झालं. मी त्याला शांतपणे सांगितले की झालेले नुकसान मी भरून देईन आधी मालकाला समोर बोलवा. त्याप्रमाणे काही वेळातच मालकाला बोलावून घेतले. आधी शांतपणे आम्ही दोघांनीही एकमेकांची ओळख करून घेतली. त्याचे नाव त्याने शेख असे सांगितले. मीही माझे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक ही माहिती त्यास दिली. "मग आता कसे करायचे बोला." त्याने मुद्यावर येत विचारले. मीही त्यास सांगितले की माझ्या वाहनाचा तृतीय पक्ष विमा असल्यामुळे विमा कंपनीकडून त्याला संपूर्ण भरपाई मिळेल. त्यावर त्याने याकरिता काय करावे लागेल हे विचारले. त्यावर मी आधी विमा कंपनीत संपर्क केला. साडेपाच वाजले होते आणि कार्यालय बंद व्हायची वेळ आली होती. समाधानाची बाब म्हणजे व्यवस्थापक पहिल्याच प्रयत्नात दूरध्वनीवर हजर झाले. त्यांनी आधी अपघाताचा पोलिस पंचनामा करण्याची सूचना केली.
त्यावर मी श्री. शेख यांना आपण निगडी पोलिस ठाण्यात जाऊ असे सूचविले. त्यावर त्यांनी पोलिसांनाच इथे बोलावून घेतो असे सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्कही केला. तिथले हवालदार जानराव यांच्याशी श्री. शेख यांचा परिचय असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांशी ओळख कशी काय? हे मी विचारले असता श्री. शेख उत्तरले की त्यांच्या CREATIVE ACADEMY या शिकवणी वर्गात बाहेरचे काही समाजकंटक येऊन विद्यार्थिनींना छेडतात त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता पोलिस ठाण्यात यावे लागल्याने पोलिसांसोबत ओळख झाली. अधिक माहिती घेतली असता श्री. शेख हे पूर्वी टाकळकर क्लासेस, निगडी येथे ही शिकवत असल्याचे कळले. तेव्हा मी त्यांना त्यांची व माझी १४ वर्षांपूर्वीच भेट झाल्याचे निदर्शनास आणून दिले. आता वातावरणात मोकळेपणा आला होता. त्यांनीही मला सध्या काय चालु आहे असे विचारले. तेव्हा मी नुकताच वितरण व्यवस्थापकाच्या जबाबदारीतून मोकळा झालो असल्याचे सांगितले. आता औद्योगिक सल्लागार म्हणून कार्यरत असून सायंकाळच्या वेळी खासगी शिकवणी वर्गही घेत असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी आमच्या CREATIVE ACADEMY त देखील ये असे आमंत्रण दिले.
आमचे बोलणे चालू असतानाच हवालदार जानराव तेथे आले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ही दोन्ही वाहने तातडीने पोलिस ठाण्याच्या आवारात घेऊन या असे त्यांनी सांगितले. श्री. शेख यांची इंडिका बर्यापैकी चेपली असली तरीही तिचा चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडला गेला आणि किल्ली फिरवताच ती सुरूही झाली. त्यानंतर ती लगेच पोलिस ठाण्याच्या आवारात हलविली गेली. माझे वाहन मात्र सुरू होण्याच्या स्थितीत नव्हते. मी घरी संपर्क करून वडिलांना बोलावून घेतले. वडिल स्कूटर घेऊन आले. मग त्यांच्यासोबत जाऊन मी क्रेनची शोधाशोध केली. क्रेनचालकाला पाचशे रुपये देऊन माझे वाहन पोलिस ठाण्याच्या आवारात खेचून आणले. आत गेल्यावर घटनेचा वृत्तांत लिहीण्यास सुरुवात झाली. मी सर्व घटनाक्रम कथन केला. त्यानंतर इंडिकाचालकास तुमच्या वाहनाचे किती नुकसान झाले असे विचारले असता त्याने तीन हजार रुपयांचे असे उत्तर दिले. त्यावर हवालदार जानरावांनीच अरे इतके कमी कसे असेल? असे म्हणत चल मी सात हजार लिहीतो असे म्हणत सात हजार लिहीले देखील. श्री. शेख नेमके हा वृत्तांत लिहीते वेळी तिथे हजर नव्हते. इतक्या कमी रकमेचे नुकसान त्यांनी मान्य केलेच नसते. त्यानंतर आम्हा दोघा वाहन चालकांचे परवाने पोलिसांनी स्वत:कडे जमा करून घेतले व वाहनाची मूळ कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. माझ्या वाहनात नेहमीच मूळ कागदपत्रांच्या छायाप्रती असतात आणि घरात मूळ कागदपत्रे. काही वेळातच मी घरून मूळ कागदपत्रे आणून ती पोलिसांच्या स्वाधीन केली. वाहनाची मूळ कागदपत्रे मिळताच पोलिसांनी माझा परवाना मला परत केला. श्री. शेख यांच्या वाहनाची मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने त्यांच्या चालकाचा परवाना पोलिसांनी स्वत:जवळच ठेवून घेतला.
