आज सायंकाळी आमच्या दारावरील घंटी वाजली. दरवाजा उघडून पाहिले असता कोणी दिसले नाही परंतू आमच्या पत्रपेटीत खालील कागद आढळला. हा कागद वाचताच माझी एक जुनी आठवण जागी झाली.
साधारण दोन दशकांपूर्वीची हकीगत आहे. तेव्हाही असाच एक कागद आमच्या पत्रपेटीत आढळला होता. फक्त तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आयोजक होते लायन्स क्लब ऑफ निगडी, पुणे. स्पर्धेसाठी विषय होता जातीयवाद - समस्या आणि उपाय.
कागदावरील आवाहनास अनुसरून लगेचच जुळवाजुळव सुरू झाली. दोन दिवसांत भाषण लिहून काढले आणि पुढचा एक आठवडा पाठांतर व सरावात घालवला. स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्या क्रमाने स्पर्धेकरीता नावे नोंदविली गेली होती त्या क्रमाने एकेक जण पुढे येऊन व्यासपीठावर भाषण करू लागला. ती भाषणे ऐकताच माझा उत्साह मावळला. बहुतेक सर्वांनीच जातीयवादाचा संदर्भ चालु घडामोडींशी जोडला होता. जातीनिहाय आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला डावलले जाऊन अपात्र लोकांना संधी मिळत असून त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत व यावर उपाय म्हणजे जातिनिहाय आरक्षण पूर्णपणे नष्ट करून गुणवत्ता हा एकमेव निकष ठेवला जावा असाच सर्व स्पर्धकांचा सूर होता.
याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात अतिशय साधी व अनाकर्षक वाक्ये होती. इथे स्पर्धकांच्या वाक्यांना टाळ्यावर टाळ्या पडत होत्या आणि माझ्या मनावर निराशेचे सावट पडू लागले होते.
तरीही, त्याच मनस्थितीत माझे नाव पुकारले गेल्यावर मी व्यासपीठावर गेलो आणि पाठ केलेले भाषण एका लयीत म्हंटले. अपेक्षेप्रमाणेच पूर्ण भाषणा दरम्यान व भाषण संपल्यावरही सभागृहात स्मशान शांतता होती. इतर स्पर्धकांना हंशा व टाळ्या यांचा भरघोस प्रतिसाद देणार्या प्रेक्षकांनी माझ्या भाषणाला अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले होते. आपला काय निकाल लागणार हे उमजून मी जागेवर जाऊन बसलो.
त्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत ऐकवायला सुरूवात केली. त्यांच्या दृष्टीने लोकानुनय करण्यासाठी इतर स्पर्धकांनी जी टाळ्याखेचक वाक्ये भाषणात वापरली होती ती केवळ जनक्षोभ भडकविण्याच्या लायकीची होती. स्पर्धेत अशी भाषणे बाद केली जात असल्याने त्यांचा विचार गुणांसाठी केला गेलेला नव्हता. त्यामुळे अगदी अनपेक्षितरीत्या परीक्षकांनी मला त्या स्पर्धेचा विजेता घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता लायन्स क्लबच्या गेट टुगेदर मध्ये मला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले गेले.
सायंकाळी मी कार्यक्रमाला निघण्याआधी आई मला म्हणाली, "नेहमीप्रमाणे बोरिंग कपडे घालु नको. तुझ्याकरिता मी नवीन ड्रेस आणलाय तो घालुन जा." हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच "मॉडर्न" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्या रंगातील स्पोर्ट शूज. कारण पार्टीत फॉर्मल शूज बरे दिसत नाहीत. अशा प्रकारे एकदाचा मी माझ्या मातोश्रींच्या अपेक्षेप्रमाणे पार्टी ऍनिमल दिसू लागल्यावरच मला घराबाहेर जाऊ देण्यात आले.
तर अशा अवतारात मी एकदाचा गेट टुगेदरच्या स्थळी ठीक आठ वाजता पोचलो. अर्थात तेव्हा तिथे चिटपाखरूही हजर नव्हते. साडेआठ नंतर हळूहळू एक एक करून मंडळी येऊ लागली. हे सर्व क्लबचे सदस्य होते. त्यांच्या आपसात गप्पा रंगु लागल्या. माझ्या ओळखीचे कोणीच नसल्याने मला अवघडल्यासारखे होऊ लागले.
थोड्या वेळाने एका व्यक्तिने ओरडून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. हा एक मध्यमवयीने इसम दिसत होता. त्याने हातात एक मोठे कापड घेतले होते. दुसर्या हातात सीझ फायर सारखे एक उपकरण होते. अर्थात त्याच्या या वस्तुचे नाव वेगळे होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे उपकरण त्याच्या वर्कशॉपमध्ये बनले होते आणि आग विझविण्यासाठी सीझ फायरपेक्षा अनेक पटींनी जास्त कार्यक्षम व स्वस्त ही होते. म्हणजे थोडक्यात तो तिथे त्याच्या उत्पादनाची जाहिरात करीत होता. तरी आता वेळ घालवावा म्हणून मी त्याचा उपद्व्याप पाहत होतो. त्याने बराच गाजावाजा करून आधी ते कापड पेटविले आणि डाव्या हातात धरले. नंतर लोकांचे आपल्याकडे पुरेसे लक्ष आहे ह्याची खात्री करून घेत उजव्या हातातील फायर एक्स्टिन्ग्विशरने त्यावर फवारा सोडण्यास सुरूवात केली. भरपूर फवारा सोडूनही ती आग काही आटोक्यात येईना. नंतर त्याच्या डाव्या हाताला चटके बसू लागले. शेवटी लोक ओरडू लागल्यावर त्याने ते जळते कापड खाली फरशीवर सोडले आणि शेवटी त्यास बुटांच्या साहाय्याने विझविले. त्याची फजिती पाहून लोक फिदीफिदी हसत कुजबुजू लागले.