आता पंचनामा करण्याचे काम पोलिस दुसर्या दिवशी करणार असे त्यांनी सांगितले. तथापि दुसरा दिवस अर्थात २५ जानेवारी रोजी आमच्या परिचितांचा विवाह सोहळा, त्यानंतर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुटी होती. पोलिसांनी सांगितले की, पंचनामा लिहीण्याचे काम आम्ही आमच्या सोयीने करून घेऊ तुम्ही यायची गरज नाही. आता थेट न्यायालयात ज्या दिवशी जायचे त्याच दिवशी तुम्ही पोलिस ठाण्यात या. आम्ही तुम्हाला तसे कळवू. आता कुठलीही चिंता न करता घरी जा. लवकरच पुन्हा भेटूयात.
त्यानंतर २५ तारखेचा विवाहसोहळा २६ चा प्रजासत्ताक हे दिवस निघून गेले. दिनांक २७ जानेवारीच्या सायंकाळी माझ्या घरच्या दूरध्वनीवर (त्या काळी माझ्यापाशी भ्रमणध्वनी संच नव्हता) श्री. शेख यांनी संपर्क केला आणि मला तातडीने त्यांच्या CREATIVE ACADEMY या शिकवणी वर्गावर बोलवून घेतले. त्याप्रमाणे मी तिथे गेलो असता आधी हवापाण्याच्या गप्पा झाल्या आणि मग ते मुद्द्यावर आले.
शेख: पोलिस ठाण्यात पुन्हा जाऊन आलास का?
मी: नाही.
शेख: मी जाऊन आलो. ते मला तीन हजार रुपये मागत होते.
मी: कशाबद्दल? अपघात तर तुमच्या वाहनाकडून झालेला नाही, उलट तुम्ही तर पीडित आहात.
शेख: तरीपण पोलिसांना पैसे द्यावेच लागतात.
मी: हो पण तुमची तर त्यांच्याशी ओळख आहे ना?
शेख: अरे, ओळखीचं काय घेऊन बसलास; पोलिस तर स्वत:च्या सख्या बापालाही सोडत नाहीत. तुला अजून बोलावले कसे नाही? तुझ्याकडूनही ते पैसे मागणार आहेतच.
मी: माझ्याकडून? ते कशाबद्दल?
शेख: अरे, तुझी गाडी तू चालवत नसून तू फक्त शेजारी बसला होतास आणि कोणी तरी एक बाई तुझी गाडी चालवत होती. पोलिसांकडे तसे सांगणारा एक साक्षीदार देखील आहे - समोरच्या सावली उपाहारगृहातला एक कर्मचारी.
हे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटले. एक तर त्या दिवशी माझ्या सोबत माझी आईच फक्त वाहनात होती. पन्नाशीची महिला टेम्पो ट्रॆक्स सारखे अवघड वाहन कशाला चालवेल? शिवाय त्या दिवशी अपघातानंतर आई लगेचच निघून गेली होती. श्री. शेख किंवा त्यांच्या चालकाने तिला पाहिलेच नव्हते. पोलिस तर बरेच उशिरा आले होते त्यांना तर अपघाताच्या वेळी आईच्या वाहनात असण्याविषयी काही ठाऊक असणे शक्यच नव्हते. तरीही आता श्री. शेख जे काही सांगत होते ते ऐकल्यावर पोलिसांचा काहीतरी डाव असणार असा मला संशय आला. एक तर माझ्या वाहनाचा तृतीय पक्ष विमा उतरविलेला होता (जो की कायद्याने बंधनकारक आहे) त्यामुळे माझ्या वाहनामूळे जर कोणाचे काही नुकसान झाले तर ते विमा कंपनी माझ्यातर्फे भरून देणार. परंतु जर अपघातावेळी वाहन चालविणार्या व्यक्तीकडे वैध परवाना नसेल तर मात्र विमा कंपनीची जबाबदारी संपली. अशा वेळी नुकसान भरपाई करुन देणे वाहन मालकावरच बंधनकारक असते. अर्थात माझी आई वाहन चालवित होती असा पंचनामा पोलिसांनी तयार केला तर ते मला मोठे नुकसानीचे ठरणार होते. तरी याविषयी श्री. शेख यांचेसोबत अधिक चर्चा न करता मी तेथून निघून आलो.
त्यानंतर २९ जानेवारी २००७ रोजी मला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मी नको म्हणत असतानाही वडिलांनी सूटी घेतली आणि तेही माझ्यासोबत आले. पोलिस ठाण्यात पोचताच हवालदार जानरावांनी आमचे हसून स्वागत केले. हल्ली पंच म्हणून प्रतिष्ठीत व्यक्ती मिळविणे किती अवघड जाते, लोकांना आग्रह करकरून बोलवावे लागते, मोठ्या कष्टाने पंचनामा बनवावा लागतो. या पंचांच्या चहापाण्याचा खर्चही पोलिसांनाच करावा लागतो वगैरे रडकथा जानरावांनी ऐकविली. तर आमच्या वाहनाच्या अपघाताचा पंचनामा करण्याचा काही मेहनताना त्यांना हवा होता असे त्यांनी शेवटी प्रत्यक्षच सांगितले. मी अशी कुठलीही रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यावर "आम्ही तुमची केस कोर्टात कशी प्रेझेंट करू त्यावर तुम्हाला काय दंड होईल ते अवलंबून आहे. तेव्हा तुम्ही आमची सोय पाहा, आम्ही तुमची सोय बघतो" अशी मखलाशी जानराव हवालदारांनी केली.
मी विचार करायला थोडा वेळ मागून घेतला आणि बाहेर जाऊन सार्वजनिक दूरध्वनी केंद्रावरून वकिलांना संपर्क केला. वकीलांनी सांगितले, "अशा केसेसमध्ये पोलिस जे सांगतात त्याप्रमाणेच करा, फायद्यात राहाल. गुन्हा कबूल केला तर आर्थिक दंड होईल आणि फार तर कोर्ट उठेपर्यंत कोर्टातच बसवून ठेवतील. गुन्हा कबूल नाही म्हणालात तर जामिन घ्यावा लागेल, वकील द्यावा लागेल. वकीलाची फी, प्रत्येक तारखेला हजर राहणे यात मोठा खर्च होईल आणि यातून इतकेच सिद्ध करता येईल की वाहनाचे ब्रेक फेल झाले यात तुमचा दोष नव्हता सबब तुम्हाला आर्थिक दंड होणार नाही. अर्थात पोलिसांनी जर केस चूकीच्या पद्धतीने प्रेझेंट केली असेल तर तो दंड देखील टाळता येणार नाहीच."
"पण समजा मी आता न्यायालयात गुन्हा कबूल आहे असे म्हंटले आणि मला तुरूंगवास झाला तर?" मी एक शंका व्यक्त केली.
"असे काही होणार नाही" वकील हसून उत्तरले, "तुम्ही पोलिसांचे ऐका, ते तुम्हाला सहकार्य करतील."
वकिलांसोबतचे संभाषण आटोपून हताश मनस्थितीत मी पोलिस ठाण्यात पोचलो. माझा चेहरा पाहूनच वडील काय समजायचे ते समजले आणि त्यांनी चटकन पाचशे रूपये हवालदार जानरावांना दिले. पाचशे रुपये मिळताच जानराव एकदम खूश झाले. मग त्यांनी अजून एका हवालदाराला बोलावले. "हे मुंगसे हवालदार. यांच्यासोबत उद्या तुम्ही कोर्टात जा." मग वडिलांनी मुंगसे हवालदारासोबत अजून काही बातचीत केली. त्यात वडिलांच्या बालपणी त्यांच्या नेवासा तालुक्यातील देडगाव येथील शाळेत कोणी मुंगसे नावाचे शिक्षक होते त्यांचा उल्लेख झाला. त्यांच्या संदर्भाने या मुंगसे हवालदाराची आणि वडिलांची ओळख निघाली. त्यानंतर मुंगसे यांनी वडिलांना दुसर्या दिवशी निश्चिंत होऊन कामावर जायला सांगितले आणि मी एकट्यानेच मुंगसे हवालदारासोबत न्यायालयात जायचे असे ठरले.