एक शॉर्ट फिल्म संपली. चला आता पुन्हा कंटाळवाणी प्रतिक्षा असा विचार करून मी एका रिकाम्या जागी जाउन बसू लागलो तोच मला कोणीतरी "हॅल्लो हॅल्लो" करून बोलावते आहे असे जाणविले. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता). त्या अमराठी तरूणीने मला स्वत:च्या शेजारी बसवून हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद सुरू केला जो मी इथे मराठीत देत आहे.
ती : हाय. नवीन सभासद का?
मी : नाही. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालेय, ते घ्यायला आलोय.
ती : व्वॉव! अभिनंदन! काय विषय होता?
मी : जातीयवाद - समस्या आणि उपाय.
ती : ????
मी : (घसा खाकरून) जातीय...
ती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे?
मी : रात्री? आता रात्रच नाही काय? आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार.
ती : (माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत) बोरिंग! काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे? ही तर सायंकाळ आहे. आणि आताशी सव्वानऊ वाजतायेत. हा कार्यक्रम साडे अकरा आधी संपत नाही. तू काही दहा वाजता घरी पोचू शकत नाहीस.
मी : (तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला वेढून घेतले होते तो अनुभव मला एकदम नवीनच होता. त्यामुळे अतिशय गडबडून) काय? छे! इतका उशीर. मला घरी रागावतील. मला निघायलाच हवे. (मी उठून उभा राहू लागलो)
ती : (हातांनी माझा खांदा दाबून मला खाली बसवत) बस रे! असा कसा जातोस? तुझं प्राईझ नाही का घेऊन जाणार? आणि इतका भितोस काय? साडे अकरा म्हणजे काही उशीर नाही. मी तर त्यानंतर एका डान्स पार्टीला जाणार आहे. इन्फॅक्ट मी तुला तेच विचारणार होते. मला कुणी पार्टनर नाहीये. तू होतोस का माझा डान्स पार्टनर?
मी : पण मला दांडिया खेळता येत नाही.
ती : (हसत) तूला कोणी सांगितलं मी तिथ दांडिया खेळणार आहे म्हणून?
मी : तुमच्या ड्रेस कडे पाहून मला वाटलं तसं...
ती : (आणखी मोठ्याने हसत) अरे मला तुम्ही काय म्हणतोस. कॉल मी XYZ (तिने तिचे नाव सांगितले).
मी : बरं, पण मला कुठलाच डान्स येत नाही (मला आता तिथून माझी सुटका करून घ्यावीशी वाटत होती).
ती : अरे त्यात फारसं काही अवघड नसतं, आणि त्यातूनही काही अडचण आलीच तर मी आहेच की तुझ्याबरोबर. बाय द वे तुझं नाव काय?
चे त न
खरं तर माझ्या घशाला इतकी कोरड पडली होती की त्यातून एखादा शब्द मोठ्या मुश्किलीने कुजबुजण्याइतपत आवाजातच निघाला असता. अचानक माझा आवाज इतका मोठा कसा झाला? अर्थात मला जास्त वेळ आश्चर्य करावेच लागले नाही कारण पुन्हा तितक्याच मोठ्याने माझ्या नावाचा पुकारा करणारा आवाज आला आणि माझ्यासह इतर अनेकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. माझे वडील माझ्याकडे अतिशय रागाने पाहत सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते.
मी चटकन त्या तरूणीचा माझ्या खांद्यावरील हात झटकून टाकीत वडिलांपाशी पोचलो. मला घेऊन ते कार्यक्रमाच्या आयोजकांपाशी गेले आणि म्हणाले, "मी चेतनला इथून घेऊन चाललोय." आयोजक उद्गारले, "अहो, असं काय करता? सकाळी स्पर्धेच्या वेळी आमचे सभासद हजर नव्हते. आता सर्वांनाच चेतन त्याचं सकाळचं भाषण ऐकवेल. मग आम्ही त्याला पारितोषिक देऊ." " हे पाहा. तुम्हाला वेळेवर कार्यक्रम सुरू करता येत नाही की संपवता येत नाहीत. तिकडे सगळे त्याची घरी वाट पाहतायेत आणि इथे तुम्ही अजून त्याला थांबवून ठेवायची भाषा करताय. तुमचं बक्षीस बिक्षीस काही नको आम्हाला. हा मी त्याला घेऊन चाललो." माझ्या वडीलांचा उग्र आवेश पाहून आयोजक बावरले. त्यांनी लागलीच पारितोषिकाची ट्रॉफी माझ्या हाती ठेवली आणि मी वडिलांसोबत घरी निघालो.
घरी पोचेपर्यंत आणि त्यानंतरही वडील घडल्या प्रसंगाबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु जे घडले ते त्यांना निश्चितच आवडले नसणार. त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.
छान लिहिले आहे....मस्त जमून आलाय.
ReplyDeleteपण सिंहीण शीर्षक का ते समजले नाही.
त्या क्लबात प्रत्येक पुरुषाचा उल्लेख सर्वजण नावाआधी लायन हा शब्द वापरून आणि प्रत्येक स्त्रीचा उल्लेख नावाआधी लायनेस हा शब्द वापरून करत होते.
ReplyDeleteok ok
ReplyDelete