३० जानेवारी २००७ रोजी मी सकाळी १० वाजताच निगडी पोलिस ठाण्यात पोचलो. मुंगसे हवालदार तिथे हजर होतेच. मुंगसे हवालदार म्हणजे कमालीचा सभ्य माणूस. बाहेर कुठे गणवेशाशिवाय भेटले तर ते पोलिस कर्मचारी आहेत हे सांगुनही कुणाला पटलं नसतं. तर मुंगसे मला म्हणाले, "चला तुम्ही पुढे कोर्टात आम्ही येतच आहोत मागून. पिंपरी कोर्ट माहीत आहे ना तुम्हाला?" "
"नाही. पिंपरी न्यायालयात जायचा कधी संबंध आला नाही. ग्राहक न्यायालयात काही वर्षांपूर्वी गेलो होतो पण ते पुण्यात आहे, पिंपरीत नाही. शिवाय न्यायालयात मी तुमच्या गाडीतून जाणार ना? एकटाच कसा जाऊ?"
"आमच्या या गाडीतून?" समोर उभ्या असलेल्या एका गडद निळ्या व्हॆन कडे निर्देश करीत ते म्हणाले, "नाही या गाडीतून आम्ही तुम्हाला कसे नेणार? या गाडीतून आम्ही बरेच खतरनाक आरोपी घेऊन जात आहोत. तुम्ही आमच्या मागे मागे तुमची गाडी घेऊन या."
मग पुढे आरोपींना घेऊन जाणारी, खिडकीला जाळी लावलेली पोलिस व्हॆन, आणि त्यापाठोपाठ बुलेटवर मी अशी आमची वरात निघाली. वीसेक मिनिटांत आम्ही पिंपरी न्यायालयाच्या आवारात पोचलो. तिथे पोचता क्षणी अनेक जणांनी पुढे येऊन व्हॆनला गराडा घातला. बंदोबस्तावरील पोलिसांनी लाठ्या उगारून त्या लोकांना पांगवून लावले. व्हॆनमधून आलेल्या आरोपींचे ते नातेवाईक होते. त्यानंतर व्हॆनचा दरवाजा उघडून पोलिस आरोपींना न्यायालयात घेऊन जाऊ लागले. त्यांच्यापाठोपाठ मीही निघालो.
मला पाहताच मुंगसे उद्गारले, "तुम्ही कुठे आमच्याबरोबर येताय?" "कुठे म्हणजे? अर्थातच न्यायालयात." मी आश्चर्याने उत्तरलो. "चला माझ्याबरोबर" असे म्हणत मुंगसे मला हाताला धरून बाहेरच्या दिशेने निघाले. एका टपरीवजा हॊटेलात त्यांनी मला बसविले. "ते सगळे, चोरी, दरोडी, मारामारी, बलात्कार, खून प्रकरणांमधले आरोपी आहेत. त्यांच्याबरोबर तुम्ही कुठे आत येता? तुमचा नंबर यायला अजून खूप वेळ आहे. नंबर आला की मी स्वत: तुम्हाला बोलवायला येईल. तोपर्यंत इथे बसून घ्या. चहा नाष्टा उरकून घ्या हवं तर." इतके बोलून मुंगसे हवालदार न्यायालयाच्या दिशेने निघून गेले.
मी त्या टपरीत बसलो असताना माझ्याजवळ काळ्या कोटातील तीन वकील आणि दोन नोटरी येऊन गेले. माझं न्यायालयात काही काम असल्यास ते अतिशय किफायतशीर दरात करून द्यायची तयारीही त्यांनी दर्शविली. अर्थात मला त्यांना विन्मुख परतविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोड्या वेळात मुंगसे हवालदार येताना दिसले. आपल्या नावाचा न्यायालयात पुकारा केला असावा या कल्पनेने मी लगबगीने उठू लागलो तोच मुंगसे जवळ येत मला पुन्हा बसायला सांगू लागले. मुंगसे मला न्यायालयात घेऊन जाण्याकरिता आले नसून माझ्यासारखाच अजून एक तथाकथित "सभ्य आरोपी" घेऊन ते त्याला माझ्याशेजारी बसविण्याकरिता आले होते. ह्या नवीन आरोपीचा गुन्हा काय तर त्याने त्याच्या मालकीचे देशी दारूचे दुकान रात्री नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक काळ उघडे ठेवले होते. तर अशा आरोपीला खून, मारामारी, बलात्कार, चोरी प्रकरणातील आरोपींसोबत कसे बसविणार? म्हणून तोही माझ्यासारखाच इथे टपरीत बसणार.
अजून साधारण दोन तास तिथे कंटाळवाण्या अवस्थेत बसून काढल्यावर मुंगसेंनी मला बोलावून घेतले. न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले, "हे पाहा, कोर्ट तुम्हाला विचारेल - गुन्हा कबूल आहे का? तर मनात कुठलीही शंका आणू नका. सरळ "कबूल आहे" म्हणा. नाही म्हणालात तर फार अडचण होईल - तुमचीही आणि आमचीही." त्यांचे बोलणे संपता संपताच आम्ही न्यायालयात प्रवेश करते झालो. न्यायालयात चिकार गर्दी होती. काही जण बसलेले आणि अनेक जण उभेही होते. अशातच एका अगदी किनर्या आवाजात माझ्या नावाचा पूकारा झाला. पाठोपाठ "गुन्हा कबूल आहे का?" अशी विचारणा झाली. मी "गुन्हा कबूल आहे" असे सांगताच पुन्हा त्याच आवाजात "आरोपी कोण आहे? मला दिसत नाहीये. जरा इथे समोर या" अशी सूचना झाली. खरे तर मलाही इतक्या गर्दीमुळे न्यायाधीश कोण आहे ते दिसत नव्हते. सूचनेसरशी मी समोर एकदम पुढे गेलो तर न्यायासनावर एक अतिशय लहान चणीची नाजूक दिसणारी तरूणी बसलेली होती. तिला पाहिल्यावर माझ्या कल्पनेतल्या न्यायाधीशाच्या प्रतिमेत ती कुठेही बसत नसल्याचे जाणवले. माझ्याकडे आश्चर्याने पाहत तिने पुन्हा मला गुन्हा कबूल आहे का असे विचारले. कदाचित मीही तिच्या आरोपीच्या कल्पनेत कुठे बसत नसेल. मी परत एकदा गुन्ह्याची कबूली दिल्यावर मला एका कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले. मी स्वाक्षरी केल्यावर मुंगसेंनी मला पुन्हा बाहेर टपरीपाशी जाण्यास सांगितले.
थोड्याच वेळात मुंगसेही टपरीपाशी आले आणि मला अगदी आनंदात म्हणाले,"चला झाली तुमची सुटका. आताच दंड भरून आलो. किती दंड झाला असेल याची काही कल्पना आहे का तुम्हाला?" मला अर्थातच काहीच कल्पना नव्हती, पण मुंगसे पुन्हापुन्हा माझा अंदाज विचारत होते तेव्हा "झाला असेल चार पाचशे रुपये" असा माझा एक अंदाज मी ठोकून दिला. "फक्त शंभर रुपये." असे म्हणत मुंगसेंनी माझ्या हाती दंडाची पावती दिली. "हे कसे काय शक्य आहे?" मी विचारले. "इतक्या साध्या केसमध्ये कोर्ट थोडीच स्वत:चं डोकं लावतं? हा दंड किती आकारायचा हे आम्ही म्हणजे पोलिसांतर्फे मी आणि कोर्टातर्फे त्यांचे भाऊसाहेब आणि कारकूनच ठरवतात आणि या ठरलेल्या दंडाच्या पावतीवर कोर्ट सही करतं. शिवाय कोर्टानं काही शंका व्यक्त केलीच तर अडचण नको म्हणून आम्ही पंचनाम्यात अपोझिट पार्टीच्या गाडीचे दरवाजे खरडले जाऊन फक्त पाचशे रुपयाचं नुकसान झाल्याचं दाखवलं होतं. शिवाय त्याची गाडीही नोपार्किंग मध्ये उभी होती ही गोष्ट देखील तितकीच खरी होतीना? थोडक्यात तुमची चूक अतिशय किरकोळ असल्याचंच आम्ही प्रेझेंट केलं. त्याचप्रमाणे तुम्ही पहिल्याच सुनावणीत गुन्ह्याची कबूली दिलीत. तारखांवर तारखा पाडून कोर्टाचा वेळ वाया घालवला नाहीत यावरही कोर्ट समाधानी झालं. अर्थात यासाठी मला दोन कारकूनांना प्रत्येकी शंभर रुपये आणि भाऊसाहेबांना दोनशे रुपये द्यावे लागले." एकूण बेरीज करून मी मुंगसेंना पाचशेची नोट काढून दिली. "हे तर झाले कोर्टातले, मला काही नको का?" मुंगसेंनी अगदी गरीब चेहरा करीत विचारले. "किती देऊ?" मी चेहरा शक्य तितका कोरा ठेवीत विचारले. "तुम्ही जे द्याल ते मी खुशीने घेईल." मुंगसेंनी पुन्हा चेंडू माझ्याच कोर्टात टाकला. मी निमूटपणे दोनशे रुपये काढून मुंगसेंच्या हाती दिले. ते घेऊन मुंगसे आनंदाने निघून गेले आणि मीही माझ्या घरी निघून आलो.
तिसर्याच दिवशी सायंकाळी श्री. शेख यांनी मला दूरध्वनीवर संपर्क केला. पुन्हा त्यांच्या शिकवणी वर्गावर मला बोलावलं. त्याप्रमाणे मी तिथे गेलो. शेख यांनी मला पैशाची मागणी केली. त्यांची इंडिका त्यांनी टाटा च्या बीयू भंडारी यांच्या अधिकृत सेवा केन्द्रात दुरूस्ती करिता दिली होती. तिथे त्यांना दुरूस्तीखर्चाचा अंदाज नव्वद हजार रुपये इतका सांगितला गेला होता. अर्थात त्यांच्याकडे इतकी रक्कम नसल्यामुळे त्यांनी दुरूस्ती प्रलंबित ठेवली होती त्यामूळे त्यांना वाहनतळावर वाहन उभे करण्याचा खर्च म्हणून रोजचे २५० रुपये द्यावे लागत होते. तरी त्यांनी इतका प्रचंड खर्च करण्यापेक्षा बाहेरच्या गॆरेज मध्ये दुरुस्ती करायचे ठरविले होते. हा खर्चही साधारण पन्नास ते साठ हजार रुपये होता. ही रक्कम त्यांना माझ्याकडून अपेक्षित होती. मी अर्थातच ही रक्कम त्यांना देण्यास असमर्थता दर्शविली. ही रक्कम त्यांना माझ्या विमा कंपनीकडून मिळेल असे मी त्यांना आश्वासन दिले. तरीही पुन्हा रोज रोज त्यांची या रकमेकरिता दूरध्वनीवरून विचारणा होऊ लागली.
या रोजच्या कटकटीला कंटाळून मी एक दिवशी पोलिस ठाण्यात गेलो आणि पोलिसांना हा सारा प्रकार कथन केला. "अरे अशी कशी काय तुमच्याकडून नुकसान भरपाई मागू शकतात ते?" पोलिस तावातावाने बोलू लागले, "तुम्ही कायदेशीर रीत्या पोलिसांकडे आलात, पोलिसांनी तुम्हाला आरोपी केले. कोर्टात नेले, कोर्टाने तुम्हाला दोषी ठरविले. त्या दोषाची शिक्षाही दिली. ती शिक्षाही तुम्ही भोगलीत (अर्थात शंभर रुपये दंड भरला). आता तुम्ही शिक्षा भोगून झालेले एक सामान्य नागरिक आहात आणि तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही. दिलाच तर आम्ही तुम्हाला पूर्ण संरक्षण देऊ. त्या शेखचा मोबाईल नंबर आम्हाला द्या. पुन्हा परत तुम्हाला त्याचा फोन येणार नाही ही आम्ही तुम्हाला खात्री देतो."
आणि खरंच त्यानंतर पुन्हा श्री. शेख यांनी मला आजतागायत संपर्क साधला नाही. आता या सर्व प्रकरणातील तांत्रिक बाबी अशा की, माझ्या वाहनाने श्री. शेख यांच्या वाहनास धडक दिली. माझ्या वाहनाचा चालक म्हणून माझ्यावर पोलिस फौजदारी खटला भरणार, पण प्रत्यक्षात पोलिस दोन्ही वाहनांची बाजू तपासतात. माझ्या वाहनाचा चालक म्हणून मी इंडिकाला धडक देताना चूकलो हे खरेच. परंतु, श्री. शेख यांची इंडिका ही अशा जागी रस्त्यावर उभी होती जिथे वाहने लावण्यास मनाई आहे, तरीही वाहने लावल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होते. दुसरी बाब अशी की रस्त्यावर धावणारे वाहन इतर वाहनांचे / व्यक्तिंचे किती नुकसान करू शकेल याची काहीच गणती नाही. म्हणजे असे की एखाद्या पन्नास हजार रुपये किंमतीच्या दुचाकीने एखाद्या मासिक एक लाख रुपये वेतन कमावणार्या संगणक अभियंत्याला मृत्युमूखी पाडले तर त्याचे वारसदार सहज अडीच तीन कोटी रुपये नुकसान भरपाई मागू शकतात आणि ती रास्त असल्यामुळे द्यावीही लागते. दुचाकीमालक इतकी रक्कम कोठून आणणार? याकरिता रस्त्यावर धावणार्या प्रत्येक वाहनास तृतीय पक्ष विमा बंधनकारक आहे. वाहनमालकातर्फे विमा कंपनी ही भरपाई पीडित व्यक्तीला देते. त्याचप्रमाणे जर आपण वाहनाचा संपूर्ण विमा (Comprehensive Policy) उतरविला असेल तर विमा कंपनी आपल्या वाहनाला झालेला दुरुस्ती खर्चही देते. श्री. शेख यांचे वाहन कर्जात होते. अशा वाहनांना संपूर्ण विमा (Comprehensive Policy) बंधनकारक असतो. तो श्री. शेख यांनी उतरविला नव्हता. त्याचप्रमाणे कायद्याने बंधनकारक असलेला किमान तृतीय पक्ष विमा देखील त्यांनी उतरविला नव्हता. इतकेच नव्हे तर त्यांचे वाहन हे त्यांच्या स्वत:च्या नावावर नव्हते. ते कोणा विकास रोकडे यांच्या नावावर होते. या सर्व बाबी फौजदारी खटल्याच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आल्या होत्या.
फौजदारी खटल्याचा निकाल लागल्यावर त्या निकालाची प्रत घेऊन दिवाणी न्यायालयात पीडिताने नुकसानभरपाईचा दावा दाखल करायचा असतो. हा दावा अपघात घडवून आणणार्या वाहनाच्या चालकावर नव्हे तर मालकावर दाखल करायचा असतो. (म्हणजे आमच्या संदर्भात माझ्या वडिलांवर - कारण वाहन त्यांच्या नावावर होते). त्यानंतर या अपघात घडवून आणणार्या वाहनमालकाच्या वतीने त्याची विमा कंपनी दिवाणी न्यायालयात खटला लढते. जर कंपनी हरली तर न्यायालयाच्या आदेशानुसार ठरेल ती नुकसान भरपाई विमा कंपनी अपघात पीडितास देते. आमच्या संदर्भात श्री. शेख हा कायदेशीर मार्ग चोखाळू शकत नव्हते कारण फौजदारी खटल्यात त्यांचे इतके दोष नमूद करण्यात आले होते की दिवाणी दावा जिंकणे त्यांना अशक्यच होते. त्यामुळेच ते थेट माझ्याकडून काही नुकसानभरपाई मिळू शकते का हे पाहात होते. मी पोलिसांची मदत घेतल्यामुळे त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी झाला.
या घटनेत माझ्याकडून व श्री. शेख यांच्याकडूनही काही चूका झाल्या. त्या चूकांवरून बोध घेऊन मी काही नियम कटाक्षाने पाळतो.
- जुनाट जड वाहन वापरण्यापेक्षा नवीन, हलके वाहन (जसे की माझी आताची मारूती ओम्नी) वापरणे जेणेकरून त्याची उपद्रव क्षमता किमान असेल.
- वाहनाचा कायम संपूर्ण विमा उतरविलेला असणे. (संपूर्ण विम्यात तृतीय पक्ष विमाही समाविष्ट असतो.)
- शक्यतो गर्दीच्या रस्त्यावरून पूर्णपणे बाहेर पडत नाही तोवर चौथ्या गिअरमध्ये वाहन न पळविणे. ब्रेक कधीही दगा देऊ शकतात अशा वेळी खालच्या गिअरमध्ये गती झटकन नियंत्रणात आणता येते.
- आपल्या हातून इतके करूनही जर चूक घडलीच तर आधी पोलिसांना माहिती देणे कारण इतर कुठल्याही देशाप्रमाणेच आपली न्यायव्यवस्था आरोपीला संरक्षण देते.